पत्र

बॅ. नाथ पै यांनी मित्रवर्य वासू देशपांडे यांना लिहिलेले हे पत्र.

लंडन, ३१.१.१९४९

सगळीकडे अधिकारपिपासा, आंधळा स्वार्थ, असहिष्णुता ह्यांचं थैमान चालू असता त्यागाची कफनी व सेवेचा दंड धारण करणाऱ्या सेवादलासारख्या संघटनेमुळेच समाजधारणा होऊ शकेल, असा माझा विश्वास आहे. क्षुद्र स्वार्थानं काळवंडून टाकलेल्या आपल्या राष्ट्रीय जीवनात आर्थिक हलाखीबरोबरच होत असलेला नैतिक अधःपात पाहून जीव कष्टी होतो. आतापर्यंत ज्यांना देव मानून पूजण्यात आलं, तेच आता समंध होऊन जनतेच्या मानगुटीवर बसून तिला गिळू लागले, तर जनतेचा आपण आतापर्यंत पूजलेल्या जीवनमूल्यांवरचा विश्वास ढळल्याशिवाय कसा राहील? आणि आपल्या जनतेत वाढू लागलेला हा थोर, शाश्वत सत्यावरील विश्वासाचा अभाव, ही श्रद्धाहीनता, हा व्यामोह मला मोठा भयानक वाटतो.

समाजाच्या धारणेस आणि प्रगतीस आवश्यक असलेल्या त्याग, संयम, जनहितदक्षता, परहितार्थ झटण्याची तयारी, ह्या गुणांची उपासना करून स्वतःच्या आचरणानं चिरंजीव मूल्यांवरील ढळू लागलेल्या विश्वासाला बळकटी आणणाऱ्या सेवादलाची जबाबदारी व कार्यक्षेत्रं आज अनेक पटींनी विशाल झाली आहेत. कर्नाटकात सेवादलाचे काम वाढवण्याचा नवा निर्णय हे तुमच्या ह्या जाणीवेचं प्रतीक म्हणून मला त्याबद्दल मनस्वी आनंद होतो.

साने गुरुजींनी माझं नाव नियंत्रण मंडळावर असावं, असं सुचविल्याचं तू लिहितोस. गुरुजींच्या ह्या सूचनेला तुम्हा सर्वांच्या इच्छेनं पाठबळही तू जोडण्याचा प्रयत्न केला आहेस, पण मी मात्र तुमच्याशी ह्या बाबतीत सहमत होऊ शकत नाही. मला सांग, इतक्या दूर अंतरावरून मी कोणत्या प्रकारचं नियंत्रण वा मार्गदर्शन करू शकणार? कार्याची आखणी वा अंमलबजावणी ह्या बाबतीत माझा रतिमात्रही उपयोग तुम्हांला होणं शक्य आहे का? मग उगाचच नाव समाविष्ट करण्यात काय अर्थ? दुसरं असं की, कुठल्याही अधिकारपदापासून, सत्तास्थानापासून शक्य तो दूर राहून मला थोर वाटणाऱ्या तत्त्वांची उपासना करण्यात माझं आयुष्य व्यतीत व्हावं, असं मला आताशा तीव्रपणे वाटू लागलं आहे.

अधिकाराच्या जबाबदारीपासून व तदनुषंगिक स्पर्धा व मत्सर ह्यांपासून अलिप्त राहिल्यास जीवनाचं आकलन, सत्याचं दर्शन व स्वतःला प्रिय असलेल्या तत्त्वांचं आचरण करणं सुलभ होईल, असं मला वाटतं. वारकऱ्याचं श्रद्धामय, भक्तिमय जीवन हे मला विलोभनीय वाटतं. माझ्या प्रकृतीचा हा स्थायीभाव असावा असं मला वाटतं. आज जरी हे विचार मी तुझ्याजवळ व्यक्त करत असलो, तरी माझ्या मनात मात्र ते सदैव वास करत आले आहेत. परिस्थितीनं ह्या स्वभावप्रवृत्तीला आतापर्यंत अनेक वेळा मी मुरड घातली आहे; आणि अंतरीच्या कलहाला तोंड देता देता मी अनेकदा अधिकारपदांचा स्वीकार केला आहे. कदाचित पुढेही हा प्रसंग गुदरेल आणि माझी ही इच्छा अपुरीच राहील, पण इतःपर मी जागरूक आणि जोरकस प्रयत्न मात्र करणार आहे.

तुम्हा मित्रांच्या सहकार्याची मला आवश्यकता आहे. हे सर्व वाचून तूही माझ्या नकाराला संमतीच देशील, असा विश्वास वाटतो. गुरुजींना माझा नम्र नकार कळव व क्षमा करायला सांग. माझं नाव मुळीच समाविष्ट करू नकोस असं तुला आग्रहाचं, निग्रहाचं सांगणं आहे.

संप करण्याचा कठोर निर्णय घेण्याची पाळी तुमच्यावर आली, तर पूर्वीप्रमाणंच कामगारांचा लढा तुमचा मानून तुम्ही त्यात सामील व्हालच. परवा कलकत्त्यात विद्यार्थ्यांची करण्यात आलेली ती कत्तल वाचून सरकार कुणीकडे धावत आहे, ह्याची अप्रत्यक्ष कल्पना आली! महात्माजींच्या प्रयाणाला आज वर्ष झालं! त्यांच्याबरोबर सारे सद्गुणही राष्ट्रातून निघून गेले नाहीत ना, असं वाटू लागतं.

गांधजी सत्याकरिता रामराज्यासाठी खपले आणि लोपले; पण त्यांचा आवाज आसमंतात विलीन होण्यापूर्वीच तमोयुगाची आणि रावणराज्याची घोर छाया आपल्या जीवनावर पसरू लागलेली दिसत आहे ! पण सत्य क्षणभर झाकोळलं गेलं तरी शेवटी उजळल्याशिवाय राहणार नाही. ह्या विश्वासानं आपण ह्या तिमिरातून पार पडू शकू. मला सेवादलाविषयी सविस्तर व शाखावार माहिती हवी आहे.