बॅ. नाथ पै सेवांगण या संस्थेच्या वतीने आजवर अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवले गेले. त्यातील सर्वांत महत्त्वाच्या अशा उपक्रमांची ही माहिती.
सेवांगण बालविकास प्रकल्प
‘बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण’व्दारा संचलित ‘बालसन्मित्र पाळणाघर’ विभागाची स्थापना २६ मार्च १९८२ रोजी करण्यात आली. सन २०१९ पासून हा पाळणाघर उपक्रम बंद करून त्या जागी बालशिक्षणाचे अत्याधुनिक अभिनव केंद्र ‘सेवांगण बालविकास केंद्र’ मुक्तांगण, वेंगुर्लेच्या संचालिका सन्माननीय मंगल देवदत्त परूळेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे.
यामध्ये खेळता खेळता शिका, बौद्धिक आणि स्नायू विकास, कौशल्यविकास होण्यासाठी ३ ते ४ वर्षे वयोगटातील बालांसाठी खेळघर प्रकल्प, ४ ते ५ वर्षे वयोगटातील बालांसाठी बालविकास प्रकल्प, ५ ते ६ वर्षे वयोगटातील बालांसाठी पूर्व प्राथमिक प्रकल्प राबवले जातात. बालांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. बालांच्या अंगभूत कलागुणांना चालना देण्यासाठी विविध स्पर्धा आणि शिबिरांमधे त्यांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
बालविकास प्रकल्प केंद्रच्या मुख्य शिक्षिका म्हणून सौ. वैष्णवी आचरेकर कार्यरत आहेत. सौ. सोनाली कोळंबकर आणि श्रीमती पंढरी सावंत या मदतनीस म्हणून कामकाज सांभाळत आहेत.
मधुबन
दिवंगत समाजवादी नेते मधू दंडवते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘बॅ. नाथ पै सेवांगण‘ संस्थेनं ‘मधुबन‘ या विश्रामगृहाची निर्मिती केली. समाजासाठी राबणाऱ्या आणि विधायक कार्य करणाऱ्या मंडळींनी एकत्र यावं, आपापसांत चर्चा-विनिमय-संवाद करावा आणि भविष्याच्या कार्याची दिशा ठरवावी यासाठी एकत्र येण्याचं हे हक्काचं ठिकाण बनलं आहे. ‘मधुबन‘च्या प्रांगणात विविध संस्थांच्या वतीनं शिबिरं, चर्चासत्र, कार्यशाळा यांचं आयोजन केलं जातं. समोरच असलेला समुद्रकिनारा, शांत-रम्य वातावरण यामुळं ‘मधुबन‘ हे ठिकाण अल्पावधीतच कार्यकर्ते आणि अभ्यासकांच्या आवडीचं ठिकाण बनलं आहे. अत्यंत माफक शुल्कात निवास आणि भोजनाची सोय संस्थेच्या वतीनं करून देण्यात येते.
साने गुरुजी वाचन मंदिर
मधु वालावलकर संस्थापित ‘साने गुरुजी वाचनमंदिर’ १५ ऑगस्ट १९८६ पासून सेवांगणच्या वतीनं चालवण्यात येते. मार्च १९९५ पासून या वाचनालयाला ‘सहाय्यक ग्रंथालय संचालक, मुंबई’ यांच्याकडून शासकीय मान्यता मिळाली असून अनुदानही मिळत आहे. ग्रंथालयाला १९९८ पासून ‘ब वर्ग’ मिळालेला आहे.
या वर्षअखेर ग्रंथांची संख्या १९४३९ झाली आहे. यावर्षी संस्थेने ५३४८८/- रुपयांची ग्रंथ खरेदी केली आहे. वाचनालयात ९ दैनिकं, ३० नियतकालिकं घेतली जातात. मोफत वाचनालय ३६५ दिवस चालवले जाते. यावर्षी सभासद संख्या २७१ झाली आहे. वाचकांच्या सोयीसाठी जनरल विभाग, बालविभाग, महिला विभाग, असे स्वतंत्र विभाग आहेत. ग्रंथालयाचे सन्माननीय सभासद आणि वयोवृद्ध सभासद यांना ग्रंथ घरपोच पुरवले जातात. असे आजीव सभासद ४५ झाले आहेत. रु. १०००/- भरून आजीव सभासद होता येते.
ग्रंथपाल म्हणून श्रीमती ऋतुजा केळकर, लिपिक म्हणून श्री. संजयकुमार रोगे आणि मदतनीस म्हणून सौ. सोनाली कांबळी काम करतात.
कौटुंबिक सल्ला केंद्र
‘बॅ. नाथ पै सेवांगण’ संचलित कौटुंबिक सल्ला केंद्र सन १९९७ पासून यशस्वीरीत्या चालविले जात आहे. कौटुंबिक वाद सामंज्यस्यानं मिटवून कौटुंबिक स्वास्थ्य टिकविण्याचं काम या केंद्रामार्फत केलं जातं. महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत पोलिस स्टेशन, कोर्ट यांच्या बरोबर एक सकारात्मक दुवा म्हणून कौटुंबिक सल्ला केंद्राची निर्मिती शासनाच्यावतीने करण्यात आलेली आहे.
या केंद्राला जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय ओरोस, एकात्मिक बाल विकास प्रकल्प मालवण, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय ओरोस, पोलिस स्टेशन मालवण यांचे सहकार्य नेहमीच लाभते. या केंद्रात सल्लागार म्हणून श्री. मनोजकुमार गिरकर व महिला समुपदेशक म्हणून कु. अदिती कुडाळकर या काम करीत आहेत.
या केंद्राकडे सन २०२०-२१ मध्ये एकूण १३७ कौटुंबिक समस्यांची नोंद झाली आहे. यापैकी ९० केसेस मध्ये समुपदेशन करण्यात आले. इतर समस्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
शिक्षण निधी विभाग
हुशार व होतकरु विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून संस्थेने २००१ मध्ये शिक्षण निधीची उभारणी करुन विद्यार्थी दत्तक योजना हाती घेतली आहे. याव्दारे इयत्ता ४ थी ते १२ वी पर्यंत ठराविक निकषांनुसार निवडलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना निधीच्या व्याजातून १२ वी पर्यंत शैक्षणिक साहित्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. आजवर ७८ लाभार्थी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी गेले आहेत. तर सध्या ५० विद्यार्थी-विद्यार्थीनी या योजनेचे लाभार्थी आहेत.
कै. सौ. रतन डिसोजा यांच्या स्मरणार्थ श्री. बबन डिसोजा यांनी रु. १,००,०००.०० ची देणगी दिलेली असुन श्री. जगदिश विश्वनाथ तिरोडकर यांनी रु. १,००,०००.००/- ची देणगी कै. सौ. रतन डिसोजा यांच्या स्मरणार्थ दिलेली आहे. श्रीम. कमळाबाई भगवान कांबळी यांच्या स्मरणार्थ डॉ. विजयकांत भगवान कांबळी आणि सौ. शैलजा विजयकांत कांबळी यांनी रु. २,५०,००० ची देणगी शिक्षण निधीसाठी देलेली आहे. तसेच अनगोळ फाउंडेशन, पुणे यांचेकडून प्रतिवर्षी रु.१०,०००.०० ची देणगी दिली जाते.
आरोग्य निधी विभाग
समाजातील दुर्बल घटकातील रुग्णांना वैद्यकीय मदत देण्यासाठी आरोग्य निधीची उभारणी केलेली आहे. या निधीच्या व्याजातून रुग्णावरील उपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते. गेल्या १९ वर्षात १६२ रुग्णांना रु. ८,४८,३९३/- ची मदत देऊन त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात संस्था यशस्वी झालेली आहे. सन २०१९-२०२० यावर्षी ०६ रुग्णांना रु.३९,०००/- ची आर्थिक मदत देण्यात आली.
०१ एप्रिल २०१९ पासून संस्थेने या विभागाअंतर्गत गरजु रूग्णांना दोन वेळचे अन्न मोफत देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ग्रामीण रुग्णालय, मालवण हे शासकीय रुग्णालय असून जवळजवळ २५ ते ३० किमी परिसरातील, विशेषतः ग्रामीण भागातील रुग्ण येथे उपचारासाठी दाखल झालेले असतात. ज्या रुग्णांना घरचा डबा प्राप्त होणे शक्य नाही किंवा अडचणीचे आहे. अशा गरजवंत नोंदणीकृत रुग्णास दुपारचे व रात्रीचे जेवण (डबा) या योजनेअंतर्गत विनामूल्य देण्यात येते. हा जेवण डबा रुग्णालयात रुग्णाच्या बेडजवळ संस्थेचा कार्यकर्ता व्यक्तीशः जाऊन पोच करतो. यावर्षी जानेवारी ते मार्च याकालावधीत रुग्णांना १७६३ जेवण डबे विनामूल्य देण्यात आले.
प्रा. मधु दंडवते सेवा निधी
‘बॅ. नाथ पै सेवागंण’चे प्रणेते आणि मार्गदर्शक प्रा. मधु दंडवते यांच्या नावे उभारलेल्या सेवा निधीच्या व्याजातून गरीब-होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सहकार्य तथा आर्थिक मदत देण्यात येते. तसेच कट्टा शाखेचा व्यवस्थापन खर्च चालावा यासाठी या निधीची उभारणी करण्यात आलेली आहे. प्रतिवर्षी किमान १० ते १५ विद्यार्थ्यांना या निधीतून आर्थिक मदत दिली जाते.
महिला स्वास्थ्य निधी
समाजातील परित्यक्ता तसेच एकाकीपणे जीवन जगणाऱ्या महिलांच्या सबलीकरणासाठी हा निधी उभारण्याचा संस्थेचा उद्देश आहे. याबरोबरच कुमारिका, महिला, कष्टकरी माता-भगिनींच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबविणे, रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रशिक्षण देणे इत्यादीसाठी हा निधी उभारला जात आहे. संस्थेच्या कौटुंबिक सल्ला केंद्रामार्फत या निधीचा विनियोग केला जातो.
पुरस्कार संस्थेच्यावतीने विविध पुरस्कार दिले जातात. यामध्ये ‘बॅ. नाथ पै कलावंत पुरस्कार’, ‘बॅ. नाथ पै पत्रकारिता पुरस्कार’, ‘बॅ. नाथ पै साहित्यिक पुरस्कार’, ‘बॅ. नाथ पै जीवन गौरव पुरस्कार’, ‘मधु वालावलकर समाज सेवक पुरस्कार’, ‘बापुभाई शिरोडकर समाज सेवक पुरस्कार’, ‘य. बा. चोपडे आदर्श शिक्षक पुरस्कार’ अशा पुरस्कारांचा समावेश आहे.