साखरवाडी डिसेंबर १९७० मधे साखरवाडी इथं झालेल्या प्रजासमाजवादी पक्षाच्या अधिवेशनाप्रसंगी बॅ. नाथ पै यांनी केलेलं हे भाषण.
लोकशाही, सार्वभौमत्व आणि मतदानाचा अर्थ
साथी नानासाहेब गोरे, या नवव्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष किशोर पवार, उपस्थित प्रतिनिधी मित्र आणि बंधू-भगिनींनो…
ज्या ठिकाणी आजचं आमचं अधिवेशन भरत आहे ती जागा, ते स्थान आणि हा परिसर यांची फार मोठी उज्ज्वल आणि तेजस्वी अशी परंपरा आहे. ज्ञानेशांनी या भूमीमध्ये आणि या परिसरामध्ये भक्ती, कर्म आणि ज्ञान यांचा असा अभूतपूर्व संगम साधला. बहुजन समाजाच्या मुक्तीची द्वारं खुली केली आणि मानव किती उंच होऊ शकतो, हे जगाला दाखवून दिलं. त्या थोर शिकवणुकीचा वारसा या भूमीमध्ये आहे, या मातीमध्ये, या हवेमध्ये आहे, या पाण्यामध्ये आहे आणि ही त्यांची उज्ज्वल परंपरा
‘समता वर्तावी, अहंता खंडावी
तेणेचि पदवी, मोक्ष-मार्ग’
गीतेमध्ये अनेक प्रकारचा धर्म सांगितलेला आहे; परंतु समानतेचा धर्म- त्याला एक आगळं-वेगळं असं स्थान गीतेमध्ये आहे आणि ज्ञानेश्वरांनी आपल्या शिकवणुकीमध्ये मानवाचा बंधुभाव आणि समानता यांच्यावर जोर देऊन एक नवं पर्व, एक नवं युग या ठिकाणी सुरू केलेलं होतं. वारकऱ्यांनी हा मनुष्याच्या, मानवाच्या समानतेचा धर्म महाराष्ट्रात चालू ठेवला आणि समानतेचा ध्वज घेऊन उभे असलेले आजचे समाजवादी म्हणून त्याच वारकरी पंथातले आणि ज्ञानेश्वराचे खऱ्या अर्थानं वारसदार आहेत, असं मी मानतो.
आमचं हे आजचं अधिवेशन अशा वेळी भरत आहे की, देशाच्या आयुष्यातील आणि इतिहासातील एक फार मोठं महत्त्वाचं पर्व लिहिलं जाणार आहे. काही दिवसांपूर्वी, अगदी अक्षरशः वस्तुस्थितीला धरून बोलायचं तर 26 तारखेला असं एक पाऊल टाकण्यात आलं- ज्याचे परिणाम हिंदुस्थानच्या जीवनावर व इतिहासावर येती दहा-वीस वर्षं तरी होत राहतील. कदाचित याहून दीर्घ काल उठत राहतील. २६ तारखेला तुमच्या स्वातंत्र्याची, तुमच्या अधिकारांची, तुमच्या सार्वभौमत्वाची प्रातिनिधिक असलेली तुमची लोकसभा ही बरखास्त करण्यात आली.
हिंदुस्थानच्या- स्वतंत्र हिंदुस्थानच्या इतिहासातील ही अभूतपूर्व घटना होती. आम्ही स्वतंत्र झाल्यापासून आम्ही स्वतःकरता एक लोकसभा निर्माण केलेली होती. लोकसभेच्या निवडणुका या दर पाच वर्षांनी होत असत, परंतु लोकसभा बरखास्त करण्यात आली. याचं हे स्वतंत्र हिंदुस्थानच्या इतिहासातील पहिलंच उदाहरण होतं. सामान्यतः लोकसभेचं आयुष्य, कालमर्यादा ही पाच वर्षांची असते. चौथ्या लोकसभेच्या आयुष्यातील केवळ चार वर्षं संपलेली होती आणि एक वर्ष अजूनही बाकी होतं, शिल्लक होतं, चालू झालेलं होतं.
या घटनेचे परिणाम फार दूरगामी होणार आहेत. अनेक प्रश्न तुम्ही- आम्ही एकमेकांना विचारणार आहोत आणि त्यांची उत्तर तुम्हाला-आम्हाला द्यावी लागणार आहेत. केवळ न्यायालयाला उत्तरं द्यावी लागणार नाहीत, केवळ पंडितांनी आणि वकिलांनी, कायदेतज्ज्ञांनी उत्तर देऊन भागणार नाही. जे केलं गेलं, त्याला घटनेचा आधार होता का? त्याला कायद्याचा आधार होता का? ते लोकहिताचं होतं का? लोकशाहीला ते पोषक होतं का? हे प्रश्न येते दोन महिने वातावरणात घुमत राहतील; आणि त्याचं उत्तर तुम्हाला आणि आम्हाला द्यावं लागणार.
कारण हा प्रश्न असा आहे- तो एका व्यक्तीचा नव्हता. एका पक्षाचा नव्हता, लोकसभेच्या ५२७ सभासदांचा नव्हता. लोकसभा कशी चालते, किती दिवस चालते, तिचं विसर्जन कोण करतो, कुठल्या परिस्थितीत करतो, कसं करतो- हे प्रश्न केवळ लोकसभेचे नसून तुमच्या आणि ५२ कोटी भारतीयांच्या जीवनाशी निगडित आहेत. म्हणून मी यांचा उल्लेख केला. आता हे एक प्रकरण झालं.
मी याबद्दलचं माझं मत सांगितलं नाही. आमच्या पक्षातर्फे आमचं जे म्हणणं आहे ते उद्या अधिवेशनासमोर येईल आणि राष्ट्रासमोरही येईल. परंतु हे प्रश्न मी या ठिकाणी मुद्दाम आपल्यासमोर मांडले की, आपण शांतपणे या सर्व प्रश्नांचा स्वतःच्या मनाशी खल करावा, निष्कर्ष काढावा. कारण लोकशाहीमध्ये शेवटी तुमच्या मनामध्ये या प्रश्नांची जी उत्तरं दिली जातात, त्याच्यावरच लोकशाहीचं खऱ्याखुऱ्या अर्थानं भवितव्य ठरतं.
मुझे बार बार कहा जा रहा है कि जो मैं कुछ मराठीमें कह रहा हूँ, उसका अनुवाद हिंदी में और अंग्रेजी में कहा जाय। मैं आपसे माफी चाहता हूँ। मेरे भाषण आप पर कल लादे जाएँगे। आपको तो मुझे रोजाना सुनना पडेगा। हिंदीमें सुनना पडेगा। अंग्रेजीमें भी अगर जरूरत हो जाएगी तो अंग्रेजीमें भी हम बोलेंगे। मुझे आज इसलिए कहा गया कि यह प्रजासमाजवादी दल है।
बहुत संख्यामें यहाँ प्रजा आयी है। ये तो हिंदीको अपनी राष्ट्रभाषा मानते हैं। महाराष्ट्रमें हिंदी के प्रति बहुत बडी श्रद्धा है। आदरकी भावना है। लेकिन हर मराठी देहाती उसे समझ नहीं सकता, कोशिश तो कर रहे हैं कि हम उसे समझ सके। आज वे आये हैं। क्या वे आज सिर्फ बैठे रहे हमारी और आपकी सूरत देखते? यह तो जम्मुरीयत नहीं है। देखो कितनी तादादमें आये हैं ये। तो मैं आपसे इजाजत चाहता हूँ, शायद बीच-बीच में थोडी हिंदा आ जाएगी, अंग्रेजी भी आ जाएगी।
It is quite possible that in between I shall just launch into English, in between Hindi also, But I would like to confine myself, today atleast to Marathi. The reason is very simple. In very large number people have come from the surrounding villages. There are workers from the sugar factories and there are the farmers. People ask ‘Where is the Praja Socialist Party?’
I say, ‘Come and see at Sakharwadi. There is a Praja Socialist Party.’ Some intellectuals were asking me very often. “Isn’t it a very long name, Nath Pai?” Some say, “Why not only Socialist Party?” Some say, “Why not only Praja Party?”
हम जबाब देते थे We are people’s Party full of socialism. Therefore I want Praja Socialist Party.” प्रजाही अशी खच्चून भरलेली आहे आणि समाजवादही असा ज्वलंत आहे की, आम्हाला हे दोन्ही शब्द ठेवणं आवश्यक आहे आणि म्हणून हे ठेवलेले आहेत. तीन दिवस आपले अधिवेशन चालेल. राष्ट्रासमोर जे प्रश्न आहेत, राष्ट्रासमोर जी आव्हानं आहेत; त्यांच्यावर आमच्या पक्षाची नीती कुठली, ती तुम्ही ठरवायची आहे.
In our party, policies are determined by the delegates at the annual conference. The national executive will give its mind on the major issues. इतर पक्षांत काय झालं बघा. निवडणुकीची नुसती तुतारी ऐकली आणि अशी घबराहट झाली. कोणी अधिवेशनं आवरती घेतली, गुंडाळली. कुणी अधिवेशनं बरखास्त केली. परंतु धीमेपणाने अधिवेशन चालविण्याची ताकद आणि हिंमत आहे- म्हणून प्रतिनिधींवर, जनतेवर विश्वास असलेला हा एकमेव पक्ष.
That was the only party, We did not wind up our session. We did not cancel our session. Well, we had to give time for those who are going to fight. Therefore it was suggested that perhaps we need not go for all the four long days. But basically the verdict of the conference must prevail.
The delegates must decide. It was accepted and that’s why here is an indication. There is a proof, what social democracy means– an abiding faith in the party and in the people. I had just mentioned what was meant by the dissolution of the Parliament. I want the citizens who are here that this unprecedented decision taken by the Prime Minister, does not only concern 527 siting members of Loksabha.
It does not concern one single party or those two individuals principaly responsible for the dissolution of our Loksabha, the President and the Prime Minister. Basically it concerns every single citizen in a true democracy. Because ultimately the Loksabha is the symbol of the freedom and the sovereignity of the people of India.
It is a sovereign people who elect the Loksabha and therefore its dissolution, its re-election, its continuance is a matter of great concern to our people. यह ऐसा सवाल है, जिससे हरएक नागरिक का, हरएक भारतीयका गहरा संबंध है, गहरा ताल्लुक है। सिर्फ दो शक्सका नहीं है, हमारे प्रधान मंत्री और राष्ट्रपती। जम्मुरीयतका मतलब है कि हमारे बावन करोड भाई बहनें अपना फैसला दे। अपना निर्णय करे। चाहे यह निर्णय लोकसभाको बरखास्त करनेका हो, चाहे मध्यावधी चुनावका हो। हरएक निर्णय पर मोहर लगनी चाहिए आपकी पसंदगी की। यह सवाल हमारे सामने आये हैं, जब यह अभूतपूर्व कदम राष्ट्रपती द्वारा उठाया गया है।
आता निवडणूक होणार आहे. फार महत्त्वाची निवडणूक होणार आहे. आज आपण भाषणाचा हट्ट धरलात, भाषणाची मागणी केलीत. आता कान किटेपर्यंत येथे दोन महिने आपल्याला भाषणे ऐकावी लागणार. पुरे झाली भाषणं, असं दोन महिन्यांच्या शेवटी आपण म्हणाल, इतकी भाषणं रोज झोडणार आहेत इथं. नाना तऱ्हेचे लोक येतील, नाना तऱ्हेचे ध्वज येतील, नाना तऱ्हेची आवाहनं तुम्हाला करण्यात येतील. नाना तऱ्हेजी वचनं देण्यात येतील. नाना तऱ्हेची तोरणं तुमच्यासमोर उभारण्यात येतील.
अशा प्रकारे आता रंग चढणार आहे. परंतु तुम्हाला-आम्हाला निवडणुकीचा मूलभूत अर्थ समजून घेतला पाहिजे. चालू निवडणूक, येती निवडणूक, होणारी निवडणूक ही हिंदुस्थानच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना ठरणार आहे. हिंदुस्तान एका नव्या प्रवाहाच्या उंबरठ्यावर आता येऊन उभा राहिला आहे आणि भावी काळाकरता आम्हाला आमचे मार्ग निश्चित करावे लागणार आहेत.
केवळ उमेदवारांचीच निवड करावी लागणार नाही आहे; तर भावी काळातल्या आमच्या वाटा कुठल्या, आमचा मार्ग कुठला, आमचा रस्ता कुठला आणि कुठल्या मंदिरापर्यंत आम्हाला ही वाटचाल करायची आहे हेही येत्या निवडणुकीत तुम्हाला-आम्हाला- बावन्न कोटी भारतीयांना निश्चित करावं लागणार आहे. हा निर्णय करावा लागणार, हा कौल द्यावा लागणार आहे. चालू निवडणूक ही आजपर्यंतच्या निवडणुकीहून वेगळी आहे. तिचा अर्थ वेगळा, तिचे परिणाम वेगळे, तिचे पडसाद वेगळे, तिचे प्रतिध्वनी वेगळे, तिचे तरंग वेगळे होणार आहेत.
ही निवडणूक फार वेगळी आहे. जसं पार्लमेंट बरखास्त केलं गेलं- ही घटना वेगळी, तिचा अर्थ वेगळा; त्याचप्रमाणं या निवडणुकीचा अर्थ वेगळा. पहिल्यांदा मी जे नेहमी सांगतो, एक गोष्ट सांगतो. निवडणुकीमध्ये एक प्रश्न सांगतो, केवळ कसोटी ही उमेदवाराची आणि शिक्षण हे जनतेचं, हे समीकरण बदललं पाहिजे. हे लोकांचं समीकरण मला मान्य नाही. कसोटी जेवढी उमेदवारांची होणार, पक्षांची होणार, तेवढीच कसोटी जनतेची आणि भारताच्या लोकशाहीची होणार आहे.
लोकांचंच शिक्षण होतं असं नव्हे; तर पुढाऱ्यांचंही शिक्षण होत असतं. उमेदवारांचंही होतं आणि पक्षाचंही होत असतं. निवडणुकीतील भाषणांनी म्हणे जनतेचं शिक्षण होत असतं. हे अत्यंत उथळ असं समीकरण आहे. पुढारी-पक्ष-जनता- राष्ट्र हेही निवडणुकीच्या या मंथनातून फार मोठे धडे शिकत असतात. फार मोठे निष्कर्ष काढावे लागतात. पहिल्यांदा निवडणुकीचा जो अर्थ होणार आहे, तो कुठला? कोण कुठं जाणार, कोण कुठं उभं राहणार- हे येत्या आठ-दहा दिवसांत निश्चित होणार. म्हणजे कुठल्या मतदारसंघातून नव्हे; कोण कुठली भूमिका घेणार, कोण कुठली प्रतिज्ञा घेणार, कोण कुठला कार्यक्रम घेणार, कोण कुठली नीती घेऊन तुमच्यासमोर उभे राहणार आहे- हे तुम्ही पाहणार आहात. यांच्यातून तुम्हाला निवड करावी लागेल. यांच्यातून तुम्हाला तुमच्या पसंतीचे शिक्कामोर्तब करावे लागेल.
हा एक त्याचा व्यापक अर्थ झाला. त्यामध्ये कुठले प्रश्न येणार आहेत, हे मी प्रामुख्याने आपल्याला सांगणार. परंतु निवडणुकीचा अर्थ मी सांगतो. कारण कदाचित निवडणुकीच्या निमित्तानं मी या पंचक्रोशीत, या परिसरात येणार नाही. अन्यत्र जावं लागेल, महाराष्ट्रात फिरावं लागेल. माझाही एक मतदारसंघ आहे, तिथं जावं लागेल. अन्य मित्रांच्या निवडणुका लढवण्याकरता जावं लागेल. इथं कदाचित मी येणार नाही.
पहिल्यांदा मी निवडणुकीचा एक साधा अर्थ सांगतो. पाच वर्षे हिंदुस्थानचा राजमुकुट हिंदुस्थानचा जो खरा धनी, खरा स्वामी, खरा मालक, मतदार-नागरिक- त्या मालकाच्या हातामध्ये मतदानपत्रिकेच्या रूपानं भारताचा राजमुकुट पुन्हा येत असतो.
तुमच्या हातामध्ये तो जो कागद येत असतो, तो साधा कागद नसतो. दिसायला लहान असतो. लांबी-रुंदी अगदीच मामुली असते. वजन अगदीच छोटं असतं. पण तो छोटासा कागद म्हणजे मतदानपत्रिका- बॅलेट पेपर. त्याचा अर्थ, त्याचं वजन, त्याचं मूल्य हे फार आगळं असतं, वेगळं असतं, फार महनीय असतं. फार मोठं असतं. तुमच्या हातात तो छोटा कागद आला की त्या कागदाच्या रूपात भारताचं पाच वर्षांचं भवितव्य नागरिकांच्या हातात आलेलं असतं. कागद आलेला नसतो, भवितव्य आलेलं असतं. राजमुकुट आलेला असतो, राजदंड आलेला असतो आणि तो राजदंड मालकानं, नागरिकानं, तुम्ही- मतदात्यानं हातात धरून मग मालक, स्वामी, धनी म्हणून मनाशी ठरवायचं असतं की- पाच वर्षं माझ्यातर्फे माझा सेवक, माझा प्रतिनिधी म्हणून कोणाच्या डोक्यावर, कोणाच्या शिरावर माझा राजमुकुट मी ठेवायचा? कोणाच्या हातात माझा राजदंड द्यायचा? कोणाच्या हातात ही सूत्रे द्यायची? हा निर्णय तुम्ही घ्यायचा असतो. हा निर्णय घेणं, हा निवडणुकीचा अर्थ असतो. ज्या वेळी मतदाता तो कागद घेऊन मतदान केंद्रात त्याच्यावर फुली मारायला जातो,) त्या वेळी इतिहासाचं एक पान लिहिलं जात असतं.
तो शिक्का, ती फुली ही केवळ त्या एका कागदावर मारली जात नसते; भारताच्या भवितव्याला एक वेगळी दिशा दिली जात असते. फुली आपण मारता- एका छोट्याशा कागदावर; पण त्याचे पडसाद आणि परिणाम उमटत असतात कैलासापासून कन्याकुमारीपर्यंत. आपण त्या कागदाची घडी घालता, घडी केवळ कागदाला नाही, भारताच्या जीवनाला घालता. शेवटी तो कागद आपण त्या पेटीत टाकता, त्याचा पडसाद जवळच्या अधिकाऱ्याला ऐकू येत नाही; परंतु त्याचे निनाद मात्र इतिहासात घुमत राहतात.
तो कागद हातात धरणं, त्या कागदावर ती फुली मारणं, त्या कागदाला घडी घालणं आणि तो कागद त्या पेटीमध्ये टाकणं- याचा राजकीय अर्थ किती गहन आहे, किती खोेल आहे, किती दूरगामी आहे, हे मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. हा जो अधिकार मिळालेला आहे, तो मात्र साधासुधा नाही. तो मात्र सामान्य अधिकार नाही. तो अधिकार प्राप्त करण्याकरता पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी रक्ताच्या नद्या वाहाव्या लागल्या. मानवाच्या इतिहासामध्ये सॉक्रेटिसपासून ते महात्मा गांधींच्या हौतात्म्यापर्यंत स्वतःचे राज्यकर्ते निवडण्याचा अधिकार, ती मतदानपत्रिका हातात घेण्याचा तो अधिकार, ती फुली मारण्याचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून पिढ्यान्पिढ्या देशादेशांतून मानव लढला होता आणि या देशातही आम्ही तसेच लढलो होतो, म्हणून हा महान अधिकार प्राप्त झाला होता.
तो कागद केवळ छापून मिळाला नाही, तो कागद कुठल्या तरी छापखान्यातून आला नाही. तो कागद आलेला आहे- एकेक पायरी चढताना त्या ठिकाणी फार बहुमोल असं जीवन अर्पण करावं लागलं होतं. वासुदेव बळवंत फडक्यांपासून तो हेमू कलानीपर्यंत हुतात्मे बलिदान पावले होते. म्हणून स्वतःचं भवितव्य स्वतः घडवण्यासाठी स्वतःच्या जीवनाला त्यांनी तिलांजली दिली होती. म्हणून तो कागद प्राप्त करण्याचा मूलभूत हक्क-
The basic right to decide your destiny through the ballot paper is not a favour or charity done by somebody. This paper doesn’t come to you through the charity of Mr. Sen Varma. For generations men had to fight to get this basic right to decide the destiny of the common man.
या मतदानपत्रिकेवरून तुम्ही आदेश द्यायचा असतो, तुम्ही आज्ञा द्यायची असते. तुम्ही नीती निश्चित करायची असते. लोकशाहीचा खरा अर्थ त्या ठिकाणी तुम्ही प्रकट करायचा असतो. निवडणुकीचा हा एक अर्थ झाला, मूलभूत अर्थ झाला. आता येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आणि आम्हाला काय करायचंय, हे कधी सांगितलं नाही. सांगितलं काय जातं? हा उभा आहे, तो उभा आहे.
याची ही जात, त्याची ती जात, ह्याच्याकडे इतका पैसा आहे, त्याच्याकडे इतका पैसा आहे, हा एवढी वचनं देईल, तो तेवढी वचनं देईल. नाही, असं उपयोगाचं नाही! निवडणुकीला खऱ्या अर्थानं उभं राहत असतं ते तुमचं स्वप्न राहत असतं, तुमचं भवितव्य उभं राहत असतं. निवडणुकीतील उमेदवार हे निमित्तमात्र असतात. निवडणुकीला खऱ्या अर्थानं उभे राहत असतात ते नागरिक उभे राहत असतात.
The candidates so called, are only symbols. In a true sense, in a deeper sense those who fight the elections are the people themselves and they have to decide every thing. To the extent to which all these things are profoundly realized and felt by our prople, is the election, a true choice of the people.
येत्या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न येणार! परंतु प्रामुख्यानं आमच्या दृष्टीनं दोन ते तीन प्रश्नच महत्त्वाचे राहतील. या भारतामध्ये जनतेचं स्थान कुठलं? What is the place of our people in this country? Is there anybody superior to the people? Is there anybody above the people? This is the basic issue. पहला यह सवाल आज आएगा : क्या जम्मुरीयतमें, प्रजातंत्र में प्रजासे उपर और कोई शक्ति है? ताकत है? सत्ता है? यह बडा सवाल है। Sovereignty resides in the people, emanates from the people, originates from the people.
The representatives of the people are the trustees of that sovereignty. प्रभुसत्ता, सार्वभौमत्व लोकांचं असतं. त्याचा उदय लोकांतून, पाच वर्षं लोकसभेमधील प्रतिनिधींनी ते तुमच्यातर्फे वापरायचं असतं. पण ही प्रभुसत्ता, हे सार्वभौमत्व, हे कोणाचं? ते लोकांचं! पहिला प्रश्न राहणार आहे येत्या निवडणुकीमध्ये- लोकांचं लोकशाहीमधील स्थान कुठलं? केवळ शिक्के मारणारे? केवळ हात वर करणारे? मुकी बिचारी कुणी हाका, असंच आम्हाला हाकललं जायचं आहे का? की आमचं भवितव्य आम्ही ठरवणार असं सांगायचं?
मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की, आमची ही जीवननिष्ठा आहे. आमची ही श्रद्धा आहे आणि हा प्रश्न घेऊन आम्ही कौल मागणार आहोत की- लोकशाहीमध्ये सर्वश्रेष्ठ शक्ती जर कोणती असेल, तर ती लोकांचीच असते आणि लोकांचीच राहिली पाहिजे. अन्य कुठलीही शक्ती असता कामा नये. लोकशाहीमध्ये लोकांहून उंच, श्रेष्ठ अशी कुठलीही शक्ती असता कामा नये. There cannot be a third chamber above the people. लोक आणि लोकांची लोकसभा यांच्यावर न्याय देणारी कुठलीही सत्ता असत नसते, असा प्रश्न निर्माण झालेला आहे आपल्या देशामध्ये. लोकांच्या इच्छा असतात, आकांक्षा असतात, अडचणी असतात, प्रश्न असतात, दुःखं असतात; त्यांचं हरण केलं पाहिजे, त्यांचं निराकरण केलं पाहिजे.
लोकांच्या दुःखाला वाचा फोडली पाहिजे. लोकांच्या पाठीवरील दुःखाचा बोजा कमी केला पाहिजे. त्याकरता कायदे केले पाहिजेत. कामं केली पाहिजेत. हिंदुस्थानात जवळजवळ सात कोटी लोक असे आहेत की ज्यांना काम नाही, रोजगार नाही, धंदा नाही. उद्या यांच्याकरता काम करावं लागेल. कदाचित आम्ही असं सुचवू की, ज्यांना 500 रुपयांपेक्षा अधिक दरमहा तनखा आहे, अशा प्रत्येक भारतीयानं स्वतःच्या पगारातील काही टक्के- छोटे का असेना- देशात ज्यांना काहीच काम नाही, रोजगार नाही, नोकरी नाही- त्यांना द्यावेत. कारण ज्या देशात संपूर्ण बेकारी आहे, त्या देशामध्ये काम असणं हासुद्धा एक प्रिव्हिलेज आहे.
ऐसे भी हमारे भाई हैं, ऐसी भी आवाम हैं यहाँ, कि जिनकी रोजाना आमदनी एक रुपयेसे कम है और जो रोजाना एक दफे ही खा सकते हैं, ऐसे छः करोड हैं। और ऐसे लाखों हैं जिनको मालूम नहीं होता, आज खाया, कल मिलेगा, पर परसो मिलेगा या नहीं। ऐसी हालातमें जीवन व्यतित करनेवाले लाखों शायद करोडों भी हो सकते हैं। अशा परिस्थितीमध्ये ज्यांना नोकरी आहे, त्यांना काही विशेष अधिकार आहेत. ज्यांना 500 रुपयांपेक्षा अधिक पगार आहे, त्यांना काही विशेष अधिकार आहेत.
मग जर आम्ही उद्या असा कायदा आणला- कुठला कायदा?- तर ज्यांना 500 रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न आहे, त्यात लोकसभेचे सभासदसुद्धा आले. म्हणून मी म्हणतो- तर त्यांनी आपल्या या पगारातील, त्यांनी आपल्या उत्पन्नातील एक छोटासा वाटा, असा एक निधी निर्माण करण्याकरता द्यावा- ज्याच्यातून नव्या लोकांना नोकऱ्या देण्यात येतील- तर मला वाटते, हे योग्य होईल; न्याय्य होईल. हे समाजवादी पाऊल ठरेल, ज्यांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या आहेत. सरकारला कर भरणे वेगळे.
आम्हाला या देशातील न्यायालयं दुबळी करायची नाहीत. न्यायाच्या क्षेत्रामध्ये न्यायालयाचं जे स्थान आहे, ते दुबळं करण्याऐवजी मजबूत करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. स्वतंत्र लोकशाहीला, भारताच्या लोकशाहीला बलशाली अशा न्यायालयांचं आणि न्यायदान पद्धतीचं जबरदस्त असं आश्वासन हवं.
The Republic of India and our democracy, will always need the assurance of the independent, strong healthy judiciary. We have tried to give it. Let not, therefore a propoganda campaign be started as we are seeing the indications of its already. I have seen some speeches. “Your judiciary in danger.” These are the slogans which do great harm to democracy. Let us not try to raise a false slogan. Give the people a chance to decide the issues by presenting the issues fairly.
जो असली सवाल है, ये लोगोंके सामने असली रोशनीमें रखना चाहिए। गलतफहमी नहीं फैलनी चाहिए क्योंकि लोक ठीक तरहसे अपना फैसला दे सके। अपने निर्णय तक पहुँच सके। अपना निष्कर्ष निकाल सके। जान बुझकर यहाँ कोशिश की जा रही है कि लोगोंमें घबराहट पैदा की जाय, लोगों में डर निर्माण किया जाय, भीतीकी आबोहवा पैदा की जाय।
क्या हमारी जो सर्वोच्च न्यायालय है उसको हम कुचल डालना चाहते हैं? उसको हम दुर्बल बनाना चाहते हैं, शक्तिहीन करना चाहते है? हमने ऐसा कुछ नहीं किया है। नहीं करेंगे, क्योंकि हम जानते हैं कि जम्मुरियत के लिए बलशाली, सामर्थ्यशाली न्यायालयों की गहरी आवश्यकता होती है, नितांत जरूरी होती है।
हा प्रश्न येणार आहे. हिंदुस्थानमध्ये न्यायालयांनी- त्यांचं स्थान मजबूत ठेवायला हवं. पण ते कुठलं? त्यांचं स्थान असं, आम्ही जे कायदे करू त्यांचा त्यांनी अर्थ लावावा. कायदे करण्याचा हक्क कोणाचा? जनतेच्या प्रतिनिधींचा. कोणाकरता कायदे? लोकांकरता कायदे. कोणी करायचे कायदे? जनतेच्या प्रतिनिधींनी करायचे. अर्थ कोणी लावायचा? न्यायालयानं लावायचा. जनता सार्वभौम असेल, तर मात्र कुठलाही कायदा करण्याचा अधिकार तिला असला पाहिजे.
If the people are truely free they can make any law through their representatives. A sovereign people have a sovereign Parliament. A colonial people have a second class Parliament. You can’t make it equal– a sovereign people and a second class Parliament. A Sovereign people will always have a Sovereign Parliament.
लोक सार्वभौम असतील, तर त्यांची लोकसभा ही सार्वभौम असायला पाहिजे.
ज्ञानेश्वरांनी सांगितलं, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, जोतिबा फुल्यांनी सांगितलं. संत झाले, वीर झाले, समाजसुधारक झाले, समाजोद्धारक झाले तरी बहुजन समाज हा अज्ञानाच्या, पिळवणुकीच्या, गांजणुकीच्या अनेक बेड्यांत जखडून राहिला. त्याची मुक्ती करायची असेल, या बेड्या तोडायच्या असतील; तर नवे कायदे करावे लागतील. आता हे कायदे करण्याची जनतेची मागणी पुरी केली जाणार की नाही, की प्रत्येक वेळी न्यायालयाचा अडसर उभा केला जाणार?
Every time the bogey of threat to democracy is raised. There is a threat to democracy when democracy does not remain sufficiently dynamic and responsive to the growing urges of the people. Every time when there is a disturbance of the statusquo, there is a row that there is a threat to democracy.
It is the vested interest that is threatened but not democracy. The responsive elastic democracy is responsive to the needs of our people. Today there is a threat to democracy in Bengal. If democracy is threatened in Bengal, it will not remain safe and secure in the rest of India. If democracy goes down the drain in Bengal there will not be much democracy left in U.P., Bihar, Maharashtra, Mysore, Gujarat.
If democracy in Bengal is allowed to go down the drain owing to those who have taken to the path of knife and the acid bulb, democracy will not be safe in Delhi which is ruined and burried in Calcutta.
अगर जम्मुरीयत का दफन यहाँ किया गया तो जम्मुरीयत के लिए कोई स्थान दिल्ली में नहीं रहेगा। लखनौ में नहीं रहेगा । जम्मुरीयत के लिए जरूर खतरे हैं। मगर जब हमारा मजदूर महँगाई भत्ते में वृद्धि माँगेगा, हमारा किसान न्याय माँगेगा, तो जम्मुरीयत के लिए खतरा नहीं होता है, मगर जब यह जनता को कहा जाएगा। आपको मालूम नहीं है, गोलखनाथ की जो केस है वह किसकी थी? गोलखनाथ कोई गरीब किसान नहीं था, मजदूर नहीं था। जिसके नागरी हकपर आक्रमण हुआ था, ऐसा कोई नागरिक नहीं था।
हे खटले कोणी आणले होते? ही तक्रार कोणी नोंदवली होती? सुप्रीम कोर्टाकडे कोण गेले होते? हे तिघे जमीनदार होते, जमीनदारालाही न्याय पाहिजे. जमीनदारालाही आश्वासन पाहिजे. त्याची जमीन कोणी तरी सुऱ्यानं घेतली नव्हती, कुऱ्हाडीनं घेतली नव्हती. कायदा करूनच घेतली होती. आज हा प्रश्न राहणार आहे की, कायद्यानं सामाजिक न्यायाची दालनं उघडली जाणार आहेत की नाही?
युगानुयुगं आम्ही या दरवाजाला ठोठावत उभे राहिलो. ज्ञानेश्वर उभे राहिले, चोखामेळा राहिला, तुकाराम राहिले. महाराष्ट्रातील संत राहिले. ज्योतिबा फुले राहिले. बाबासाहेब आंबेडकर राहिले. आम्हाला न्यायाची ही दालनं, हे दरवाजे हे कायद्यानं खोलले पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. बंद असलेली ही दारं उघडली गेली पाहिजेत कायद्यानं! पण कायद्यानं ती उघडली गेली नाहीत, तर मग कोणी तरी ती कुऱ्हाडीनं उघडत असतो- जसा आज बंगालमध्ये उघडण्याचा प्रयत्न होत आहे. म्हणून ती कायद्यानं उघडली गेली पाहिजेत! म्हणून ती लोकशाहीच्या मार्गानं उघडली गेली पाहिजेत!
पायांतील या बेड्या- सामाजिक अन्यायाच्या, पिळवणुकीच्या, गांजणुकीच्या, शोषणाच्या या युगानुयुगाच्या बेड्या- या लोकशाहीच्या, शांतीच्या, सत्याग्रहाच्या आणि कायद्याच्या मार्गानं तोडल्या जाणार नसतील; तर मग कोण कुऱ्हाड घेतो, कोण भाला घेतो, कोण सुरी घेतो- आणि मग लोकशाहीला संकट निर्माण होतं.
If democracy doesn’t prove responsive enough to break the shackles of ages, then of course, democracy comes into danger by its own failure and weakness.
आम्हाला बाहेरचं वर्चस्व नको, कोणाचंही नको. गुप्त नको, सुप्त नको. कोणाचंही बाहेरचं वर्चस्व नको आणि आतही आम्हाला कोणाचा ससेमिरा नको. आम्हाला आमच्या मुक्तीकरता हवे असे कायदे करण्याची स्वाधीनता हवी, स्वातंत्र्य हवं, मोकळीक हवी. ही आमची एक मागणी येत्या निवडणुकीत तुम्हाला उचलून धरावी लागणार आहे. आमची ही मागणी म्हणजे काय? देशातील बावन्न कोटी जनता- ज्यांच्यावर आमचा विश्वास आहे, या घोषणेची ही ग्वाही आहे. आमचं जे बिल होतं- ते काय आहे?
My bill is a proclamation of an undying faith in our people and in their judgment.
हा लोकशाहीचा आधार असतो. अगदी हाच लोकशाहीचा गाभा असतो. सहा पांडित्यपूर्ण अशा न्यायाधीशांनी दिलेला न्याय आणि बावन्न कोटी जनतेनं दिलेला न्याय- यांमध्ये कुठला निर्णय जर श्रेष्ठ असेल, तर माझ्या डोळ्यांमध्ये बावन्न कोटी लोकांचा निर्णय हा सहा न्यायाधीशांपेक्षा सदैव श्रेष्ठ राहणार आहे. प्रत्येक लोकशाहीमध्ये हा प्रश्न निर्माण झाला होता आणि प्रत्येक लोकशाहीला याचं उत्तर द्यावं लागलं आहे. हरी विष्णू कामतांनी संसदेमध्ये हा प्रयत्न केला होता.
घटना समितीमध्ये त्यांना हा प्रश्न उपस्थित करून ज्या शब्दांमध्ये मी याचं उत्तर दिलेलं आहे, त्या शब्दांमध्ये देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. पुनश्च तो प्रश्न आता आपल्यासमोर येणार! त्या वेळी फक्त घटना परिषद छोटीशी होती. आता बावन्न कोटी भारतीयांना असं उत्तर द्यावं लागणार आहे. आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही सार्वभौम आहेत, आम्ही आमचं भवितव्य ठरवण्याला मोकळे आहोत. आम्ही आमच्या हिताकरता, मुक्तीकरता, उद्धाराकरता, गौरवाकरता, उन्नतीकरता, उष्कर्षाकरता- आमच्या बुद्धीला योग्य वाटेल असे कायदे आमच्या प्रतिनिधींतर्फे करणार! कोणी आम्हाला थांबवू शकणार नाही.
कोणी आम्हाला थांबवता कामा नये. हा कौल तुम्हाला येत्या निवडणुकीत प्रामुख्यानं द्यावा लागणार आहे. हे झालं म्हणून हा प्रश्न मी विचारला- जनतेचं भारतातील स्थान कोणतं? आणि ‘भारताचं जगातील स्थान कोणतं?’ हा दुसरा प्रश्न. तुम्ही या पहिल्या प्रश्नाचं उत्तर योग्य रीतीनं दिलंत, तर मग जगात भारताला स्थान राहणार आहे. १२७ देशांमध्ये आर्थिक दृष्ट्या, सामर्थ्याच्या दृष्ट्या, लष्करी दृष्ट्या आम्हाला फारसं स्थान नाही. आमचं सैन्य मोठं आहे. दहा लाख सैन्य आहे. परंतु आम्हाला लागणारी शस्त्रास्त्रं इतरांकडून मागून आणावी लागतात. उसनी आणावी लागतात. उधार आणावी लागतात, कर्ज काढून आणावी लागतात. सैन्य दहा लाखांचं आहे.
थोडीशी विमानं होतात, ही गोष्ट खरी. एखाद दुसरी पाणबुडी या ठिकाणी येऊ लागली आहे, ही गोष्ट खरी. परंतु राष्ट्राची जी ताकद असते, शक्ती असते, बळ असतं, ते त्या जनतेवर असतं. आर्थिक पायावर आधारलेलं असतं. आमचा आर्थिक पाया काँग्रेसच्या वीस वर्षांच्या धोरणामुळं दुबळा राहिला. कच्चा झाला. आणि जगात आमचं स्थान कोणतं?- याचं उत्तर येत्या निवडणुकीत द्यावं लागणार. तुमचं हिंदुस्थानमधलं स्थान आणि हिंदुस्थानचं जगातील स्थान कोणतं?
आज हिंदुस्थानला जगात कुठलं स्थान? कुणी आमच्याबद्दल सहानुभूती दाखवतो, कुणी आमची कीव करतो, कुणी आमची गय करतो, कुणी आमच्याबद्दल तुच्छता दाखवतो. आमच्याबद्दल आदर आहे, असं पृथ्वीतलावर एकही राष्ट्र नाही. द गॉल म्हणाला,
‘India is a broken reed. Where is India?’ जेम्स रस्टनला त्यांनी सांगितलं. जेम्स रस्टन द गॉलला म्हणाला,
‘‘चीनची जी वाढती शक्ती आहे त्याला उत्तर द्यायचं असेल, तर आपण भारताला पाठिंबा दिला पाहिजे. कारण आशियामध्ये भारत एकच लोकशाहीप्रधान राष्ट्र आहे.’’ द गॉल म्हणाला,
‘India? Mr. Restan, where is India? India is a broken reed.’
वॉल्ड रॉस्टॉव्हनं सांगितलं,
‘India is not a fact to be taken into consideration in the power alignment of the world.’
आपल्या राष्ट्रपतीला दिलेल्या गुप्त अहवालामध्ये अमेरिकेतल्या या पंडिताने असा अहवाल दिला. भारत कोणाच्याच खिजगणतीत नाही. भारत हा कोणाच्याच हिशोबी नाही. भारताची आपल्याला गणतीच करायला नको. हिशोबात धरायला नको. एक असं बोलतो, एक तसं बोलतो. आपण मग याचं कारण शोधून घेतलं पाहिजे. याचं कारण आम्ही सांगणार आहोत. आम्हाला कणखर अशी परराष्ट्रनीती हवी. स्वाभिमानी अशी परराष्ट्रनीती हवी.
कोणासमोरही वाकावं लागणार नाही याचा कौल आम्ही मागणार आहोत. कारण अशी नीती आम्ही अंगीकारली. असं बळ आणि सामर्थ्य निर्माण केलं, तर जगामध्ये आम्हाला स्थान मिळणार आहे. नव्या निवडणुकांत प्रामुख्यानं दोन-
Two questions are to be decided– the place of our people in our own country and India’s place in the world. These are the two issues on which we are going to seek a mandate. I do not know which party wants to go with us, but I want to tell you in the light of the proclamations that are coming, let not any party because of its numerical superiority be under any illusion that the P.S.P. will be interested in a mere adjustment of seats, if it is not linked with these destiny-changing issues before the country.
हे सर्व प्रश्न गुंडाळून केवळ जागांचं वाटप करण्यामध्ये आम्हाला सारं काही स्वारस्य वाटतं- अशा घमेंडीमध्ये कोणी राहता कामा नये. राष्ट्राचं भवितव्य ठरवणाऱ्या या प्रश्नांबद्दल ज्यांच्याशी आमचं सहमत होऊ शकेल, त्यांच्याबरोबरच आमच्या वाटाघाटी होऊ शकतील- ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट- कोणीही केवळ जिल्हापातळीवर आणि राज्यपातळीवर आमच्याबरोबर समेट करील, असे मनाचे मांडे रचत राहू नये. हा जिल्हानिहाय पक्ष नाही. ज्यांना आमच्याशी बोलणी करायची असतील, त्यांना आमच्या अखिल भारतीय नेतृत्वाबरोबरच ती करावी लागतील.
आपल्यासमोर जो हा प्रश्न राहणार आहे- मला आता जास्ती भाषण करायचं नाही. तरी मी जवळजवळ 50 मिनिटे आपल्यासमोर बोललो आहे. निवडणुका- चालू निवडणुका या फार महत्त्वाच्या आहेत. दूरगामी परिणाम करणाऱ्या आहेत. देशाचं भवितव्य घडवणाऱ्या आहेत. तुम्हाला त्यात फार मोठं काम करावं लागणार आहे; पण कसं करावं लागणार?- बघे म्हणून नव्हे; मालक म्हणून, धनी म्हणून, देशाचं भवितव्य घडवणारा म्हणून.
या ईर्षेने, या आत्मविश्वासानं, या श्रद्धेनं महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेनं आगामी निवडणुकीकडे पाहिलं पाहिजे. इथून वारे येतील, तिथून वारे येतील, असा प्रचार होईल. परंतु हातात कुठला तराजू घ्यायचा? हातात निकष कुठला घ्यायचा? कस कुठला लावायचा? लक्षात ठेवायचं की, या निवडणुकीमधे नाथ पै उभे नाहीत, मी उभा आहे. माझा स्वाभिमान उभा आहे. ग्यानबानं स्वतःला काय सांगायला पाहिजे? निवडणुकीत नाथ पै, कदाचित दंडवते, कदाचित अनु वर्दे राहतील, कदाचित किशोर पवार, कदाचित आणि कोणी तरी या ठिकाणी बसलेले मित्र राहतील. इतर राज्यांत इतर मित्र राहतील. सुरेेंद्र द्विवेदी राहतील, कदाचित कामत राहतील.
निदान त्यांनी आता राहावं, अशी माझी इच्छा आहे. तर तुम्हाला आणि आम्हाला- आपल्या जनतेला त्या दूरगामी प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं. कसा राहणार भारत? हा भारत स्वतंत्र राहणार ना? सार्वभौम राहणार ना? लोकशाहीवर आधारलेला राहणार ना? या ठिकाणच्या जीवनाला अर्थ राहणार ना? हे प्रश्न येणार आहेत. बेकारी नष्ट होणार का? महागाईला आळा घालणार का? की, गेल्या वीस वर्षांचं या ठिकाणचं अंदाधुंदी राज्य चालू राहणार आहे? वीस वर्षे ज्यांनी अंदाधुंदी केली, त्यांना तुम्ही आणि आम्ही जाब विचारणार आहोत.
तुम्हाला उत्तर द्यावं लागणार ते कुठल्या भूमिकेनं? मालकाच्या? धन्याच्या? या निवडणुकीमध्ये इतर कोण प्रश्न करतील, मला माहीत नाही- उत्तर आपल्याला द्यावं लागणार! पाकिस्ताननं एक निर्णय दिला, तो मला आपल्याला सांगायचा आहे. वीस वर्षे पाकिस्तानमध्ये जातीयवादाचा डोंब उसळत होता, आग पेटत होती, जहर वाहत होतं. बीस बरस तक पाकिस्तानमें जहर की नदियाँ, नफरतकी नदियाँ, द्वेष की, घृणा की भावना की नदियाँ बहती थी। मगर वहाँ क्या हो गया? देखिए आप।
पाकिस्तानमध्ये काय झालं? आपण पाहा- त्या ठिकाणी दुष्मनी, द्वेष होता, मत्सर होता, घृणा होती; त्या ठिकाणी, त्या पाकिस्तानमध्ये कौल देण्यात आला- कसा? नव्या युगाकरता, मानवतेकरता, समाजवादाकरता देण्यात आला. ज्या पाकिस्तानचा जन्म जातीयवादावर झाला, द्वेषावर झाला; त्या पाकिस्तानमध्ये आज ध्वजा हळूहळू का होईना चढू लागली आहे आधुनिकतेची, लोकशाहीची, राष्ट्रवादाची; मग हिंदुस्तानमध्ये- ज्या पाकिस्तानचा जन्म जातीयवादाच्या द्वेषातून झाला त्या पाकिस्तानमध्ये द्वेषाला मूठमाती देत असताना, हिंदुस्थानमध्ये जातीय द्वेषाला आव्हान देणार का- हा प्रश्न तुमच्या आणि आमच्यासमोर येणार आहे.
When the two nation theory is being burried in Pakistan by Mujibur Raheman and his colleagues, shall we allow the theory of two nations to be revived in India? Never, never. That must be the verdict of the people of India.
एक-दो ने नहीं कहना चाहिेए- नहीं नहीं, तमाम भारतीयोंको कहना पडेगा- नहीं होगा (नहीं होगा- नहीं होगा)। आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आणि आम्हालाही शोधावी लागणार आहेत. नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करावा लागेल. चीनच्या टांगत्या तलवारीचा करावा लागेल. भुत्तोच्या घमेंडीचा करावा लागेल. कारण भुत्तोला अजूनही घमेंड आहे! कुठली घमेंड आहे?
१२०० वर्षे आम्ही म्हणे हिंदुस्थानवर राज्य केलेलं होतं. आज या टांगत्या तलवारी सरहद्दीवर उभ्या राहतील. आज काही खंजीर राहतील, काही सुरे राहतील, काही चाकू राहतील, काही भाले राहतील. पण त्याचबरोबर असंतोषाचा, भुकेचा हा भडाग्नी भडकण्याचा संभव आहे. या प्रश्नांना लोकशाहीमध्ये उत्तरं आहेत का? तुमच्याकडे, ग्यानबाकडे उत्तरं आहेत का? ही लोकशाही कुणाची? हे स्वातंत्र्य कुणाचं? – ग्यानबाचं आहे. मग ग्यानबाला असं सिद्ध करावं लागणार, तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे की, माझ्या लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या पद्धतीनं या सर्व प्रश्नांना मी उत्तरं देऊ शकतो.
जग पाहणार आहे, इतिहास पाहणार आहे, भावी पिढ्या पाहणार आहेत. चालू पिढीची फार मोठी ही कसोटी- काँग्रसचीच नव्हे. जुन्या काँग्रेसची नव्हे, नव्या काँग्रेसची नव्हे, प्रजा समाजवाद्यांची नव्हे, संसोपाची नव्हे- कसोटी होणार आहे भारतीय लोकशाहीची, भारताच्या श्रद्धेची, मूल्यांची- तुमची कसोटी होणार आहे. या कसोटीला आपल्याला उतरून इथून आपल्याला जायचं आहे. यासंबंधी आमच्या पक्षाची जी धोरणं आहेत, ती शांतपणे तुमच्यासमोर ठेवली जातील. खुर्च्या फेकल्या जाणार नाहीत, गुद्दे मारले जाणार नाहीत.
एकमेकांना ‘पिटना’ देणार नाहीत. गरमागरम चर्चा होईल. खमंग चर्चा होईल. ‘जोशीली’ चर्चा होईल. परंतु लोकशाहीला काळिमा लागेल असा प्रकार या मंडपात कधी घडला नाही, कधी घडू देणार नाही. अशा रीतीनं आमचं हे अधिवेशन चालणार आहे. इथून आम्ही जाऊ ती आमची शिदोरी घेऊन जाऊ. मोठ्या विश्वासानं आम्ही निवडणुकीत उतरणार. कोणी आलं तर ठीक आहे. ताकाला जाऊन बुडकुलं लपवणारे आम्ही लोक नव्हेत. श्री. गोरे नव्हेत, आम्ही नव्हेत.
नानासाहेबांचा स्वभाव कुठला असेल? सरळ, उघडा आणि फटकळ म्हणा पाहिजे तर; परंतु कुठलीही लपवाछपवी नाही. जर आमचं धोरण मान्य होऊन, आमची नीती मान्य हेऊन कोणी आलं असेल, तर आम्ही बरोबर जाऊ. पण कोणी नाही आलं- कबीरा चले बजारमें लेकर लुकाटी हाथ। जो घर जाए अपना वो चले हमारे साथ। यह हमारा धर्म रहा है। या धर्माऩं जाताना कुठली शिदोरी आमच्याबरोबर आहे, हे सांगून मी संपवणार.
निवडणुकीच्या या रणांगणात तुम्ही आणि आम्ही, राष्ट्र- सारेच उतरणार. सारेच उमेदवार- साऱ्यांचीच परीक्षा, साऱ्यांचीच कसोटी; परंतु आम्ही जाताना शिदोरी घेऊन जाणार- ज्वलंत राष्ट्रनिष्ठेची, लखलखत्या लोकशाही निष्ठेची आणि धगधगत्या समाजवादी निष्ठेची. आमची जी ध्वजा आहे ती अशी ज्वलंत आहे, अशी लखलखती आहे, अशी धगधगती आहे!
किती शिदोरी घेऊन जाणार? तुमचं आम्हाला सहकार्य हवं. तुमचा पाठिंबा आम्हाला हवा. त्याच्यात एक छोटीशी गोष्ट लागते पैसा म्हणून. आमच्याकडे पैसा नाही. मध्यवर्ती कचेरीच्या नेत्यांना जाण्याला तिकिटं कुठून काढावीत, याचा विचार आम्ही करत आहोत. मी इथं जमलेल्या मित्रांना, उद्या तुमच्या कॅम्पात येण्याऐवजी आजच आवाहन करणार आहे तुम्हा सर्वांना- आजच सुरुवात करा. निवडणुकीमध्ये संघटना हवी, नीती हवी, तपश्चर्या हवी. आमच्याकडे तपश्चर्या खूप आहे.
नानासाहेबांचे सगळे केस जे पांढरे झाले आणि गळाले, ती देशाची सेवा करताना गळाले- (तुमचं काय? नानासाहेब म्हणाले.) माझंही तेच झालं! मग ही सेवेची शिदोरी आहे, हा ठेवा आहे, हा वारसा आहे. अशी लखलखती तेजस्वी माणसं आहेत- त्यांच्यासमोर अशी जादू आहे, संघटना करण्याची ताकद आहे. एक गोष्ट कमी पडणार आहे- द्रव्य. द्रव्यानंच निवडणुका जिंकता येतात असं नाही, पण द्रव्याची आवश्यकता असते. ते मला आमच्या प्रतिनिधींना सांगायचं आहे.
इथं आलेल्या शेतकरी बंधू-भगिनींना सांगायचं आहे. इथं बसलेल्या मित्रांना सांगायचं आहे. आजच्या या क्षणापासून या पक्षाला तुमचे आशीर्वाद आहेत ते सिद्ध करण्याकरता जे-जे काय ‘फलं पुष्पं तोयं’ द्यायचं असेल, ते आजपासूनच सुरुवात झाली पाहिजे, अशी विनंती करतो.