तळकोकणातल्या जनतेच्या जिवीचा जिव्हाळा, भारतीय राजकारणावर घट्ट ठसा उमटवणारे संसदपटू, तेजस्वी वक्ते, संसदीय लोकशाहीचा पुरस्कार करणारे समाजवादी विचारवंत, भारतीय लोकशाहीचा पाया रचणारे एक आदर्श लोकप्रतिनिधी, कोकणच्या विकासाचे संकल्पक आणि चोखंदळ रसिकाग्रणी बॅ. नाथ पै यांच्या कर्तृत्वाचा परिचय व्हावा म्हणून हे त्यांचं थोडक्यात चरित्र
जन्म आणि कुटुंब
बॅरिस्टर नाथ पै यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला गावात झाला. पंढरीनाथ हे त्यांचं मूळ नाव. सगळेच त्यांना ‘नाथ’ म्हणत असल्यानं तेच नाव रूढ झालं.
पोस्ट खात्यात नोकरीला असलेल्या नाथ यांच्या वडिलांचं नाव बापू अनंतराव पै. वारंवार होणाऱ्या बदल्यांना कंटाळून त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. नाथ यांना केवळ आठच महिने वडिलांचा सहवास लाभला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांच्या वडिलांचं निधन झालं.
नाथ पैंना तीन भाऊ आणि तीन बहिणी. अनंत, श्याम आणि रामचंद्र हे तीन भाऊ. गंगाबाई, मंजुळा आणि चंद्रभागा या तीन बहिणी. इंदिरा नावाच्या सावत्र बहिणीवर त्यांचे विशेष प्रेम होते. वेंगुर्ल्यातलं आडारी हे त्यांचं आजोळ.
शिक्षण
लहानपणी नाथ पैंना प्लेगची लागण झाली होती. आईच्या आणि भावंडांच्या सेवेमुळं ते या आजारातून बचावले.
नाथ पैंचं प्राथमिक शिक्षण वेंगुर्ल्याला झालं. त्याकाळी हुशार विद्यार्थ्यांना एका वर्षांत अधिक इयत्तांच्या परीक्षा देता येत असत. त्यामुळं एका वर्षांत त्यांनी तीन इयत्ता पूर्ण केल्या. नाथ पै यांच्या बंधूंनी बेळगावात दुकान उघडल्यामुळं त्यांचं माध्यमिक शिक्षण बेळगावला झालं. १९४० मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण होऊन बेळगावच्या लिंगराज महाविद्यालयातून पुढचं शिक्षण घेतलं. इथंच त्यांच्या वक्तृत्वावर संस्कार झाले.
त्यानंतर इंटरमीजिएट परीक्षेसाठी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पार्लमेंटमधे पुरवठा मंत्री म्हणून त्यांची निवड झाली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा तो काळ. त्यात योगदान देण्याच्या दृष्टीनं नाथ अभ्यास-परीक्षा बाजूला ठेवून बेळगावला आले.
स्वातंत्र्यलढ्यात
सुरुवातीला शहीद भगतसिंगांच्या क्रांतिकारक विचारांचा जबदरस्त प्रभाव नाथ पैंवर होता. बँक लुटणं, लष्कराच्या गंजी पेटवणं यासारख्या गोष्टींतून इंग्रजांची ते त्रेधातिरपीट उडवत. १९४२च्या स्वातंत्र्यलढ्याच्या या काळात क्रांतिकारकांची धरपकड सुरू झाली आणि नाथ पै यांना पकडलं. अकरा महिने अंधार कोठडी आणि त्यानंतर काही काळ तुरुंगवास भोगावा लागला. पोलीस चौकी जाळण्याच्या खटल्यातून निर्दोष सुटल्यानंतर ते राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून कार्यरत राहिले.
क्रांतिकार्यामुळं अभ्यासात खंड पडला होता. त्यामुळे १९४७ मध्ये नाथ पै बीए झाले. नाथ पै यांनी बॅरिस्टर व्हावं, असं त्यांच्या कुटुंबीयांना वाटत होतं. बॅरिस्टर पदवी मिळवण्यासाठी इंग्लंडला जावं. तिथल्या संसदीय लोकशाहीचा अभ्यास करून भारतीय संसदीय लोकशाही मजबूत करणारं विधायक राजकारण करावं, या हेतूनं त्यांना बॅरिस्टर व्हायचं होतं. त्यानुसार इंग्लंडमधे शिक्षणासाठी ते दाखल झाले.
परदेशात दबदबा
अभ्यासवर्ग, आंतरराष्ट्रीय समाजवादी युवक संघटना, इंग्लंडमधील मजूर पक्षाच्या नेत्यांचा परिचय, जर्मन भाषा शिक्षण-लेखन यात ते रमले. इंग्लंड, ऑस्ट्रिया, अमेरिका अशा अशा विविध देशांत ते राहिले. बॅरिस्टर पदवीच्या दोन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उर्वरीत शिक्षण अपूर्ण ठेवत नाथ पै भारतात आले.
तेव्हा भारतातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यांनी निवडणूक लढवली, त्यात त्यांचा पराभव झाला. मग ते पुन्हा बॅरिस्टर पदवीच्या उर्वरीत शिक्षणासाठी पुन्हा इंग्लंडला रवाना झाले. वर्षभरातच ही पदवी घेऊन ते युरोपात गेले.
व्हिएन्नामधे असताना ऑस्ट्रियन सरकारच्या सचिवांची मुलगी क्रिस्टल मुशेल यांच्याशी नाथ पै यांचा परिचय झाला. नाथ पै यांच्या तडफदार व्यक्तिमत्त्वानं त्या प्रभावित झाल्या. यथावकाश नाथ आणि क्रिस्टल यांचा विवाह झाला.
नाथ पैंच्या कार्याचा, वक्तृत्वाचा दबदबा युरोपमध्ये वाढला. त्यांना फिनलंड, जर्मनी, इस्राइल या देशांमधून व्याख्यानांसाठी निमंत्रणं येऊ लागली. आंतरराष्ट्रीय समाजवादी युवक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. मात्र परदेशांतल्या लौकिकांत न गुंतता ते भारतात परतले. स्वातंत्र्यानंतर लोकशाहीच्या माध्यमातून सर्व प्रश्न सुटतील, ही अपेक्षा फलद्रूप होत होती, त्यासाठी त्यांना काम करायचे होते.
पहिल्यांदा खासदार
भारतात परतल्यावर नाथ पै यांनी गोवामुक्ती, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती आणि बेळगाव सीमाप्रश्न या तीन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं.
लोकसभेची १९५७ ची निवडणूक जाहीर झाली. रत्नागिरी मतदार संघातून १९५२ मधे निवडून आलेले खासदार मोरोपंत जोशी हेच पुन्हा निवडून येतील असं वाटत होतं. मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळं लोकमत काँग्रेसच्या बाजूनं नव्हतं. तसंच नाथ पै यांचं वक्तृत्व, बोलण्यातला अकृत्रिम जिव्हाळा, त्यांचा जनमानसावर असलेला प्रभाव या गुणांमुळं ते सहज निवडून आले.
लोकसभेतल्या पहिल्याच भाषणात त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा प्रश्न उपस्थित केला. या भाषणानं सभागृहात लोकसभेचे उपसभापती, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, केंद्रीय मंत्री गोविंद वल्लभ पंत यांच्यासह सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.
आदर्श लोकप्रतिनिधी
लोकप्रतिनिधी आहोत तर आपण करत असलेल्या कामाची इत्यंभूत माहिती लोकांना कळली पाहिजे. त्यांचा तो हक्कच आहे, अशी भूमिका नाथ पै यांची होती. त्यामुळंच करत असलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती ते मतदारसंघातल्या लोकांपर्यंत सुरुवातीपासूनच पोचवू लागले. लोकप्रतिनिधी जागरूक असेल, तर लोकही जागरूक राहतील, असं त्यांना वाटत होतं. झालंही तसंच, आपापले प्रश्न घेऊन लोक स्वतः नाथ पैंकडे घेऊन येऊ लागले.
लोकप्रतिनिधी लोकांमधे जाऊन अशा पद्धतीनं काम करतो, ही पद्धतही नाथ पै यांनी नव्यानं रुजवली. निवडून आल्यानंतर सर्वप्रथम मतदारसंघातल्या गरजांच्या प्राथमिकता त्यांनी निश्चित केल्या. कोणत्या प्रश्नासाठी कुणाला भेटायचं, हेही त्यांनी ठरवून घेतलं आणि त्यानुसार कालबद्ध कार्यक्रम आखून एकेक पावलं त्यांनी उचलली.
संप टाळला
कामगार चळवळ हा नाथ पै यांच्या जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महासंघाच्या अध्यक्षपदी नाथ पै यांची निवड झाली, तेव्हा संप केल्याशिवाय मागण्या मान्य होणार नाहीत, असं वातावरण कामगारांमधे होतं.
नाथ पै यांनी वरिष्ठ नेते तसंच पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी वाटाघाटी करून कामगारांच्या हालअपेष्ट, दैन्य, वैफल्य त्यांच्यासमोर नेमकेपणानं मांडलं. त्यातून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाली आणि संप टळला.
कोकण विकासाची पायाभरणी
कोकण विकासाच्या दृष्टीनं पहिलं पाऊल नाथ पै यांनी उचललं, ते कोकण विकास परिषदेचे अधिवेशन बोलवून. या परिषदेचे अध्यक्षही तेच होते. त्यामुळं अध्यक्ष या नात्यानं त्यांनी कोकण विकासाचा सूत्रबद्ध आराखडाच सादर केला. कोकण रेल्वे हेही नाथ पै यांचं स्वप्न होतं. त्यांनी ही मागणी आग्रहानं अधिवेशनात केली. कोकण विकास परिषद घेऊन नाथ पैं यांनी कोकणी माणसाला खऱ्या अर्थानं बळ दिलं.
बेळगावजवळच्या सीमाभागात खानापूर तालुका आहे. या तालुक्यातील इदलहोंड या गावात कर्नाटकमधल्या म्हैसूर राज्यातले पोलीस सारावसुली आणि जप्तीसाठी गेले. त्यांनी मराठी कुटुंबांवर जबरदस्ती केली. त्याला नाथ पै आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विरोध केला. या प्रकरणी नाथ पैंना साडेचार महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. तुरुंगवासात त्यांनी उपनिषदांचा अभ्यास केला आणि मुन्शी प्रेमचंदांचे कथासंग्रह वाचले.
कामगिरीची नोंद
संसद सदस्य म्हणून नाथ पै यांच्या कामगिरीची नोंद सगळेच जण घेत होते. त्यांच्या वक्तव्यानं लोकप्रतिनिधी अंतर्मुख होत होते. मॉस्कोला भरलेल्या जागतिक पार्लमेंटरी परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून नाथ पै यांची निवड पंडित नेहरू यांनी केली.
दिल्ली गाजवत असताना नाथ पै यांचं आपल्या भागाकडेही तितकंच लक्ष होतं. २४ मे १९६१ रोजी कोकणात प्रचंड वादळ झालं, तेव्हा ते तातडीनं आपल्या मतदारसंघात गेले. घरोघरी पायी फिरून नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानग्रस्तांना राज्य आणि केंद्र सरकारकडून मदत मिळवून दिली.
गोवा मुक्तीसाठी नाथ पै अनेक वर्षं प्रयत्नशील होते. गोव्यातील पोर्तुगीज करत असलेल्या दडपशाहीची ते दिल्लीतील नेत्यांना वेळोवेळी कल्पना देत होते. डिसेंबर १९६१ मध्ये पंडित नेहरू यांनी गोवामुक्तीचे स्पष्ट संकेत दिले आणि भारतीय सैन्यानं गोव्यात प्रवेश केला. १९ डिसेंबर १९६१ मध्ये पोर्तुगीजांनी शरणागती पत्करून गोवा मुक्त झाला.
दुसऱ्यांदा खासदार
नाथ पै यांनी १९६२ ची निवडणूक अगदी सहजपणे जिंकली. या निवडणुकीला सामोरं जाताना मतदारांसमोर नाथ पै यांचं आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवरचं काम होतं. विरोधक करत असलेल्या अपप्रचाराला न जुमानता नाथ पै यांच्याच बाजूनं लोकांनी कौल दिला.
दुसऱ्यांदा खासदार झाल्यावर नाथ पै यांच्या कामाचा झपाटा आणखीनच वाढला. याच काळात त्यांना हृदयविकाराचा पहिला झटका आला. कामाचा ताण नाथ यांना असह्य होत होता, त्यामुळं प्रकृतीची काळजी घ्यावी, अशी नाथ पै यांना डॉक्टरांनी सूचना केली होती. मात्र याच काळात चीननं भारतावर आक्रमण केलं. त्यावेळी नाथ पै हॉस्पिटलला होते. अशा अवस्थेत लोकांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी शिवाजी पार्कवर झालेल्या सभेला नाथ पै यांनी संबोधित केलं आणि ते पुन्हा हॉस्पिटलमधे दाखल झाले.
नाथ पै यांच्या कामाचा झपाटा वाढला असला तरी मतदारसंघ हीच त्यांची प्राथमिकता होती. आपण मतदारसंघाचे प्रतिनिधी आहोत, हा विचार ते पहिल्यांदा करत. १९६१ ते १९६६ या काळात मतदारसंघात तीनदा वादळं आली. त्यात खूप नुकसान झालं. वादळात तामीळनाडूला जितकी भरीव मदत केली जाते, तितकीच कोकणालाही व्हायला हवी, अशी त्यांची भूमिका होती.
तिसऱ्यांदा खासदार
खासदारकीच्या पहिल्या दहा वर्षांच्या काळात त्यांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून अनेक कार्यक्रम राबवले. त्यांनी केलेल्या कामांमुळंच त्यांना जनाधार लाभला होता. त्यामुळंच १९६७ मधे निवडणूक जाहीर झाली, तेव्हा ती जिंकणं ही त्यांच्यासाठी फक्त औपचारिक गोष्ट उरली होती. या निवडणुकीत नाथ पै पूर्वीपेक्षाही अधिक मताधिक्यानं निवडून आले.
खासदारकीच्या तिसऱ्या कार्यकाळात नाथ पै यांनी दोन महत्त्वाची विधेयके मांडली. पहिलं विधेयक राज्य सीमामंडळाच्या स्थापनेबाबतचं होतं. खेडं हा मूलभूत घटक असून भाषिक बहुमत आणि भौगोलिक सलगता या निकषांच्या आधारे राज्यांच्या सीमा निश्चित करण्यासाठी त्रिसदस्यीय मंडळ असावं, अशी सूचना या विधेयकात करण्यात आली होती. हे मंडळ स्थापन झालं असतं, तर बेळगावचा प्रश्न सुटला असता.
दुसऱ्या विधेयकातून राज्यघटनेतलं ३५९ वं कलम रद्द करावं, अशी सूचना नाथ पै यांनी मांडली होती. कारण या कलमान्वये लोकशाहीची गळचेपी होऊ शकते, असं नाथ पै यांना वाटत होतं. हे विधेयक मांडल्यानंतर पुढच्या चारच वर्षांत इंदिरा गांधी यांनी याच कलमाच्या आधारे १९७५ साली आणीबाणी जाहीर केली, त्यायोगे जनतेचे मूलभूत अधिकार काढून घेतले गेले.
मात्र त्याविरोधात लढायला तेव्हा नाथ पै नव्हते. ‘घटना श्रेष्ठ की जनता?’ या प्रश्नात ते कायम जनतेच्या बाजूनं असत. त्यामुळंच त्यांना द्रष्टे लोकशाहीवादी असं म्हटलं जात होतं.
शेवटचा दिवस
१९७१ मधे लोकसभेची मध्यावधी निवडणूक होणार असं चित्र तयार झालं होतं. त्यामुळं तत्कालीन पंतप्रधान आपलं राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याच्या तयारीत होत्या. त्यामुळं नाथ पै यांनाही आपल्या चौथ्या निवडणुकीची तयारी करणं भाग होतं. पण प्रकृती अस्वास्थ्याची मर्यादा यावेळी नाथ पै यांच्यासमोर होती. गेल्या चार वर्षांत त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारीही वाढल्या होत्या. मात्र कामाला प्राधान्य देत मृत्यूचं निमंत्रण ते सारखं झिडकारत होते.
१६ जानेवारी १९७१ रोजी मालवण तालुक्यातल्या चौके गावातल्या माध्यमिक शाळेच्या मदतीसाठी मुंबईत आयोजित केलेल्या दशावतारी नाट्यमहोत्सवाला उपस्थित राहून त्यांनी भाषण केलं. १७ जानेवारीला हुतात्मा दिन होता. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी त्यांना बेळगावला जायचं होतं. दहा मिनिटांपेक्षा जास्त बोलायचं नाही, अशी डॉक्टरांची सूचना असूनही नाथ पै यांनी मनमुराद भाषण केलं.
त्याच रात्री झोपेतच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना घाम फुटला. रात्री बाराच्या सुमारास त्यांना जाग आली आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. याळगी यांना त्यांनी उठवलं. डॉ. याळगी आणि बेळगावमधील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जी.आर. कुलकर्णी यांनी तातडीनं उपचार सुरू केले. त्या अवस्थेतही ते ‘मला बरं करा, मला उद्या वेंगुर्ल्याला जायचं आहे.’ असं म्हणत होते. मात्र मृत्यूनं त्यांचं ‘थांब’ असं म्हणणं ऐकलं नाही. काही क्षणातच त्यांना मृत्यूनं गाठलंच.