प्रकाशाचा पुत्र : नाथ पै – पु. ल. देशपांडे
गुरुवार दि. १८ जानेवारी १९७३ रोजी बॅ. नाथ पै यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात राज्य शिक्षण संस्थेच्या सभागृहात एस. एम.जोशी यांच्या अध्यक्षतेखाली श्री. पु. ल. देशपांडे यांचे व्याख्यान झाले. त्याचा हा सविस्तर वृत्तान्त.
आयुष्यात आपल्यावरच काय; पण, कोणावरही काही प्रसंग येऊ नयेत असे वाटत असते. आजचा हा प्रसंग असाच चमत्कारिक आहे. ज्याच्या गौरवाच्या सभेला आनंदाने भाषण करावे अशा आपल्या मित्राच्या पुण्यस्मरणाचे भाषण करण्याचे नशिबी यावे हे चांगले नाही. आपल्याकडे एक कलियुगाची कल्पना आहे. त्यात ह्या दुष्ट युगाची लक्षणे सांगताना वयाने वडील असणाऱ्यांना धाकट्यांच्या निधनाचा शोक करण्याचे प्रसंग येतील असे सांगितले आहे म्हणतात. नाथ पै कर्तृत्वाने खूप मोठा होता; पण आपल्यापैकी पुष्कळांच्यापेक्षा वयाने लहान होता. माझ्यापेक्षाही वयाने लहान होता. शिवाय त्याच्या वागण्यातही सहज आणि सुंदर असा धाकटेपणा होता. एखाद्याच्या चांगल्या कृत्याने आपल्याला त्या माणसाविषयी आदर वाटतो, अभिमान वाटतो; पण, नाथच्या वागण्यात आणि व्यक्तिमत्त्वात असे काही तरी होते की, घरांतल्या धाकट्या भावंडाने केलेल्या पराक्रमाचे वडिलांना जसे नेहमी कौतुक वाटते तसे महाराष्ट्रातल्या अनेक घरांत त्याच्याविषयी कौतुकच वाटायचे! जगात काही माणसे चिरतरुण्याचे वरदान घेऊन येतात, तर काही चिरवार्धक्याचा शाप घेऊन येतात. तो शाप काही वेळेला शारीरिकही असतो. महाराष्ट्रातले एक अतिशय चांगले विनोदी लेखक दत्तू बांदेकर यांनी आचार्य अत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे अभीष्टचिंतन करताना त्यांना आशीर्वाद दिला होता. वास्तविक बांदेकर वयाने अत्र्यांच्यापेक्षा खूप लहान; पण, बांदेकरांनी अत्र्यांना आशीर्वाद देताना म्हटले होते की, वयाने जरी खूप लहान असलो तरी मनाने आणि प्रकृतीने आपल्यापेक्षा खूप वृद्ध असल्याच्या अधिकाराने मी ‘दीर्घायुषी व्हा’ असा आपल्याला आशीर्वाद देत आहे.
शरीर निसर्गनियमाप्रमाणे थकत असते, हे खरे आहे, पण मनाचे तारुण्य मात्र शरीरावर मात करून टिकत असते. दुर्दैवाने तारुण्याचा संबंध फक्त उथळ सुखापभोग घेण्याशीच जुळवण्यात आलेला आहे. खरे म्हणजे, खऱ्या तरुणपणाला स्वार्थ-निरपेक्ष असण्याची अट असते. जीवनातला चांगल्या प्रतीचा आनंद हा स्वार्थाच्या बाजारात विकत मिळत नसतो. ‘स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात, त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्थी तो जातो, द्वेष संपला मत्सर गेला, आता उरला चोहिकडे, आनंदी आनंद गडे’ म्हणणाऱ्या बालकवींना असा आनंदी माणूस नाथ पैमध्ये पाहायला सापडला असता! जीवनातला आनंद आपल्याला लाभावा असे वाटणे ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. पण, हा आपल्याला लाभलेला आनंद आपल्या भोवताली जगणाऱ्या सगळ्यांना कसा लाभेल याच्यासाठी धडपडणाऱ्या माणसा पुढे यायला वार्धक्यदेखील घाबरत असते! रवीन्द्रनाथ टागोरांच्या पुढे यायला मनाचे वार्धक्य भ्याले, याचे कारण हा आनंदाचा प्रसाद दुर्दैवाने ज्यांना लाभला नाही त्यांना लाभावा म्हणून चाललेल्या त्यांच्या धडपडीतच सापडेल. हृदयविकारासारखा भयानक विकाराच्या शेवटच्या अवस्थेत असतानादेखील ‘बेळगावच्या मराठी लोकांवर अन्याय होतोय तो मी होऊ न देण्यासाठी धडपड करीन, ते स्वातंत्र्याच्या काळातदेखील निजलिंगप्पाच्या जुलूम-जबरदस्तीचे बळी होताहेत, त्यांना मी मुक्ततेच्या आनंदाचा प्रसाद आणून देण्यासाठी धडपडीन, म्हणून डॉक्टर-लोक नको नको म्हणत असताना बेळगावला धावणारा नाथ पै हा जगाला तारुण्याचे खरे आवाहन काय असते हेच सांगून गेला. कुणाला हे दुःसाहस वाटले असेल; पण, केशवसुतांनी ज्याला ‘धरा जरा निःसंगपणा’ म्हटले आहे तो हा निःसंगपणा! नाथची पत्नी क्रिस्टल नाथच्या सहकाऱ्यांना ओरडून सांगत होती, तिच्या मनाच्या यातना कळायला स्त्रियांच्याच जन्माला जायला पाहिजे, क्रिस्टल म्हणत होती, “यू आर किलिंग हिम्!” तुम्ही त्याचा खून करताय! तिचे म्हणणे खोटे नव्हते, पण, ‘मुहूर्त ज्वलितम् श्रेयः’ हेच ज्यांच्या जीवनाचे ध्येय त्यांना कोण अडवणार?” प्रेम आणि मरण’ ह्या कवितेत गडकऱ्यांनी म्हटले, ‘हा योग खरा हठयोग प्रीतिचा रोग लागला ज्याला, लागते मरावे त्याला हे असे!’ इथला प्रीती किंवा प्रेम हा शब्द व्यापक अर्थाने पाहावा म्हणजे हृदयविकाराला ह्याचे कोडे सर्दी-खोकल्याच्या दुखण्यासारखे मानून नाथ का जगला, म्हणून उलगडेल. आत्मसमर्पण ही सभोवतालचा अन्याय दूर व्हावा, समाजाचे जीवन अधिक विवेकी व्हावे, सर्वांच्या सुखाची काळजी वाहणारे व्हावे म्हणून दिलेली शेवटची किंमत असते. चांगल्या मूल्यांच्या वेदीवर दिलेले ते बलिदान असते!नाथचे सारे आयुष्यच असल्या बलिदानाच्या दिशेने झेपावणारे होते.
स्वातंत्र्यानंतर नाथ पै ‘विळा कोयता धरी दिगंबर दख्खनचा हात’- अशा अर्धनग्न, अर्धपोटी कोकणातल्या प्रजेचा प्रतिनिधी म्हणून आपल्या लोकसभेत गेला होता. दुर्दैवाने आपल्या लोकशाहीत लोकसभेत जाणे म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचा आव आणून स्वतःच्या आणि आपल्या पुतण्या-मेव्हण्यांच्या पोळीवर तूप ओढण्याची संधी मिळवणे असा झाला आहे! अशा ह्या काळात नाथ पै मात्र तिथल्या लोकनियुक्त प्रतिनिधींना ‘अरे कोणाच्या पुण्याईने तुम्ही इथे बसला आहांत याचा विचार करा’- त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत होता. कसली करंटी माणसे तिथे जाऊन बसतात हे मी आपल्याला सांगायला हवे असे नाही! सेनापती बापटांना श्रद्धांजली अर्पण करायला काचकूच करणारे पार्लमेंटचे सभासद! कल्पना करा, सेनापतींना श्रद्धांजली द्यायची स्वतंत्र भारताच्या लोकसभेत काही गरज आहे का, ह्या विषयावर वादविवाद होतो!
त्या वेळी नाथ पैने स्पीकरला दणकावून सांगितले होते – Speaker sir, I want to remind you the foundation of this Parliament was not laid by Litten and Baker, but by men like Senapati Bapat. What people like him suffered, what they struggled for, that is why we have a Parliament here today!
“अध्यक्ष महाराज, मी आपणाला हे सांगू इच्छितो, की आपल्या संसदेचा पाया लिटन आणि बेकर यांनी घातलेला नाही. सेनापती बापटांसारख्या मंडळींच्या पुण्याईने ही संसद आपल्याला लाभलेली आहे. त्यांनी जो त्याग केला, जे क्लेश सोसले त्यामुळेच ही संसद उभी राहिली आहे.”
मित्रहो, समाज कृतघ्न वगैरे नसतो; पण, थोडासा विसरभोळा असतो. अशा वेळी आपल्यावर कोणाकोणाचे उपकार आहेत त्याचे स्मरण करून देण्यासाठी पुण्यतिथी साजरी करावी लागते. शाळेत जाणाऱ्या मुलींना सांगावे लागते, – बाई गं, आज तू जी मोकळेपणाने सायकलवरून आणि स्कूटरवरून जाते आहेस ना, त्याच्यासाठी फुल्यांच्या बायकोने सनातनी समाजाकडून शेणमार सहन केला होता, आगरकरांनी अपमान सहन केला होता, अण्णासाहेब कर्त्यांनी अनंत मानसिक यातना भोगल्या होत्या. आपण आज लोकशाही लोकशाही असे सहज म्हणतो; पण, ह्या देशात निरोगी लोकशाही यावी, नुसता लोकशाहीचा मुखवटा चढवून जातीच्या जोरावर किंवा पैशांच्या बळावर येणारी झुंडशाही येऊ नये म्हणून माणसे प्राणपणाने लढली आहेत. अनेकांच्या पुण्याईचे-बलिदानाचे पाठबळ आपल्यामागे उभे असते! कृतज्ञता हे माणसाला लाभलेले सर्वांत मोठे देणे आहे असे मला वाटते. कृतज्ञतेइतके सुंदर जगात काही नाही, आणि माणसाच्या कृतघ्नतेइतके कुरूप काही नाही. शेक्सपीअरने माणसाच्या कृतघ्नतेचे वर्णन करताना जीव घेणाऱ्या हिमवायूला, शरीराच्या हाडाहाडांना यातना देणाऱ्या हिमवायूला उद्देशून म्हटले आहे, “वाहा-वाहा,- बाबा खुशाल, वाहा Thou art not unkind as man’s ingratitude- माणसाच्या कृतघ्नपणाइतका काही तू कठोर नाहीस!”
आज आपण इथे सारे जण जमलो आहोत ते नाथने आपल्यासाठी जे जे काही केले त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला. मृताचा आत्मा वगैरे आसपास घोटाळत असतो की नाही मला ठाऊक नाही. तसे जर असेल तर नाथच्या आत्म्याला आपल्याला हात जोडून सांगायला हवे की, ह्या देशाचे इथल्या माणसांचे भले व्हावे, त्याच्या आयुष्यातला अंधार कमी व्हावा म्हणून तू आयुष्यभर जी धडपड केलीस त्याविषयीची कृतज्ञता आमच्या अंतःकरणात पुरेपूर भरून राहिली आहे.
समाजाने कृतज्ञतेने स्मरण करावे असे नाथने किती तरी केले. आपले तन-मन-धन देऊन केले. लौकिकार्थाने ज्याला आपण धन म्हणतो ते त्याच्यापाशी फारच थोडे होते. वडील शाळामास्तरहोते. तेही कोकणात वेंगुर्ला येथे. म्हणजे शिकवणीचा पूरक उद्योगदेखील तिथे शक्य नव्हता. त्यातही त्यांचे अकाली निधन झाले. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात घरातला कर्ता पुरुष वारल्यानंतर कुटुंबाला जे जे काही भागावे लागते ते ते भोगतच नाथला सुरुवातीचे आयुष्य काढावे लागले. सुदैवाने त्याला त्याच्या मामांचा आधार मिळाला. हा आधार केवळ पैशांचाच नव्हता, तर ज्या वयात कौतुक, प्रेम, जिव्हाळा लागतो, ते सर्व त्याला मातुलगृही मिळाले.
कोकण निसर्गाचे वैभव आणि माणसाचे दारिद्रय हे दोन्ही घेऊन नांदत आलेय. ‘आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो’ असे एक सुरेख लोकगीत आहे, त्या गीताच्या जोडीला अमर शेखांचे “कोकणचा माझा राजा – राजा भिकारी!” ह्या गीताचेसुद्धा स्मरण ठेवायला हवे, ह्या कोकणावर नाथचे अतोनात प्रेम. त्या प्रेमाची परतफेडही कोकणातल्या त्याच्या मतदारसंघाने दरवेळी त्याच्या पदरात यशाचे भरघोस माप घालून केली.
नाथ पैं बरोबर कोकणातल्या जैतापूर गावातल्या एका सभेला मी हजर होतो. वास्तविक सभा माझी होती. एका शाळेच्या रौप्य-महोत्सवाला मी अध्यक्ष होतो. नाथ पै दिल्लीला होता. प्रकृती अगदी चांगली नव्हती. हृदयविकाराचा हल्ला परतवून महिनाही झाला नव्हता, पण, जैतापूर हा त्याचा मतदारसंघ. तिथल्या शाळेचा रौप्यमहोत्सव! कोकणातली बिचारी शाळा रुटुपुटुचा संसार करत पंचविसाव्या वर्षापर्यंत येऊन ठेपली होती. उत्सवासाठी तोरणे बांधायचीसुद्धा ताकद अपुरी असलेली एक चिमुकली संस्था! निष्ठावंत शिक्षकांनी पोटाला चिमटे धरून उभी ठेवलेली! कोकणातल्या माणसाला पोटाला चिमटा घेणे सहज शक्य असते. कातडीखाली चरबी नसते त्या पोटांना!
पण, एखाद्या आंतरराष्ट्रीय महोत्सवाला जावे अशा उत्साहाने नाथ दिल्लीहून सकाळच्या विमानाने निघाला. तिथून पणजीला आला. पणजीहून कुण्या मित्राची मोटार मिळवली, राजापूर गाठले. आणि राजापूर ते जैतापूर हा स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी राजापूरला डचांच्या वखारी होत्या त्या काळात होता तस्सा राहिलेला तो १८-२० मैलांचा रस्ता! त्या रस्त्यातून खड्यांची आदळ-आपट सहन करीत नाथ पै साडेचार-पाचच्या सुमाराला समारंभाला हजर!
शाळेच्या उत्सवाला जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद व्यक्त करायला माझ्यापाशी खरोखर शब्द नाहीत! नाथ इलोसा – नाथ इलोसा! सारा गाव मांडवाकडे लोटायला लागला होता. त्याच्या आजाराच्या हकिकती ऐकून व्याकूळ झालेल्या त्या कोकणच्या राजा-राण्यांना आणि अर्धनग्न, अर्धपोटी राजपुत्र-राजकन्यांना त्याला असा हसत हसत हिंडताना पाहून काय वाटले असेल ते कळायला – नाथवर त्या लोकांनी जी माया केली आणि नाथने त्या लोकांच्यावर जी माया केली त्या मायेचाच अनुभव हवा! कुठली तरी थरथरत्या मानेची म्हातारी कुळवाडीण येऊन “झिला, ह्या डोळ्याक तरी आलेलो दिसलस जपान् व माज्या पोरा!” म्हणत होती. त्या बिचारीच्या हिशेबी नाथ दिल्लीक ‘राजो’ आसा एवढंच ठाऊक होते. नाथची आई नाथला राजाच म्हणायची. कोकणच्या लोकांनीदेखील त्याला दिल्लीला राजा करून राज्य करायला पाठवला होता. मात्र, हा राजा त्यांच्या झोपडीच्या दाराशी जाऊन त्यांची वासपुस कारायचा. मी गर्दीच्या अलोट प्रेमाचे खूप नमुने पाहिले आहेत; पण, कोकणातल्या त्या खेड्यांतल्या त्या गरीब जनतेचे, तिथल्या अशिक्षितांचे आणि सुशिक्षितांचे जैतापूरच्या मशिदीतल्या मुल्लाजींचे आणि देवळातल्या भटजींचे नाथच्या दर्शनाचे उचंबळून आलेले प्रेम पाहून क्षणभर पुढल्या भाषणाला माझ्या तोंडून शब्द फुटेना! द्वारकाधीश कृष्ण गोकुळात पुन्हा गेला होता की नाही मला माहिती नाही, पण, गेला असता तर त्या गोकुळवासीजनांना काय वाटले असते त्याचे दर्शन मला त्या दिवशी झाले! काँग्रेसच्या अपप्रचाराचा नाथच्या निवडणुकीवर काडीचाही परिणाम कसा झाला नाही, याचे कारण नाथ कधी पुढारी म्हणून कोकणात गेलाच नाही. त्याचा उल्लेख कधी ‘आमचे माननीय नेते’ असा झाला नाही. त्याची आई त्याला ज्या प्रेमाने ‘राजा’ म्हणायची त्या प्रेमानेच कोकणच्या भूमिपुत्रांनी आणि भूमिकन्यांनी त्याला आपला ‘राजा’ मानले होते. त्याला मंत्र्यासारखा लवाजमा लागत नसे. ‘पुढे पोलीस, मागे पोलीस, बाजूला भाट-चारण, आणि मध्ये आपण!, असला उखाणा घालून त्याने स्वतःची प्रतिष्ठा वाढवली नव्हती. कोकणी गाबिताच्या ओसरीवर नाथ बसला की त्या ओसरीचे सिंहासन व्हायचे! तो ज्या झोपडीत शिरे त्या झोपडीचा राजप्रासाद होई! सगळीकडे आनंद शिंपीत जाणारा असा हा त्यांचा पुढारी! एक मत तुम्ही मला दिलेत म्हणजे जिवाची जोखीम माझ्या हाती सोपवलीत, ह्या भावनेने लोकशाहीत त्यांचे प्रतिनिधित्व करणारा आणि हे सारे करताना अक्षरशः उरावर बसलेल्या त्या जीवघेण्या दुखण्यातून सहन कराव्या लागणाऱ्या वेदनेचा कुणालाही पत्ता लागू न देणारा नाथ!
संस्कृतीतले सुंदरांतले सुंदर धागे मिळवून त्याने स्वतःचा जीवनपट विणला होता. त्यातून नाथ पैचे देखणे व्यक्तिमत्त्व तयार झाले होते. नेहरूच्याविषयी कुठल्याशा थोर माणसाने उद्गार काढले होते की, त्यांच्याकडे पाहिले की प्रथम वाटायचे, धिस मॅन न्यू नो फियर. ह्या माणसाला भीरुतेने स्पर्श केला नाही! नाथ पैच्या सहवासात ह्या निर्भयपणाची प्रचीती येत असे; पण, त्या निर्भयपणाला सुसंस्कृतपणाने सोडलेले नव्हते! नाथ लोकसभेमध्ये आपल्या वक्तृत्वाची तोफ डागत असे; पण ज्याला बिलो द वेल्ट- कमरेखालचा वार म्हणतात असला हीन घाव त्याने कधी घातला नाही.
त्याचा एक आवडता श्लोक होता –
न त्वहम् कामये राज्यम् न स्वर्गं ना पुनर्भवम् ।
कामये दुःख तप्तानाम् प्राणिनाम् आर्तिनाशनम् ।।
किती सुंदर प्रार्थना! नाथच्याच शब्दात ह्याचे भाषान्तर करायचे म्हणजे, ‘आम्हांला खुर्च्या नकोत. आम्हांला गाद्या नकोत, आम्हांला पुनर्जन्म नको, आणि आम्हाला स्वर्ग नको. मग आम्हाला काय हवे ? ‘कामये दुःख तप्तानाम् प्राणिनाम् आर्तिनाशनम्’ जे दुःखाच्या ओझ्याने वाकलेले आहेत, जे जखमी आहेत, जे खिन्न आहेत. त्यांच्या डोळ्यांतले अश्रू पुसण्याची, त्यांच्या मानेवरील ओझं कमी करण्याची शक्ती आम्हांला हवी.”
जीवनातले असे प्रयोजन एकदा ठरले की ह्या जन्मीच-इहलोकीच माणसाला मुक्ती मिळालेली असते. ‘दुःखितांचे अश्रू पुसून त्याच्या जीवनात आनंद आणणे’ हे एकदा प्रयोजन ठरल्यावर आयुष्यातली सारी ज्ञानोपासना, कलोपासना, आणि बलोपासना कशासाठी करायची ह्याचे कारण माणसाला सापडेल!
नाथ पै असाधारण वक्ता होता. हे वक्तृत्व त्याने कोणाची खुशामत करण्यासाठी वापरले नाही. अतिशय रसिक होता, काव्याचा भोक्ता होता, स्मरणशक्ती उत्तम होती, त्यामुळे बोलता बोलता मराठी, इंग्रजी, संस्कृत, हिंदी, उर्दू काव्यपंक्ती त्याच्या तोंडून सरसर बाहेर पडत. कविता ही त्याने फावल्या वेळी मन रिझवायची गोष्ट मानली नाही. टागोर, नेहरू आणि गांधी ह्या तिघांच्याही प्रेरणांतून स्फूर्ती घेऊन घडलेले ते व्यक्तिमत्त्व होते!
आमच्याकडे पुष्कळदा राजकीय नेता हा एकांगी असतो. कविता, नाटक, कादंबरी, चित्र, शिल्प वगैरे आपल्या राजकीय मार्गावरून फूस लावून आपल्याला पळवणाऱ्या चेटक्या आहेत, अशी काही तरी त्याची समजूत असते. त्याला जीवनातल्या सौंदर्याचे संपूर्ण दर्शनच झालेले नसते! इतकेच नव्हे, तर ह्या सगळ्या कलांना फक्त राजकीय प्रचारासाठी राबवले पाहिजे अशी काही तरी त्याची समजूत असते ; आणि बऱ्याचशा कलावंतांचीदेखील आपण म्हणजे कोणी तरी ‘खुदाने तबीयतसे बनायी हवी चीज’ आहोत अशी समजूत असते. असल्या भुरट्या राजकारणी लोकांचा आणि भुरट्या कारागिरांचा विचार करण्याची आपल्याला गरज नाही; पण, चांगल्या साहित्याचा आस्वाद घेणाऱ्या नेहरू किंवा नाथ पैसारख्या राजकारणातल्या लोकांना हे पक्के ठाऊक असते की, इंग्लंडचे साम्राज्य गेले आणि ते साम्राज्य स्थापणाऱ्या राजकारणी मुत्सद्द्यांची नावे जरी वाहून गेली तरी शेक्सपिअर वाहून जात नाही!
हिंदुस्थान देशाने पारतंत्र्यात दुर्दैवाचे दशावतार पाहिले. स्वातंत्र्यातही अकरा-बारावे अवतार तो पाहतो आहे; पण-रघुवंशातला एखादा दिलीप राजाचा आणि त्या सिंहाचा संवाद त्याला ‘बाबा रे, तुझे कुलशील ओळख’ म्हणून सांगून जातो. भारतातल्या असल्या थोर कवींनी आणि कलावंतांनी आपल्या पिंडाचे पोषण केले आहे याची जाणीव असलेले फार थोडे राजकीय कार्यकर्ते असतात. कुसुमाग्रजांच्या ‘अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा। किनारा तुला पामराला।’ ह्या ओळींनी आपल्या उमेदीचा अंगार फुलवलेला आहे याची नाथला कृतज्ञ जाणीव होती.
आमचे कवी मंगेश
पाडगावकर ह्यांच्यावर ते रेडिओच्या नोकरीत असताना काही अन्याय झाला होता. नाथ पैना हे कळल्याबरोबर त्यांनी त्या वेळच्या माहिती आणि नभोवाणी खात्याच्या मंत्र्याला ठणकावून सांगितले की, बाबा रे, राजकीय सत्तेचा गर्व बाळगणे व्यर्थ आहे. वाळूवरची ही पावले काळ बघता बघता पुसून टाकील. नाथ पै कोण होता तुम्ही कोण होता हे पन्नास पाऊणशे वर्षानंतर कुणालाही आठवणार नाही. काळावर मात करून उरणार आहेत ते हे कवी आणि त्यांच्या कविता. ही जाणीव ठेवून पाडगावकरांना नम्र होऊन भेटा!’
कवीला नम्र होऊन राजाने भेटले पाहिजे ही भारतीय इतिहासातून घेतलेली परंपरा! अशा नम्रतेच्या भावनेनेच महाराष्ट्राचा एक छत्रपती लोहगांवच्या तुकोबाला भेटायला गेला होता. संस्कृती-संस्कृती म्हणून जपमाळ घेऊन बसणाऱ्यांना हे खरे संस्कृतीचे धागे कळत नाहीत, हेच तर आपले दुर्दैव आहे! गंगेची कावड तहानलेल्या गाढवाच्या तोंडात घालणारा, आणि श्राद्धाला ब्राम्हण येत नसतील तर मी ज्यांना तुम्ही अस्पृश्य म्हणून दूर लोटले आहेत त्यांना भोजन घालून पितरांना तृप्त करीन म्हणणाऱ्या एकनाथांचे अभंग गाताना ‘अश्रू नीर वाहे डोळा’ ह्या अवस्थेत नाचणाऱ्या वारकऱ्यांच्या पुढाऱ्यांनी पंढरपूरच्या मंदिरप्रवेशाला सानेगुरूजी हरिजनांना घेऊन गेले म्हणून विरोध केला होता! असल्या उपरणेवाल्या संतांनी आणि पंतांनी आयुष्यभर नुसती टाळे कुटली! महारांना आम्ही देवळात नेणार ही चळवळ करायला हवी होती! ह्या वारकऱ्यांच्या ह. भ. प. नेत्यांनी ते ओझे टाकले सानेगुरूजींच्या खांद्यावर!
कोकणातल्या दारिद्रयाने अंतःकरणाचे बांध फुटायला हवे होते ते आज पंचवीस वर्षे सत्तेवर राज्यकर्त्यांचे. ती जबाबदारी पडली सत्ता नसलेल्या पक्षातल्या नाथच्या खांद्यावर, कारण त्या जनतेच्या मनात शिरणारा नेताच त्या मतदारसंघात गेला नाही! इतकेच नव्हे, तर मुस्लिम लीगसारख्या जात्यंध पक्षाशी समझोता करणाऱ्या काँग्रेसला पार्लमेंटचे भूषण असलेल्या नाथ पैंसाठी जागा सोडता आली नाही ! जनतेच्या कैवाराचा मक्ता घेतलेल्या ह्या पक्षाने हृदयविकाराने पीडलेल्या नाथविरुद्ध उमेदवार उभा कोण केला? तनखे खाणारा एक माजी संस्थानिक!!
पुन्हा एकदा नाथ पैला निवडणूक प्रचाराची दगदग करायला लागली. विरोधी पक्षाचा एक उत्तम संसदपटू आम्हांला वेळोवेळी जागे करायला हवा आहे म्हणून नाथ पैच्या विरुद्ध आम्ही उमेदवार उभा करणार नाही, असे जर काँग्रेसचे नेते म्हणाले असते, तर त्यामुळे काँग्रेसची एक सीट गेली तरी शंभर सीट्स मिळवल्याइतकी इभ्रत वाढली असती. निवडणूक हा लोकशाहीचा पाया आहे, हे खरे आहे; पण, नाथच्या बाबतीत तत्त्वाला मुरड घालता तपशिलाला मुरड घालता आली असली. खुद्द नेहरू, पंत, शास्त्री यांना नाथचे अतोनात कौतुक होते! विरोधाच्या भाषणानंतरदेखील त्यांनी नाथचे अभिनंदन केलेले आहे.
पार्लमेंट ही वादविवाद सभा आहे; तिथे उत्तम वक्तृत्वाने आपली बाजू मांडणारा कुठल्याही का पक्षाचा असेना, नाण्याची दुसरी बाजू दाखवत असतो; पण, खुर्ची सुटेल ह्या एकाच गंडाने पछाडलेल्या राजकीय नेत्यांचा विवेकच सुटतो; कारण, त्यांच्यापैकी फार थोड्यांचा लोकशाहीवर खऱ्या अर्थाने विश्वास असतो. हरीन्द्रनाथ चट्टोपाध्याय एकदा पार्लमेंटमध्ये म्हणाले होते की, ‘व्हाइट व्हाइट व्हाइटर द कॅप ब्लॅक ब्लॅक ब्लॅकर द हार्ट! दुष्काळी विभागाची पाहणी करायला जातानासुद्धा नवरदेवांसारखे रेशमी खादीचे अभ्रे घालून, तलम धोतरे नेसून, आणि सोबत फोटोग्राफर आणि पत्रकारांचा लवाजमा घेऊन हिंडणारे हे मंत्री आणि त्यांचे पित्ते पाहिले की वाटते की, उन्हातान्हात खडी फोडत बसलेल्या त्या अभागी माणसांच्या हातांतला हातोडा आपल्या दिशेला एखाद्या दिवशी भिरकावला जाणार आहे, याची अजूनही कधी यांना जाणीव होत नाही! कधी तरी साध्या माणसांसारखी माणसे होऊन हिंडा!
आमचा नाथ पै आंतरराष्ट्रीय मेळाव्यात थक्क करणारे वक्तृत्व गाजवून आलेला. कोकणीत सांगायचे तर ‘इलायतेतलो बालिष्टर!’ किती सहजपणाने माणसात शिरायचा. सुशिक्षित तरुणांना वाटायचे हा माझा मित्र; खेड्यातल्या अशिक्षित म्हातारीला वाटायचे हा नातू माझा. दिल्लीच्या बादशाही मेजवान्यांत ज्या सहजतेने तो काटे-चमचे चालवीत असे तितक्याच सहजतेने गरिबा घरची आंबीलही खात असे. कोकणात चक्रीवादळ झाले. नाथ पै पावसापाण्याची, वाहत्या ओढ्यानाल्यांची पर्वा न करता सारे उध्दस्त कोकण तुडवीत होता. रत्नागिरीचे सरकारी अधिकारी पाहणीसाठी पोचायच्या आधी दिल्लीहून नाथ पै हजर! होड्या पाण्यात घालणे कठीण असलेल्या खाड्यांतून हा पार्लमेंटचा सभासद पोहून पलीकडे जात होता. उद्ध्वस्त झोपड्यांबाहेर बसलेल्या गोरगरिबांना धीर देत होता. मित्रहो, नौखालीतल्या गुंडांच्या वासनेला बळी पडलेल्या स्त्रियांचे अश्रू पुसायला धावणाऱ्या राष्ट्रपित्याचे नाव घेण्याचा अधिकार नाथ पैला होता! डोक्यावर टिनोपॉलने धुतलेली टोपी घालून सहकारी संस्थांतून गांधींच्या पुतळ्याच्या साक्षीने डाव्या आणि उजव्या हाताने पैसै खाणाऱ्या लोकांनी जो गांधीवध केला तसा त्यांच्या कट्टर शत्रूनाही करता आला नसता! आज मंत्रिपदावर विराजमान असलेले कितीजण पोर्तुगिजांच्या गोळ्या खायला गेले होते विचारा! मोराजीभाईंनी तर सत्याग्रहींना बसेसच वापरू दिल्या नाहीत! हजारों तरुण रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत तिथे गेले होते. सारा देह रक्ताबंबाळ करण्यासाठी! अत्र्यांनी त्या वेळच्या अवसानघातकी धोरणाचे फार सुंदर वर्णन केले होते हे म्हणजे, सीतेच्या मुक्तीसाठी निघालेल्या मारुतीचे रामानेच शेपूट ओढून त्याला मागे खेचण्यापैकी होते.
अन्यायाविरुद्ध चिडून उठणारा, आपल्या वक्तृत्वाने प्रतिपक्षाला दे माय धरणी ठाय करणारा, आणि जिवाची पर्वा न करता दुःखितांचे अश्रू पुसायला धावणारा नाथ पै हा काही नुसता संतप्त तरुण नव्हता. त्याच्या क्रोधाने संयम सोडला नाही. त्याने फक्त पर्वा केली नाही ती स्वतःच्या साडेतीन हात देहाची! काय ही आपल्या देशाची स्थिती, म्हणून तो जन्माचा सुतकी चेहरा करून बसला नाही! त्याची रसिकता त्याला कधीही सोडून गेली नाही.
गोखल्यांच्या बाबतीत गांधीजींनी म्हटले आहे की, ‘ही वॉज शिव्हलरस टू ए फॉल्ट’ शिव्हलरी हा महाकाव्यातल्या नायकाचा गुण आहे. महाकाव्यात नायकालाही नायिकेची ओढ असते, आणि खलनायकालाही असते; पण, खलनायकात सुजनता नसते. परवाच मी विनोबांच्या एका लेखात वाचले की, वेदांत सौजन्याला ‘वसु’ म्हटले आहे, ही वसुधा म्हणजे सौजन्याची शोभा अंगावर बाळगणारी आहे. ही सुजनता सुटू नये.
खाडिलकरांनी रुक्मिणीच्या तोंडी कृष्णाला उद्देशून ‘सुजन कसा मन चोरी’ म्हटले आहे. असले असंख्यांची मने चोरणारे सौजन्य नाथ पैमध्ये होते; आणि म्हणून त्यांच्या लोकशाहीच्या निष्ठेमध्ये सुजन समुदायाचे जनतंत्र हे सुजनतंत्र व्हावे ही तळमळ होती. लोकांना काळ्या बाजाराने लुबाडणाऱ्या जनांचा तो प्रतिनिधी नव्हता. आणि म्हणूनच कायदेबाजीचा आधार घेऊन चतुर कायदेपंडित लोकशाहीत लोकांच्या हिताची पायमल्ली करणाऱ्या जमीनदाराची बाजू घेऊन उभे राहिले त्या वेळी नाथ पैंनी आपले सुप्रसिद्ध घटनादुरुस्ती विधेयक मांडले. त्याने सांगितले, “लोकशाहीत सर्व सत्तेचा उगम आणि आधार जनता असते. आमच्या सार्वभौमतेची ठेव म्हणजे आमची जनता आहे. घटना हे त्या सार्वभौमिकतेचे अंग आहे. आणि त्यात बदल करण्याचा हक्क जनतेला असायला पाहिजे. घटना श्रेष्ठ की पार्लमेंट श्रेष्ठ, हा मुळी प्रश्नच नाही. जनता श्रेष्ठ की घटना श्रेष्ठ, हा प्रश्न असून त्याचे उत्तर अगदी स्पष्ट आहे, ते म्हणजे जनता!” एडमंड बर्कचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. “ए कॉन्स्टिट्युशन दॅट कॅनॉट बी अमेंडेड इज ए डेड कॉन्स्टिट्युशन. जी घटना बदलता येत नसेल ती घटना नसून घटनेचे थडगेच होय!”
नाथ पै हा विद्वजनसभेत विद्वान होता. सामान्यांत स्वतःचे सारे मोठेपण विसरून वागणारा साधा माणूस होता. फर्डा वक्ता असे ज्याचे वर्णन करावे अशा तोडीचा वक्ता. आणि त्या वक्तृत्वाला कृतीचे तोरण होते. असा आमचा हा मित्र. त्याची मैत्री लाभली हे आमचे भाग्य. त्याचे ते अकाली निधन हे आमचे दुर्भाग्य, त्याचे नव्हे!
पक्षीय राजकारणाच्या त्या भयानक वातावरणात राहूनही त्याने कधी जीवनावरचा विश्वास ढळू दिला नाही. दिल्लीत मी असताना त्याच्या घरी गप्पा-गोष्टींत कित्येक रात्री आम्ही जागून काढल्या. दिवसा पार्लमेंटातले राजकीय वातावरण खूप तापलेले असायचे. ती सभा गाजवून नाथ एखाद्या नटाने नाटक संपल्यावर रंग पुसून रंगमंदिरातून बाहेर पडावे तसा पार्लमेंटातून आम्हा मित्रमंडळींच्या अड्ड्यात यायचा. आम्हांला कधी गप्पांची लहर आली, आणि नाथला फोन केला की एखाद्या वेळी सांगायचा, “पुरुषोत्तम, आज नको. आज होमवर्क आहे!” पार्लमेंटमधील रीपोर्टस् बारकाईने वाचायचे. तिथले बरेचसे सभासद ते रीपोर्ट उघडूनही पाहात नसतात रद्दीवाल्यासाठी राखून ठेवतात! नाथने एम. पी. म्हणून अंगावर घेतलेल्या जबाबदारीत कधीही कुचराई केली नाही. नाथ पैंचे पार्लमेंटमधले वक्तृत्व ऐकणे हे एखादी मैफल ऐकल्यासारखे आनंदायक तर होतेच, पण, प्रतिपक्षाला विचार करायला लावणारे असायचे, ती नुसतीच फायर वर्क्स- आतषबाजी नव्हती.
मला आठवतेय, एकदा नाथ पै बोलायला उभा राहिला. दुसऱ्या कामकाजासाठी निघालेले नेहरू वळून परत फिरले. आणि शब्दन् शब्द टिपून घेतल्यासारखे ऐकत बसले. मला कित्येकदा वाटे की, नाथचा हा इथला पराक्रम पाहण्याची संधी त्याच्या कोकणातल्या गरीब मतदारसंघाला मिळायला हवी होती पण, नोकरीवर नेमलेल्या एखाद्या गरीब कारकुनाने मालकाला आपल्या कामाचा रिपोर्ट द्यावा तसा तो सतत आपल्या मतदार संघात येऊन त्या गरीब जनतेला तिकडले वर्तमान सांगायचा. आपल्या घटनेत कोणती दुरुस्ती व्हायला हवी, हा अवघड विषयदेखील अतिशय सोप्या शब्दांत त्याने समजावून सांगितला होता. लोकशाहीचा धर्म अशा सोप्या शब्दांत समजावून सांगणारा वक्ता माझ्या तरी पाहण्यात नाही.
राजकीय सभेतला हा नेता उत्तम गाण्याच्या मैफलीत किंवा नाटक पाहायला चार प्रेक्षकांतला एक प्रेक्षक होऊन बसत असे. दिल्लीला कुमार गंधर्वाचे गाणे करून भारतीय संगीत किती वरच्या दर्जाला पोहोचू शकते हे पाहा म्हणून सांगायची ओढ नाथ पैला होती. शेवटी लोकशाहीची स्थापना करायची कशासाठी? उत्तम कला, उच्च विद्या, चांगले व्यवसाय ही कुठल्या एका वर्गाची मिरास राहता कामा नये म्हणूनच ना? जीवनातले हे आनंद सगळ्यांना लाभावे, आणि ते लाभण्यासाठी साऱ्या समाजाला आर्थिक आणि मानसिक स्थैर्य मिळावे यासाठी तर लोकशाहीची धडपड!
मला जी माझी गाणी म्हणायची आहेत त्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, यासाठी ही सारी घडपड आहे. त्या उच्चार आणि विचार स्वातंत्र्यावर जर दडपणे येणार असतील तर त्याच्याविरुद्ध मी उठेन, अशी त्याची प्रतिज्ञा होती. लुई मालच्या ‘फैंटम इंडिया’ वर जेव्हा भारत सरकारने बंदी आणली तेव्हा नाथ पैने सरकारच्या या भित्रेपणाचा धिक्कार केला होता. असल्या चित्रपटांना बंदी हा उपाय नव्हता. आमचे हुसेन किंवा यशवन्त चौधरी यांना भारत म्हणजे काय, या विषयावरच्या डॉक्युमेंटरीज करायला लावून जगाला भारतदर्शन घडवुया असे त्याने सांगितले होते! आणि म्हणून कलेतल्या महात्मतेने तो प्रभावित होत होता. सावरकरांचे आणि समाजवादी विचारसरणीच्या लोकांचे राजकीय मतभेद असतील, पण एक थोर साहित्यिक म्हणून आमच्या साहित्य ॲकॅडेमीने त्यांचा गौरव केला नाही याची त्याला खंत होती. ती त्याने जाहीर रीतीने प्रकट केली होती.
बेचाळीस सालच्या लढ्याच्या कालापासूनचा त्याचा आणि माझा परिचय. आपल्या स्वप्नातला आदर्श नायक तत्कालीन तरुण-तरुणींना नाथ पैमध्ये दिसला. त्याचे आयुष्यच मुळी एखाद्या सुंदर पण शोकान्त दीर्घकाव्यासारखे होते ! भारतीय संस्कृतीत आपण कृष्णाला पूर्णपुरुष किंवा पुरुषोत्तम मानतो. बालपणी गोपाळांबरोबर गाई वळणारा, बासरी वाजवणारा, पौगंडदशेत कंस-चाणूरांचे मर्दन करणारा, आणि भारतीय युद्धात दुबळ्या मनांना कर्तव्याची जाणीव करून देणारा असा थोर राजकारणी, अशा अनेक भूमिका यशस्वीरीतीने पार पाहणारा कृष्ण हा आमचा आदर्श आहे. कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात, काव्यात आणि संगीतात रमलेला नाथ, पुढे बेचाळीसच्या लढ्यात बॉम्ब उडवण्यात आणि छातीवर लाठ्या झेलण्यात पुढे सरसावलेला नाथ, प्रेमळ पत्नी, आदर्श पुत्र, भावंडांवर अलोट प्रेम करणारा भाऊ, उत्तम मित्र, लोकसभेत पराक्रम गाजवणारा नेता अशा किती तरी भूमिका नाथ पैने यशस्वी रीतीने पार पाडल्या, आणि आधुनिक काळात पुरुषोत्तमाचे दर्शन घडवले!
अखेरच्या काळात घटनादुरुस्तीच्या बिलाच्या निमित्ताने पार्लमेंटमधल्या स्वार्थाने मूढ झालेल्यांना तर त्याने लोकशाहीची गीताच समजावून सांगितली. असले हे सुंदर, संपन्न, पराक्रमी व्यक्तिमत्त्व आपल्याशी स्नेहाने बांधलेले आहे. हा विचार माझ्याप्रमाणे आपल्यापैकी अनेकांच्या मनाला किती आल्हाददायक असायचा. आज आमच्या राजकीय क्षेत्रात अशी किती माणसे आहेत? त्यांच्यापैकी बहुतेकांकडे पाहिले की मला अनिलांच्या ओळी आठवतात, “जो तो जागा धरुन आहे. नाही तर अडवून आहे, याची त्याला फूस आहे घराघरात घूस आहे!”
नाथने एकदा पार्लमेंटात ह्या सरकारचे वर्णन केले होते. “गव्हर्मेन्ट ऑफ द इन्कॉम्पेिटंट बाय द करप्ट फॉर द हेल्पलेस!”
“कार्यक्षमतेच्या बाबतीत पूज्य असणाऱ्यांचे, लाचलुचपतीने बरबटलेल्यांचे, अर्गातकांसाठी असलेले हे सरकार आहे.”
काल-परवाच आमचे कृषिमंत्री म्हणाल्याचे मी वर्तमानपत्रात वाचले. ते म्हणाले, दूधबदल लोकांनी ग्रेसफुली स्वीकारला! हे विधान वाचून अत्र्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे आम्हाला हसावे की रडावे ते कळेना! आता यापुढे मी आणखी एखाद्या मंत्र्याच्या विधानाची वाट पाहतोय की, महाराष्ट्रातला दुष्काळ मराठी जनतेने ग्रेसफुली स्वीकारला! पाण्याची टंचाई जनता ग्रेसफुली स्वीकारत आहे. ही मंडळी जर सोबत आपला लवाजमा न घेता हरुन अल् रशीदसारखी चाळीचाळीतून किंवा खेड्यापाड्यांतून हिंडून येतील तर त्यांना कळेल की, जनता हे ग्रेसफुली स्वीकारण्याऐवजी वाक्यातल्या प्रत्येक शब्दापुढे एक एक फुली घालून व्यक्त करायच्या लायकीचा शब्द घालून प्राप्त परिस्थितीला तोंड देताहेत!
शेतकऱ्यांना दुधाचे भाव वाढवून दिले म्हणून म्हणे काही लोकांच्या पोटात दुखते आहे, आणि ते वाढवून दिलेले भाव एस.टी.च्या वाढलेल्या तिकिटातून पुन्हा सरकारजमा होताहेत त्याचे काय? आमच्या जनतेला दूध मिळत नाही म्हणून ती दूधखुळी आहे, अशी काही तरी ह्या मंत्रिमहाशयांची समजूत होती! इथे सत्ताधीश कोण आहे? तुम्ही की जनता? ज्यांच्यापुढे तुम्ही नम्रपणाने जायला हवे त्यांच्यापुढे बॅंड-वाजंत्री लावून जाता, आणि जनता समोर हात बांधून उभी! परवाच मी इथल्या आकाशवाणी केंद्राच्या दारात नवबुद्ध समाजातली मंडळी सत्याग्रहाला बसलेली पाहिली. त्यांची मागणी काय? तुम्ही तुमच्या देवांच्या प्रार्थना लोकांना ऐकवता, आमच्या देवाची प्रार्थना का नाही ऐकवीत? खरे तर ह्या देवांच्या प्रार्थनांनी काव आणलाय. माझ्या भाच्याला मी परवा विचारले, अरे आज वार कुठला तो म्हणाला, ते काय रेडिओवर दत्त दिगंबर दैवत माझे चाललेय! आज गुरुवार असणार! आता मला सांगा, रेडिओच्या लायन्सची फी काय फक्त हिंदूच भरतात मग गौतम बुद्धानेच तुमचे काय वाकडे केलेय! बुद्धवाड्यांतल्या त्या दरिद्री जीवनात कानांवर बुद्धदेवाची आराधना पडली तर बाकीच्या गायांत काय हलकल्लोळ उडेल! वास्तविक त्या बुद्धजनांनी आकाशवाणीवाल्यांची चूक दाखवून दिली होती. त्यांचे आभार मानायला हवे होते. ते सोडून तिथे चक्री उपास करायला लावता. तरी बरे, आमच्या राष्ट्रध्वजावर एका बौद्धधर्मीय सम्राटाचे अशोकचक्र आहे! पण बुद्ध समाजाच्या नशिबातले शोकचक्र फिरायचे काही थांबत नाही! साधी मागणी, बुद्धदेवाची गाणी म्हणा. पण नाही. पुढच्या आठवड्यात मंत्री फतवा काढतील की, जनता रेडिओवरची गाणी ग्रेसफुल्ली स्वीकारीत आहे!
लंडनचा प्राइम मिनिस्टर रस्त्यात ट्रॅफिक जॅम् झाल्यावर उशीर होईल म्हणून आपल्या कचेरीकडे चालत निघतो, पण दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या मंत्र्याना जोडीला भाट-चारण, पत्रकार, फोटोग्राफर पोलीस असा लवाजमा घेऊन बरात काढल्याखेरीज जाता येत नाही! का आपले, खाईन तर तुपाशी ह्या चालीवर ‘जाईन तर उद्घाटनाला नाही तर बाईच्या लोटांगणाला’ हा नवा मराठी बाणा समजायचा!
अशा वेळी कोकणात वादळ झाले त्या वेळी सरकारी अधिकारी पोचायच्या आधी कोकणातल्या खाड्या पोहत जाणारा, हृदयविकार असूनही डोंगर तुडवणारा नाथ पै आठवतो. त्याचे पुण्यस्मरण करावेसे वाटते. दिवाभीतांच्या राज्यात असल्या प्रकाशाच्या पुत्राची उणीव अतिशय उत्कटतेने भासते. सगळ्यांनाच त्याची ही झेप मानवणार नाही पण, निदान आपल्या दुबळेपणाची जाणीव होणे हेही कमी नाही.
मी परवाच एका ठिकाणी म्हणालो, की आमच्या देशात सर्वात मोठा दुष्काळ हा अन्नधान्याचा नाही, मोठा दुष्काळ आहे तो सहानुभूतीचा दुष्काळ! लोकशाहीत ह्या सहानुभूतीचा सुकाळ हवा. मी आणि माझे याची जागा आम्ही आणि आमचे ह्या शब्दांनी घ्यायला हवी. आपल्याकडे पूर्वी एक कुळाचार होता. कहाण्यांतून त्याचा उल्लेख येतो. घरातला यजमान जेवायला बसण्यापूर्वी म्हणायचा, “अरे पहा रे, गावात कोणी उपाशी-तापाशी नाही ना?” पुण्यात इतकी लग्ने होतात, किती लोक म्हणाले, की महाराष्ट्रात दुष्काळाने लाखो माणसे उपाशी-तापाशी आहेत. आपण जेवणावळ नाही घालायची. आपण अहेर नाही घ्यायचा. सरकारने शंभरांची सवलत दिली आहे ना करा शंभरा-शंभराच्या तीनचार पंक्ती. हे मी अशिक्षित समाजाबद्दल बोलत नाही चांगली भारतीय संस्कृतीवर भरपूर गहिवर आणि ढेकर काढत बोलणारी माणसे! तर जे कुणी ह्या पंगती घालीत नाहीत. त्यांची वर्तमानपत्रात अनाउन्समेन्ट काय, सरकारी निर्बंधामुळे पंगत रद्द करण्यात येत आहे. म्हणजे सरकारी निर्बंध आहे म्हणून पंगत रद्द! लाखो लोक उपाशी आहेत. अशा वेळी आपण श्रीखंड ओरपू नये म्हणून नाही! हा समाज अशा सहानुभूतिशून्य रीतीने वागायला लागला तर ही लोकशाही टिकायची कशी?
लोकशाही हा नित्याच्या आचरणाथा धर्म आहे. कुठल्या तरी सभागृहात हात वर करायला जमणे म्हणजे लोकशाही नव्हे. नाथ पैचे सारे आयुष्य हा लोकशाहीचा आणि ती टिकण्यासाठी अवश्य असलेल्या समाजवादी विचारांचा प्रसार करण्यात गेले. त्यासाठी त्यांनी अखेर आपल्या जिवाचे मोल दिले.
त्याच्या पुण्यतिथीचा हा दिवस! जीवनातला त्याचा पराक्रम पाहून मन आनंदाने उचंबळून येत असे. त्याची व्याख्याने ऐकायला कान आतुर असत. त्याच्या सहवासात तासन् तास काढावे अशी इच्छा असायची. एवढ्यातच त्याने आमचा कायमचा निरोप घेतला!
बड़ी शौकसे सुन रहा था जमाना, तुमही सो गये दास्ताँ कहते!
तू काय सांगतोस ते आम्ही मजेत ऐकत होतो, आणि सांगता सांगता तूच झोपून गेलास! ह्या ओळीतले कारूण्य अशा वेळी खूप तीव्रतेने जाणवते. नाथच्या स्मृतीला माझे विनम्र अभिवादन!
(साप्ताहिक साधनाच्या सौजन्याने)