कोकणच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनात गेल्या चार दशकांहून अधिक काळ महत्त्वाचं योगदान देणारी संस्था म्हणजे ‘बॅ. नाथ पै सेवांगण’. मालवणच्या निसर्गरम्य समुद्रकिनारी उभ्या असलेल्या या संस्थेने निरंतर लोकसेवेतून बॅ. नाथ पै यांच्या समाजवादी विचारांचा वारसा निष्ठेनं पुढं चालवला आहे. लोकांच्या बदलणाऱ्या गरजा ओळखून काळाला आणि नव्या माध्यमांना अनुरूप उपक्रम राबवून ‘सेवांगण’नं नवी ओळख निर्माण केलीय.
स्थापना
बॅ. नाथ पै सेवांगणची स्थापना २८ डिसेंबर १९८० या दिवशी अनेक समाजवादी साथींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे केली. स्वातंत्र्य, समता, लोकशाही आणि समाजवाद अशा चिरंतन मूल्यांवर नाथ पै यांचा अढळ विश्वास होता. त्यांच्या या विचारांचा वारसा पुढे चालवला जावा, त्यातूनच सेवाभावी, सुसंस्कृत नागरिक घडावेत, ही नाथ पै यांना श्रद्धांजली ठरेल, या एकमेव उद्देशाने बॅ. नाथ पै सेवांगणचा जन्म झाला.
संस्थापक अग्रणी
बबन डिसोजा, ज्ञानेश देऊलकर, मधु आडेलकर, जगदीश तिरोडकर, बाबूकाका अवसरे, आप्पा तपकीरकर, टी. एस. पेडणेकर, आ. ना. कांबळी, पांडुरंग कांबळी, बापूभाई शिरोडकर, मधु वालावलकर, बाळ मालवणकर आदी मंडळी या संस्थेच्या स्थापनेसाठी आघाडीवर होते.
उपक्रम
संस्थेतर्फे गेल्या चार दशकांहून अधिक काळ आरोग्य, शिक्षण, महिला आणि बालकल्याण अशा क्षेत्रांत अनेक उपक्रम राबवले जात आहेत. संस्थेतर्फे २६ मार्च, १९८२ रोजी बालसन्मित्र पाळणाघराची स्थापना करण्यात आली. याद्वारे बालकांसाठी उपक्रम राबवले जातात. कै. नारायण व सुनीता पाताडे स्मृती महिला सबलीकरण योजनेअंतर्गत मोफत शिवणवर्ग सुरू आहे.
सेवांगणात कौटुंबिक सल्ला केंद्राची स्थापना १ डिसेंबर, १९९७ रोजी झाली. आजपर्यंत पावणेतीन हजारांहून अधिक समस्या केंद्राकडे नोंदविल्या असून ४० टक्के प्रकरणांमध्ये वैवाहिक एकत्रीकरण झाले आहे. केंद्रामार्फत कायदेशीर मार्गदर्शन, जाणीवजागृती कार्यक्रम, शिबिरे, महिला मेळावे घेतले जातात.
सन १९९९मध्ये संस्थेची कट्टा शाखा कै. रघुनाथ शिरोडकर व कै. उषा अरविंद शिरोडकर यांनी दिलेल्या इमारतीत सुरू झाली. या शाखेमार्फत मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग चालवला जातो. आजवर दोन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला असून, १६४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. २५ शिक्षक येथे मोफत मार्गदर्शन करतात. संस्थेच्या मालवण व कट्टा शाखेमार्फत वर्षभर घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये दरवर्षी दोन हजारपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होतात.
वाचनसंस्कृती
सेवांगणच्या मालवण व कट्टा या दोन्ही ठिकाणी वाचनालय आहे. मालवण येथे १८ हजार, तर कट्टा शाखेत १२ हजार पुस्तके आहेत. या दोन्ही वाचनालयांमार्फत वाचनविषयक विविध उपक्रम राबवले जातात. सेवांगणतर्फे दरवर्षी ८० गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. प्रा. मधु दंडवते सेवानिधीमार्फत उच्चशिक्षणासाठी गरीब विद्यार्थ्यांना मदत दिली जाते.
आरोग्य निधीतून गरीब रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी १० हजार रु.पर्यंत मदत दिली जाते. २० वर्षांत १६० रुग्णांना ही मदत देण्यात आली आहे. महिला स्वास्थ्य निधीद्वारे एकाकी महिलांसाठी रोजगार उपलब्ध करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. करोनाकाळातही सेवांगण उपक्रम समूह या व्हॉट्सअॅप समूहामार्फत कथाकथन, प्रश्नमंच स्पर्धा, वक्तृत्व, चित्रकला आदी स्पर्धा लघुपट रसग्रहण आदी व्याख्याने हे उपक्रम संस्थेने सुरू ठेवले. हजारापेक्षा जास्त स्पर्धक यामध्ये सहभागी होत असतात.
प्रा. मधु दंडवते, डॉ. नरेंद्र दाभोलकर, भाई वैद्य, अनिल अवचट, वसंत बापट, सदाशिव अमरापूरकर, निळू फुले, पन्नालाल सुराणा, भालचंद्र मुणगेकर, मीना नाईक, आनंद नाडकर्णी, मेधा पाटकर, डॉ. प्रफुल्ल गोडकर, लीलाधर हेगडे, मारुती चितमपल्ली, मुकुंद तेलीचरी, सुभाष मयेकर या मान्यवरांनी संस्थेस भेट देऊन वेळोवेळी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले आहे.
जन्मशताब्दी वर्षं
२०२१-२२ हे वर्ष बॅ. नाथ पै यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त जुने प्रकल्प पुढे नेतानाच, शिक्षण अर्धवट सोडलेल्यांना तसेच चाकोरीबद्ध शिक्षणाच्या वाटा सोडून नवी क्षेत्रे धुंडाळू इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शन, गावखेड्यातील मुलांना टेक्नोसॅव्ही बनवावे, यासाठी उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. वाढत्या पर्यटनाबरोबर वाढलेली व्यसनाधीनता, बिघडते मनस्वास्थ्य आणि पर्यावरण समस्या या विषयी जनजागरण व नियंत्रण आदी उपक्रम करावयाचे आहेत.
बॅ. नाथ पै सेवांगणच्या आजवरच्या वाटचालीत निस्वार्थी कार्यकर्त्यांचा संच जीव ओतून पदरमोड करून काम करत आहे. सर्वत्र समाजवादी विचाराची पडझड होत असताना सेवांगणने हा वारसा जपून ठेवला आहे. सेवांगणचे अध्यक्ष अॅ ड. देवदत्त परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम सुरू आहेत.