‘बॅरिस्टर नाथ पै – असाही एक लोकनेता’ हे पुस्तक डॉ. विद्याधर करंदीकर यांनी लिहिलं असून ते कणकवलीतील आनंद आळवे यांनी प्रकाशित केलं आहे. बॅरिस्टर नाथ पै यांची ओळख, कार्यकर्तृत्व वाचकांना थोडक्यात कळावं, यासाठी हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे.
असाही एक लोकनेता
इतिहासाच्या सामर्थ्य आणि मर्यादांच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज ‘लोककल्याणकारी राजा’चे मिथक बनले. नाथ पैदेखील लोकमंगलाची कामना करणाऱ्या लोकप्रतिनिधीचे मिथक बनले. ‘सौंदर्य-उपासना म्हणजे राजकारण’ ही त्यांची राजकारणाची व्याख्या होती. अन्याय हा कुरूप आहे म्हणून त्याविरुद्ध लढायला पाहिजे.दारिद्र्य कुरूप आहे म्हणून त्याविरुद्ध संघर्ष करायला पाहिजे.शोषण हे कुरूप, गलिच्छ आहे, म्हणून त्याविरुद्ध लढायला पाहिजे असे नाथ पैंनी मानले. ‘राजकारण हा सौंदर्याचा हव्यास आहे’ असे मानणारे नाथ पै मिथक बनण्याच्या उच्च पातळीपर्यंत पोहोचले, यात नवल ते कोणते?
न त्वहं कामये राज्यं न स्वर्ग नापुनर्भवम्।
कामये दुःखतप्तानां प्राणिनाम् आर्तिनाशनम् ॥
हा नाथ पैंचा एक आवडता श्लोक होता. मला राज्य नको, स्वर्ग नको, अपुनर्भवम् म्हणजे मोक्षही नको.दुःखसंतप्त जीवांचे दुःख नाहीसे करण्याचे सामर्थ्य तू मला दे, असे सुचविणारा हा श्लोक आहे. नाथ पैंचे अवघेशील, अवघे चारित्र्य या श्लोकात प्रतिबिंबित झालेले आहे.
पु. ल. देशपांडे यांनी नाथ पैंना ‘दिवाभीतांच्या म्हणजे घुबडांच्या जगात जन्माला आलेला प्रकाशाचा पुत्र’ असे म्हटले होते. आमच्या आणि आमच्या नंतरच्या पिढ्यांचे दुर्दैव असे, की दिवाभीत खूप चांगले, त्यांनाही काहीतरी न्यायनीती असते, असे वाटावे अशी मंडळी राजकारणात आणि आपल्या सभोवताली आहेत. अधिक वाईट असे की त्यांनाच आज प्रतिष्ठा आहे. या काळात नाथ पैंविषयी मुला-नातवंडांना काही सांगावे, तर ती विस्मित होऊन विचारतील, की असे खासदार खरेच होते? सतत लोकांचा विचार करणारे? सौंदर्य-उपासना म्हणजे राजकारण असे मानणारे?
आश्वासकवृत्तीने त्यांना सांगायला हवे, की आज जरी ही दंतकथा वाटत असली, तरी फारफार वर्षांपूर्वी नाही, केवळ त्रेचाळीस वर्षांपूर्वी असा एक माणूस आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या कोकणात वावरत होता. त्याचे स्मरणही आपल्याला बळ देईल. अंधारातून प्रकाशाकडे नेईल. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही प्रार्थना सार्थ करील.
विश्वास ठेवा की नाथ पै ही केवळ दंतकथा नव्हती. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील ते एक चंदनगंधित आणि सोनेरी पान होते!
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ‘नररत्नांची खाण’ असे म्हणतात. नाथ पैंचा जन्म झाला तेव्हा त्या काळच्या मुंबई इलाख्यातला ‘रत्नागिरी’ हा दक्षिणोत्तर सव्वादोनशे किलोमीटर लांबीचा एकच एक मोठा जिल्हा होता. या जिल्ह्याच्या दक्षिणेकडील वेंगुर्ले या निसर्गरम्य ठिकाणी नाथ पैंचा जन्म २५ सप्टेंबर १९२२ रोजी झाला.
पंढरपूरच्या विठ्ठलाचा कृपाप्रसाद मानून या बालकाचे पाळण्यातील नाव ‘पंढरीनाथ’ असे ठेवण्यात आले. त्याचे लघुरूप ‘नाथ’ बनले आणि तेच प्रचलित झाले. नाथ पैंची आई तापीबाई आणि भावंडे त्यांना प्रेमाने ‘राजा’ म्हणून हाक मारीत. अनेक वर्षे कोकणी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजविणारे, अशा अर्थाने ते ‘कोकणचा राजा’ ठरले. याचे प्रसादचिन्हच तर त्यांच्या आईने त्यांच्यासाठी योजिलेल्या संबोधनात नसेल?
नाथ पैंचे वडील बापू अनंतराव पै, ज्या काळात शिक्षण दुर्लभ होते, अशा काळात पदवीधर (बीए) झाले होते. काही काळ त्यांनी पोस्टमास्तर म्हणून काम केले. वारंवार होणाऱ्या बदल्या त्रासदायक ठरू लागल्यामुळे त्यांनी या नोकरीचा राजीनामा दिला व ते वेंगुर्ले येथील ए.पी. मिशन हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करू लागले.
नाथ पैंना पितृछत्र मात्र अगदी अल्पकाळ लाभले. नाथ केवळ आठ महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले. संपूर्ण कुटुंबाला हा मोठाच धक्का होता. नाथांच्या आईने कर्तव्यबुद्धीने सर्व भार स्वत:च्या खांद्यावर घेऊन मुलांचे पालनपोषण केले. त्यांच्यावर संस्कार केले आणि त्यांना जगाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध केले.
नाथांना तीन भाऊ आणि तीन बहिणी होत्या. अनंत, श्याम आणि रामचंद्र हे तीन भाऊ आणि गंगाबाई, मंजुळा आणि चंद्रभागा अशा तीन बहिणी. याशिवाय त्यांना इंदिरा (अक्का) नावाची सावत्र बहीण होती, जिच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. नाथ पै यांचे आजोळ आडारी ता. वेंगुर्ले येथे होते व हे आजोळचे आडारकर कुटुंब धनसंपन्न, विद्यापूजक आणि कलासक्त म्हणून विख्यात होते. कोकणच्या निसर्गाचे आणि कुटुंबीयांचे संस्कार नाथ पै यांच्या जडणघडणीमागे होते.
लहानपणी नाथांना प्लेग या भयानक आजाराची लागण झाली. त्या काळी ‘प्लेग’ हे प्राणसंकट मानले जाई. आई आणि मोठे बंधू (अनंत तथा भाई) यांनी मन:पूर्वकतेने केलेल्या सेवा-शुश्रूषेमुळे नाथ या आजारातून वाचले. या आजारानंतर ते सर्वांचे अधिकच आवडते झाले.
नाथ पैंचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ले येथे झाले. आपल्या वडिलांच्या पश्चात आपली आई कष्टपूर्वक आपल्याला वाढवीत आहे, याची जाण नाथांना बालपणापासूनच होती असे दिसते. आपला अभ्यास ते मन लावून करीत. गणितासारख्या अवघड वाटणाऱ्या विषयासाठी स्वतंत्रपणे वेळ देत. फायनलची, म्हणजे आजच्या सातव्या इयत्तेची परीक्षा त्यांनी मालवण केंद्रावर जाऊन दिली. त्या काळी हुशार विद्यार्थ्यांना एका वर्षात अधिक इयत्तांच्या परीक्षा देता येत असत. नाथांनी फायनलनंतर रांगणेकर हायस्कूलमधून एका वर्षात तीन इयत्ता पूर्ण केल्या.
बालपणीतील नाथ पैंनी जोपासलेल्या दोन छंदांविषयी लिहायला हवे. त्यातला पहिला छंद निसर्ग निरीक्षणाचा. वेंगुर्ले हे त्यांचे जन्मगाव अत्यंत निसर्गसुंदर आहे. तिथल्या किनाऱ्यांवरून नाथ तासंतास समुद्राकडे पाहत बसत. उंचच उंच माड त्यांच्या कर्तृत्वाला आवाहन करीत. कोकणात नारळाच्या झाडाला ‘माड’ म्हणतात. महादंड, मोठे खोड असलेला वृक्ष, म्हणून तो माड. या माडाने जणू नाथ पैंच्या व्यक्तिमत्त्वाला ताठ कणा दिला. मान उंच करून आकाशाकडे पाहायला शिकविले. उंचावरून त्यांना मच्छिमारांची कौलारू घरे दिसत. मच्छिमारांचे कष्टांनी भरलेले आयुष्य दिसे. एकीकडे निसर्गाचे सुंदर आणि भव्य रूप, तर दुसरीकडे काळीज कुरतडणारे दारिद्र्य अशी परस्परविरोधी दृश्ये नाथांनी बालपणीच पाहिली.
त्यांना बालपणी दुसरा छंद लागला तो बासरी वाजविण्याचा. तन्मय होऊन ते बासरी वाजवीत असत. मोठेपणी ‘एक कलासक्त राजकारणी’ अशी प्रसिद्धी नाथ पैंना लाभली. या कलासक्तीची पाळेमुळे त्यांच्या बालपणीच्या या छंदात आणि दशावतारी नाटकांनी केलेल्या संस्कारांमध्ये असतील का?
माध्यमिक शिक्षणासाठी नाथ बेळगावला आले. त्यांच्या बंधूंनी बेळगावला दुकान उघडले होते. आर्थिक स्थैर्य आले होते. बेननस्मिथ या प्रख्यात मिशनरी शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. या शाळेच्या नियमानुसार ‘बायबल’चा अभ्यास अनिवार्य होता. या अभ्यासाचाही नाथांना भावी आयुष्यात उपयोग झाला. शाळेत होणाऱ्या वादविवाद स्पर्धांमध्ये नाथ सहभागी होत. त्यांच्या अमोघ वक्तृत्वाचा पाया या शाळेत घातला गेला. शालेय वयातच नाथ इंग्रजी वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत. इंग्रजी, मराठी आणि संस्कृत अवतरणे लक्षात ठेवून योग्य जागी वापरीत. गुणाला ‘श्रुतयोजन’ असे म्हणतात आणि उत्तम वक्तृत्वाचा तो निकष मानला जातो.
नाथ पैंचे दुसरे बंधूभाऊ पै सार्वजनिक कामांमध्ये रस घेत. व्यायामशाळा, सार्वजनिक गणेशोत्सव यांमध्ये पुढाकार घेत. त्यांच्याबरोबर काम करताना नाथांना सार्वजनिक कार्याचे बाळकडू मिळाले. काळही नवी वळणे घेत होता. महात्मा गांधींचे नेतृत्व देशाने स्वीकारले होते. स्वातंत्र्याची ऊर्मी घराघरात आणि मनामनात पोहोचली होती. इंग्रजांविरुद्धचा असंतोष सार्वत्रिक होता. नाथ पैया काळात सुमारे अठरा वर्षांचे युवा-बृहस्पती होते. काळाचे निरीक्षण ते सजगपणाने करीत होते.
१९४० मध्ये नाथ मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पुढच्या अभ्यासासाठी बेळगावच्या लिंगराज महाविद्यालयात दाखल झाले. या महाविद्यालयातून अनेकवक्तृत्व स्पर्धांची पारितोषिके त्यांनी मिळविली. नवी क्षितिजे त्यांना खुणावू लागली.
इंटरमीजिएट परीक्षेसाठी त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. टिळक-आगरकरांचे हे महाविद्यालय, याचेही आकर्षण असू शकते. व्यक्तिमत्त्वविकासाच्या अनेक संधी नाथांना या महाविद्यालयातून मिळाल्या. गोखले करंडक वक्तृत्वस्पर्धेसाठी महाविद्यालयातर्फे नाथ पैंची निवड झाली. वक्तृत्वासाठीचे प्रथम पारितोषिक त्यांना मिळालेच आणि गोखले करंडकही फर्ग्युसन महाविद्यालयाला मिळाला. अलाहाबाद येथे होणाऱ्या उत्स्फूर्त इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिकही नाथांना मिळाले.
स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या भारतात संसदीय लोकशाही रुजावी, या हेतूने फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे पार्लमेंट बनविले जाई. या पार्लमेंटमध्ये पुरवठामंत्री म्हणून नाथ पैंची निवड झाली होती. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये होत असलेले हे प्रयोग किती महत्त्वाचे होते, हे नंतरच्या काळाने सिद्धही केले. भारताचे तीन पंतप्रधान – इंदिरा गांधी, पी. व्ही. नरसिंहराव आणि विश्वनाथ प्रतापसिंह – फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी होते. ज्येष्ठ समाजवादी नेते ग. प्र. प्रधान हे या विद्यार्थी पार्लमेंटमध्ये पंतप्रधान होते!
पुण्यातल्या वास्तव्यात नाथ पैंनी मॅझिनी, गॅरिबाल्डी, वीर सावरकर आणि भगतसिंगांची चरित्रे वाचली. फ्रान्स आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यांचे इतिहास वाचले. दुसरे महायुद्ध सुरू झालेले होते. प्रारंभीच्या काळात तरी या युद्धात इंग्लंडची पीछेहाट होत होती. भारताच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने ही घटना अनुकूल होती. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्याच्या हेतूने नाथ परीक्षा आणि अभ्यास दूर ठेवून बेळगावला आले.
आपल्या या तरुण मुलाने आंदोलनात भाग घेण्यापूर्वी थोडा विचार करावा, असे त्यांच्या आईला वाटले. तिने तसे बोलूनही दाखवले. नाथ मात्र आईला तडफेने म्हणाले, “आई, तू माझी एकटीच आई नाहीस. मला अशा वीस कोटी आया आहेत आणि त्यांच्यासाठी मला स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला पाहिजे.” एक मातृभक्त मुलगा या शब्दात आईला उत्तर देतो, तेव्हा त्याची स्वातंत्र्याची आस किती प्रबळ असेल, याचा अंदाज आपल्याला करता येईल.
नाथ पैं आणि त्यांच्या मित्रांना क्रांतिमार्गाचे आकर्षण होते. सरकारी बँक लुटणे, बाँबचा कारखाना चालविणे, लष्कराच्या गवताच्या गंजी पेटविणे अशा अनेक प्रयत्नांमधून इंग्रजांची त्रेधातिरपीट हे मित्र उडवीत होते. काही प्रयत्न सफल होत, काही वाया जात. क्रांतिकारकांची धरपकड सुरू झाली आणि नाथ पकडले गेले.
कारागृहाच्या कोठडीत नाथ पै अनन्वित छळाला सामोरे गेले. त्यांना अंधारकोठडीतही ठेवण्यात आले. अकरा महिने नाथ अंधारकोठडीत होते. रावसाहेब पटवर्धन याच वेळी तुरुंगात होते. एक बुद्धिमान, तरुण विद्यार्थी अंधारकोठडीत आहे, हे समजल्यावर रावसाहेबांनी विशेष प्रयत्न करून त्यांना आपल्या सहवासात ठेवण्याची व्यवस्था करविली. रावसाहेबांच्या या सहृदय कृतीचा नाथ पैंच्या मनावर खोलवर परिणाम झाला. आता तुरुंगातही मराठी-इंग्रजी-संस्कृत पुस्तकांचे वाचन सुरू झाले. तुरुंगाधिकाऱ्यांची संमती घेऊन खेळांचे सामनेही होऊ लागले.
आई तुरुंगात नाथांना भेटायला आली. नाथ पैंच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. आई नाथांना म्हणाली, “तुझ्या डोळ्यात पाणी का? तुला वीस कोटी आया होत्या ना? तुला योग्य वाटले तेच तू केलेस! आता त्याबद्दल वाईट का वाटून घेतोस?” लक्षात घ्यायला हवे की ही शब्दांची परतफेड नव्हती. उलटवारही नव्हता. मातेने पुत्राला करून दिलेली ती कर्तव्याची जाणीव होती.
पोलीस चौकी जाळण्याच्या खटल्यातून नाथ निर्दोष सुटले. आता ते सेवादलाच्या कामात रस घेऊ लागले. नवी आव्हाने, नवी आंदोलने जणू या तरुणाची वाट पाहत होती. नाथ या आंदोलनांना सन्मुख झाले.
क्रांतिकार्यात सहभागी झाल्यामुळे अभ्यास मागे राहिला होता. सुमारे दोन वर्षे उशीरा, १९४७ मध्ये, नाथ बीए झाले. याच वर्षी भारत स्वतंत्र झाला. फाळणी होऊन देश स्वतंत्र झाल्यामुळे अनेकांच्या मनात नाराजी होती. तरीही सर्वांनी स्वातंत्र्याचे स्वागत केले. बेळगावच्या टिळक चौकात अनेक सेवादलस्वयंसेवकांसह नाथांनी राष्ट्रध्वजाला वंदन केले. पंधरा ऑगस्टच्या प्रारंभी, भर मध्यरात्री नाथ पैंनी एक छोटेसे भाषण केले. या भाषणात ते म्हणाले, “देश स्वतंत्र झाला. फार वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. हुतात्म्यांच्या बलिदानाचे सार्थक झाले.पण स्वातंत्र्य हे साध्य नाही. ते साधन आहे. आता देश समृद्ध करण्यासाठी झटू या. किसान, कामगार, प्रजेचे राज्य निर्माण करू या. स्वातंत्र्य म्हणजे संयम, नवा भारत आपल्याला निर्माण करावयाचा आहे, त्यासाठी अधिक त्यागाची व बलिदानाची गरज आहे.” आपल्या पुढच्या कार्याची दिशाच जणू या भाषणातून नाथांनी सूचित केली होती.
‘बॅरिस्टर’ होणे हे नाथ पैंचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे स्वप्न होते. त्यातही नावामागे ‘बॅरिस्टर’ ही उपाधी लागावी, एवढी मर्यादित इच्छा नव्हती. भारतीय राजकारणात ही पदवी धारण करणाऱ्यांना मान होता. जीना आणि सावरकर ‘बॅरिस्टर’ होते. ‘बॅरिस्टर’ ही पदवी मिळविण्यासाठी इंग्लंडला जावे, तेथील संसदीय लोकशाहीचा अभ्यास करावा, परत आल्यावर भारतातील संसदीय लोकशाही मजबूत करावी आणि विधायक राजकारण करावे – एवढा विशाल विचारव्यूह नाथ पैंच्या मनात होता. इंग्लंडमधील मजूर पक्षाचे कामही त्यांना जवळून पाहायचे होते. कारण त्यांच्या समाजवादी विचारसरणीशी या पक्षाची धोरणे मिळतीजुळती होती.
इंग्लंडमध्ये नाथ पैंचे कायद्याचे शिक्षण सुरू झाले. ‘लिंकन्स इन’ हे त्यांच्या अध्ययनाचे स्थान होते. त्यांच्या इंग्लंडमधील विद्यार्थिदशेच्या प्रारंभीच भारतात दोन घटना घडल्या. त्यातील पहिली घटना होती गांधीजींचे ऐतिहासिक उपोषण आणि दुसरी घटना होती ती राष्ट्रपित्याची हत्त्या. आपल्या या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशाची खूप काळजी घ्यायला हवी, हे नाथ पैंच्या ध्यानी आले.
समविचारी समाजवादी तरुणांचा ‘इंडियन सोशलिस्ट ग्रुप’ लंडनमध्ये स्थापित झाला. या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासासाठी वर्ग सुरू झाले. या वर्गांना नाथ उपस्थित राहत असत. इंग्लंडमधील भारतीयांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘इंडियन मजलिस’ या संस्थेचे काम नाथ पाहू लागले व पुढे दोन वर्षांसाठी ते ‘मजलिस’चे अध्यक्षही झाले. इंडियन सोशलिस्ट ग्रुप आंतरराष्ट्रीय समाजवादी युवक संघटना (इंटरनॅशनल युनियन ऑफ सोशलिस्ट यूथ – ‘युसी’) या संस्थेशी संलग्न होता. या ‘युसी’च्या व्यासपीठावर गोव्याच्या स्वातंत्र्याचा प्रश्न मांडला गेला आणि पोर्तुगीजांच्या दडपशाहीचा निषेधही झाला. भारतातले प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन मांडण्यात नाथ यशस्वी झाले.
इंग्लंडमधील संसदीय लोकशाहीचा अभ्यास करण्याच्या हेतूने नाथ ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये जाऊन तेथील कामकाजाचे निरीक्षण करीत. इंग्लंडमधल्या मजूर पक्षाचे कामकाज पाहत. त्या वेळचे इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांच्याशी नाथ पैंची जवळीक निर्माण झाली. फेन्नर ब्रॉकवे, हॅरॉल्ड विल्सन इत्यादी मजूर पक्षाच्या नेत्यांचाही परिचय झाला. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने ही सर्व सुचिन्हे होती.
कामगार संघटनांच्या – ट्रेड युनियनच्या – अभ्यासासाठी नाथांना ऑस्ट्रिया या देशाकडून एक शिष्यवृत्ती मिळाली. अध्ययनाच्या या कालखंडात त्यांचे वास्तव्य व्हिएन्नामध्ये होते. अभिजात संगीतासाठी हे शहर जगप्रसिद्ध आहे. या कालखंडात नाथ जर्मन भाषा शिकले. जर्मन भाषेतून वृत्तपत्रीय लेखन करू लागले. बहुआयामी व्यक्तिमत्त्व नव्या अनुभवांनी कसे समृद्ध होत जाते, याचा नाथ हे उत्तम नमुनाच मानायला हवेत.
व्हिएन्नामध्येच नाथ पैंच्या जीवनाला एक वेगळा आयामही लाभला. ऑस्ट्रियन सरकारच्या सचिवांची कन्या क्रिस्टल मुशेल यांच्याशी त्यांचा परिचय झाला. नाथ पैंच्या तडफदार व्यक्तिमत्त्वाने क्रिस्टल प्रभावित झाल्या. क्रिस्टलही कष्टाळू, बुद्धिमान होत्या. नाथ आणि क्रिस्टल हा नियतीच्या दृष्टीने समसमासंयोग होता. यथावकाश नाथ आणि क्रिस्टल विवाहबद्ध झाले.
१९४७ ते १९५२ असा सुमारे पाच वर्षांचा काळ नाथ परदेशात होते. इंग्लंड, ऑस्ट्रिया आणि अमेरिका या देशांमध्ये ते राहिले. कायद्याचा अभ्यास हा मूळ उद्देश आणि तो करताकरताच संसदीय लोकशाहीचा आणि कामगार चळवळीचा अभ्यास सुरू होता. ‘बॅरिस्टर’ या पदवीसाठीच्या दोन परीक्षा नाथ उत्तीर्ण झालेआणि शेवटच्या परीक्षेच्या तयारीत होते. पण शिक्षण तात्पुरते अपूर्ण ठेवून एका वेगळ्या कारणासाठी ते भारतात आले.
१९५२ मध्ये भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वीचा हा काळ होता, तेव्हा गुजरातपासून धारवाडपर्यंत विस्तार असलेले मुंबई राज्य होते. मुंबई राज्यात ‘बेळगाव शहर’ हा विधानसभा मतदारसंघ होता.समाजवादी पक्षाने या मतदारसंघातून नाथ पैंना उमेदवारी दिली. नाथ या निवडणुकीसाठी भारतात आले. त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. तरुण मंडळी उत्स्फूर्तपणे नाथ पैंच्या प्रचारात सामील झाली. या निवडणुकीत पु. ल. देशपांडे प्रचारासाठीची भाषणे करीत. ‘पुढारी पाहिजे’ या पु. लं. च्या प्रसिद्ध वगनाट्याचा प्रयोग या निवडणुकीत झाला.असे असूनही नाथ या निवडणुकीत पराभूत झाले. कदाचित नाथ पैंचे ‘बॅरिस्टर’ होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठीची ही नियतीची योजना असेल. नाथ पुन्हा इंग्लंडला गेले आणि वर्षभरातच ‘बॅरिस्टर’ या पदवीसाठीची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाले.
यानंतरही वर्षभर नाथ युरोपमध्ये होते. या कालावधीत त्यांनी साने गुरुजींचे लंडनमध्ये स्मारक उभारण्याचे काम मनावर घेतले. गुरुजींच्या नावे लंडनमध्ये विद्यार्थी-वसतिगृह सुरू करण्याची ही योजना होती. या योजनेने नाथ पैंच्या प्रयत्नांमुळे गती घेतली व हे वसतिगृह सुरू झाले.
नाथ पैंच्या कार्यकर्तृत्वाचा आणि विशेषत: वक्तृत्वाचा गौरव युरोपभर होऊ लागला. फिनलंड, जर्मनी, इस्त्राइल वगैरे देशांमधून व्याख्यानासाठी निमंत्रणे येऊ लागली. ‘उपनिषदांचा जर्मन तत्त्वज्ञानावरील परिणाम’ या विषयावर प्रबंध लिहून व्हिएन्ना विद्यापीठाची पीएचडी मिळण्याचीही संधी होती. मात्र नाथ आपल्या अन्य कार्यामध्ये इतके गुंतले, की हा प्रबंध ते पूर्ण करू शकले नाहीत.
आंतरराष्ट्रीय समाजवादी युवक संघटने(युसी)च्या स्वीडनमध्ये भरलेल्या नवव्या अधिवेशनात ‘युसी’चे अध्यक्ष म्हणून नाथ पैंची निवड झाली. हा सन्मान मिळविणारे नाथ हे पहिले भारतीय होते. परदेशात असा अतुलनीय लौकिक लाभत असतानाही नाथ त्या लौकिकात गुंतले नाहीत. त्यांचे भारतातल्या राजकारणाकडे लक्ष होते. स्वातंत्र्यानंतरचा भ्रमनिरासाचा कालखंड सुरू झाला होता. स्वातंत्र्य मिळेल, लोकशाहीची प्रस्थापना होईल, जनतेचे प्रश्न सुटतील अशी आशा स्वातंत्र्यापूर्वी लोक बाळगून होते. ही आशा फलद्रूप होण्याची चिन्हे तर दिसत नव्हती. सरकारवर अंकुश ठेवणे आवश्यक होते. त्यासाठी नाथ भारतात परत आले.
एका सत्कार-समारंभानंतर रावसाहेब पटवर्धन नाथ पैंना म्हणाले, “हे पाहा नाथ, मी काही गोखले आणि तुम्ही काही गांधी नाही. पण गोखले यांनी गांधींना जे सांगितले ते मी सांगू इच्छितो. तुम्ही बराच काळ राजकारणापासून, भारतापासून दूर राहिला आहात. आता साऱ्या देशभर जा. पाहा. अनुभव घ्या. सारे नीट समजावून घ्याआणि नंतरच काय करायचे ते ठरवा.” रावसाहेबांचा वडीलकीचा सल्ला नाथांनी शिरोधार्य मानला. कर्नाटकातील वयोवृद्ध नेते गंगाधरराव देशपांडे यांचाही आशीर्वाद नाथ पैंना लाभला.
भारतात परतल्यानंतर तीन प्रश्नांमध्ये नाथ पैंना विशेष लक्ष घालावे लागले. पहिला होता गोवामुक्तीचा प्रश्न. त्यातील सत्याग्रही लढ्याचे नेतृत्व तर नाथांनी केलेच, पण आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हा मुद्दा उपस्थित करण्यातही ते यशस्वी झाले. गोवामुक्तीच्या संदर्भात जणू ते भारताचे परदेशांमधले अनधिकृत राजदूत ठरले. भाषिक राज्यांच्या निर्मितीचे धोरण जाहीर झाल्यानंतरही अन्याय होत राहिला तो मराठीवर आणि महाराष्ट्रावर. मराठी भाषिकांचा मुंबई, विदर्भ, मराठवाडा यांसहितचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण होणे आवश्यक होते. केवळ तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाईंच्या हट्टाग्रहामुळे या राज्याच्या निर्मितीची घोषणा होत नव्हती. त्यासाठीचे आंदोलन हा दुसरा प्रश्न आणि तिसरा, अजूनही अनुत्तरित राहिलेला प्रश्न म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचाच भाग होता. बेळगाव, निपाणी आणि कारवार हा सीमावर्ती प्रदेश मराठीबहुल असल्यामुळे तो संयुक्त महाराष्ट्राला जोडला जाणे आवश्यक होते. हा भाग कन्नडबहुल असल्याचा आभास पद्धतशीर व्यूहरचना करून कन्नडसमर्थकांनी निर्माण केला होता. नाथ पै याही प्रश्नाच्या सोडवणुकीत गुंतले.
याच दरम्यान आणखी एक आव्हान समोर आले. १९५७ची लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. १९५२च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत दक्षिण रत्नागिरी मतदारसंघातून काँग्रेसतर्फे मोरोपंत जोशी खासदार म्हणून निवडून आले होते. १९५७ची दुसरी निवडणूक तेच जिंकतील असे अनेकांना वाटत होते. त्यांच्याविरुद्ध निवडणूक जिंकणे नाथांना अवघड जाईल, असे खुद्द रावसाहेब पटवर्धनांनाही वाटत होते; परंतु नाथ पैंनी निवडणूक लढविण्याचा निश्चय केला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळे लोकमत काँग्रेसला अनुकूल नव्हते. नाथ पैंचे तरुण वय, उमदे व्यक्तिमत्त्व आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे वक्तृत्व ही त्यांची जमेची बाजू होती. मालवणी बोली ही या मतदारसंघाची प्रादेशिक बोली. या बोलीत नाथ मतदारांशी संवाद साधीत. बोलण्यात अकृत्रिम जिव्हाळा असे. अशा अनेक गुणांच्या प्रभावामुळे मोठ्या मताधिक्याने नाथ पै खासदार म्हणून निवडून आले. संसदीय लोकशाहीच्या गर्भगृहात-भारतीय संसदेत त्यांनी सदस्य म्हणून प्रवेश केला.
संसदीय कामकाजातील नाथ पैंची उद्दिष्टे स्पष्ट होती. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करणे, फाझलअल्ली कमिशनने बेळगाव-निपाणी हा सीमाभाग कर्नाटकात (त्या वेळच्या म्हैसूर राज्यात) समाविष्ट केला होता, तो महाराष्ट्राला जोडणे.ज्या कोकणचे प्रतिनिधित्व ते संसदेत करीत होते, त्या कोकणाला पायाभूत सुविधामिळवून देणे आणि लोकशाही संकेत दृढमूल करणे, ही ती उद्दिष्टे होती. लोकसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात नाथ पैंनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा प्रश्न उपस्थित केला. हे त्यांचे भाषण इतके आकर्षक होते, की लोकसभेचे उपसभापती सरदार हुकूमसिंग भाषण संपल्यावर आपल्या आसनावरून उतरून खाली आले आणि त्यांनी नाथ पैंचे अभिनंदन केले. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि केंद्रीय मंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत यांचेही लक्ष या भाषणाने वेधून घेतले. आजवर लोकसभेवर प्रा. हिरेन मुखर्जी यांच्या इंग्रजी वक्तृत्वाचाच ठसा होता. पण आता प्रा. हिरेन मुखर्जींपेक्षाही नाथ पैंचे वक्तृत्व सरस आहे, असा अभिप्राय जुनेजाणते लोकही व्यक्त करू लागले.
पहिल्या अधिवेशनानंतर नाथ पै मतदारसंघात आले. आपल्या कामकाजाची लोकांना माहिती देऊ लागले. आपण लोकप्रतिनिधी आहोत, आपण ही माहिती दिली पाहिजे, याचे त्यांना भान होतेच; पण अशी माहिती लोकांनीही विचारली पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे, असेही नाथ पैंचे म्हणणे होते. ही प्रथा लोकांसाठी अभिनव होती. आपला लोकप्रतिनिधी जागरूक आहे, आपणही तसे असले पाहिजे, याची जाण लोकांनाही आपोआप आली. लोक आपले प्रश्न घेऊन निर्भयपणे नाथ पैंकडे येऊ लागले.
त्यावेळी कोकणात रेल्वे तर नव्हतीच, पण मुंबईला जोडणारा बऱ्या अवस्थेतला महामार्गही नव्हता. सावंतवाडी-मुंबई, वेंगुर्ले-मुंबई या एसटीच्या गाड्या कोल्हापूर-पुणे मार्गे जात.हे आज कदाचित खरेही वाटणार नाही. बोटीची वाहतूक सामान्यजनांना परवडणारी होती. त्यासाठी बंदरांची देखभाल आणि बंदरसुधारणा आवश्यक होती. मुख्य बंदरांना जोडणारे रस्ते आवश्यक होते. मुंबई-गोवा महामार्ग होणे अगत्याचे होते. पोस्ट आणि तार खाते केंद्राच्या अखत्यारीत येते. अधिकाधिक पोस्ट व तार ऑफिसे व्हावीत म्हणून प्रयत्न करणे हे खासदारांचे कामच होते. नाथ पै सुजाण लोकप्रतिनिधी होते. त्यांनी मतदारसंघातील गरजांच्या प्राथमिकता निश्चित केल्या. कोणत्या प्रश्नासाठी कोणत्या अधिकाऱ्यांना भेटायचे, याचे क्रम ठरविले. कालबद्ध कार्यक्रमानुसार प्रश्नांची सोडवणूक होऊ लागली. आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा मापदंडच जणू ते निर्माण करीत होते.
कामगार चळवळीचा अभ्यास नाथ पैंनी आपल्या विद्यार्थिदशेत युरोपमध्ये केलेला होता. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महासंघाचे नाथ पै अध्यक्ष झाले. महागाई भत्त्यात हंगामी वाढ मिळावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. संप केल्याशिवाय मागण्या मान्य होणार नाहीत, असे वातावरण होते. नाथ पैंनी संपाचा प्रश्न लोकसभेत उपस्थित केला. लालबहादूर शास्त्री, गुलझारीलाल नंदा, टी. कृष्णम्माचारी या नेत्यांशी आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंशी वाटाघाटी केल्या. पोस्टमनला पत्रांच्या ओझ्याबरोबरच हालअपेष्टा, दैन्य, वैफल्य यांचा मोठा भार वाहावा लागतो याची जाणीव काव्यमय भाषेत पंडितजींना करून दिली. चर्चेचा उपयोग झाला. संप टळला. नाथ पैंच्या कार्यकौशल्यामुळेच हे घडू शकले.
संयुक्त महाराष्ट्रासाठीचे आंदोलन तीव्र होत होते. सभा-समारंभांच्या वेळी या आंदोलनाचे पडसाद पंडित नेहरूंपर्यंत पोहोचत होते. महर्षी कर्वे यांनी ‘संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा, ही माझी शेवटची इच्छा आहे’ असे जाहीर केले, तेव्हा नाथांना हा महर्षींचा आशीर्वाद आहे असे वाटले. एका शतायुषी, कृतिशील समाजसुधारकाचा हा आशीर्वाद वाया जाणार नव्हता. या घटनेनंतर दोन वर्षांनी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला.
चीनचे युद्ध भारताच्या दाराशी येऊन ठेपले. येथेही केंद्र सरकारचा भाबडेपणा, गाफीलपणा देशाला नडला. याही संदर्भात नाथ पै केंद्राला सतत सूचना देत होते;परंतु त्या गांभीर्याने घेतल्या गेल्या नाहीत. पुढे युद्ध अटळ झाले.
राष्ट्र, राज्य आणि प्रदेश अशा तीनही पातळ्यांवर नाथ पैंना अनेक प्रश्न सोडवावे लागत. कोकण ही तर त्यांची जन्मभूमी. कोकणच्या विकासासाठी नाथ आणि त्यांच्या समविचारी मित्रांनी मुंबईमध्ये कोकण विकास परिषदेचे पहिले अधिवेशन घेण्याचे निश्चित केले. परिषदेच्या अध्यक्षपदी नाथ पै यांची निवड झाली. २१ फेब्रुवारी १९५९ रोजी सुरू झालेल्या या अधिवेशनाचा प्रारंभ कवी मंगेश पाडगावकरांनी लिहिलेल्या गीताने झाला.
ताठ मान अभिमान आमुचा सह्याद्रीचे उंच कडे
हिरवे कोकण हे नंदनवन, इथे फुलांचे लाख सडे
हे ते गीत. पन्नास वर्षांनंतरही कोकणचे अभिमानगीत म्हणून या गीताचा उल्लेख होतो. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे या अधिवेशनाचे उद्घाटक होते. नाथ पैंनी कोकणच्या ऐतिहासिक परंपरेचा आणि कोकणच्या देशासाठीच्या योगदानाचा आढावा आपल्या भाषणाच्या प्रारंभी घेतला. कोकणच्या विकासासाठीचा एक सूत्रबद्ध आराखडाच त्यांनी नंतर सादर केला. कोकणच्या विकासासाठी एक स्वतंत्र विकास मंडळ (डेव्हलपमेंट अथॉरिटी) स्थापन करावी, बोट वाहतूक सुरू ठेवावी, कोयना प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचा फायदा कोकणला व्हावा, काजू व्यवसायाला चालना द्यावी, मच्छिमारी व त्यावर आधारित उद्योगांना साहाय्य मिळावे, अशा विविध सूचना नाथ पै यांनी केल्या.
कोकण रेल्वेची मागणी अनेक वर्षांपूर्वी अ. ब. वालावलकर यांनी इंग्रज सरकारकडे केलेली होती. या मागणीचा राजकीय पटलावर पाठपुरावा मात्र होत नव्हता. नाथ पै यांनी तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोकण रेल्वे पूर्ण व्हावी, अशी मागणी या अधिवेशनात केली. डोंगरदऱ्यांनी भरलेल्या कोकणात रेल्वे येणार कशी? असा प्रश्न भले भले लोकही करीत होते. ‘एक स्वप्न’ अशीच संभावना या मागणीची झाली; परंतु स्वप्न जर द्र्ष्ट्या माणसाने पाहिलेले असेल, तर ते कधी ना कधी पूर्ण होतेच. ‘कोकण रेल्वे’ हे नाथ पैंचे स्वप्न होते. त्यांच्या जीवनकाळात दिवा ते आपटा हा कोकण रेल्वेचा प्रारंभिक अंश बांधलाही गेला. पुढे अनेक वर्षे ही रेल्वे काही पुढे सरकली नाही. सुमारे पंधरा वर्षांनी नाथ पैंचे सहकारी प्रा. मधु दंडवते रेल्वेमंत्री झाले आणि आपटा ते रोहा हा मार्ग पूर्ण झाला. दहा वर्षांनंतर अल्पकाळासाठी दंडवते अर्थमंत्री झाले आणि समाजवादी विचारांचे जॉर्ज फर्नांडिस रेल्वेमंत्री झाले. त्यावेळी कोकण रेल्वेसाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण होऊन कोकण रेल्वे पूर्ण झाली. १९९६ मध्ये कोकण रेल्वे सावंतवाडीत दाखल झाली, तेव्हा नाथ पैंच्या निधनाला पंचवीस वर्षे झाली होती. या द्रष्ट्या नेत्याचे स्वप्न पुढच्या पिढीने पूर्ण केले. कोकण रेल्वेच्या स्वागत फलकांवर ‘स्वप्न नव्हे, सत्य’ असे वाक्य झळकले. हे स्वप्न अ. ब. वालावलकरांनंतर नाथ पैंनी जागविले होते आणि त्याला या कोकण विकास परिषदेच्या अधिवेशनात उद्गार लाभला होता.
कोकण हा निसर्गसंपन्न प्रदेश. एका बाजूला, पूर्वेला सह्याद्रीची पर्वतरांग आणि दुसऱ्या बाजूला, पश्चिमेला, थोडाथोडका नव्हे, सातशेवीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा! निसर्गाचे हे श्रीमंत आणि भव्य रूप रोज पाहणारा कोकणी माणूस मात्र अर्धपोटी. दरिद्री. कोकणातल्या बुद्धिमंतांनाही कोकणाबाहेर पडल्याशिवाय विद्या-धन-सन्मान यांचा लाभ होत नव्हता. घराघरातला तरुण पुरुष पोटापाण्यासाठी मुंबईकडे धाव घेत होता. मंडणगड ते सावंतवाडीपर्यंत पसरलेला संपूर्ण रत्नागिरी जिल्हा ‘मनिऑर्डरवर जगणारा जिल्हा’ म्हणून ओळखला जात होता. नाथ पैंना हे चित्र बदलायचे होते. कोकणी माणूसही कष्टाळू होता. दारिद्र्य दूर व्हावे, यासाठी प्रयत्नात होता. पण तो परिस्थितीपुढे हतबल होता. कोकण विकास परिषद घेऊन नाथ पैंनी कोकणी माणसाला बळ दिले. त्याचे मनोगत आपल्या भाषणात मांडले. जणू ते कोकणी माणसाच्या आकांताचा उद्गार बनले. कोकणची नियती बदलू शकते, याचे संकेत नाथ पैंनी या अधिवेशनात दिले.
देश ब्रिटिशांच्या ताब्यात असताना नाथ पैंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला होता. देश स्वतंत्र झाला, की अन्याय संपतील असे त्यांना वाटले होते. पण ते तसे संपले नाहीत. अन्यायाच्या प्रतिकारासाठी लढणाऱ्या नाथांना स्वतंत्र भारतातही तुरुंगवास घडला. निमित्त झाले सीमाभागातील आंदोलनाचे. बेळगावजवळच्या सीमाभागातील खानापूर तालुक्यातील इदलहोंड या गावी कर्नाटकमधील म्हणजे तत्कालीन म्हैसूर राज्यातील पोलीस सारावसुलीजप्तीसाठी गेले आणि मराठी कुटुंबांवर जबरदस्ती करू लागले. या जबरदस्तीला बळवंतराव सायनाक आणि राम आपटे या सहकाऱ्यांसह नाथ पैंनी विरोध केला. या प्रकरणी नाथ पैंना साडेचार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. भाषावार प्रांतरचना हे सूत्र निश्चित झाल्यानंतर मराठी समुदायाला महाराष्ट्रात राहावेसे वाटणे, हा त्यांचा न्याय्य हक्क ठरतो. या न्याय्य हक्काच्या लढ्यात नाथ पैंना तुरुंगवास घडला. या तुरुंगवासात नाथ पैंनी बोरिस पास्टरनाकची ‘डॉ. झिगो’ ही कादंबरी आणि मुन्शी प्रेमचंदांचे कथासंग्रह वाचले. उपनिषदांचा अभ्यास केला. राजकारणाच्या धकाधकीत आपले कलासक्त मन नाथांनी कोमेजू दिले नाही.
१९६० साली केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संपाच्या वेळी बॅ. नाथ पै यांनी लोकसभेत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भूमिकेच्या विरोधात केलेले भाषण हे त्यांच्या सर्वोत्कृष्ट भाषणांपैकी एक मानले जाते. १९५७ साली जो संप नाथांनी कौशल्याने टाळला, तो १९६० साली करावाच लागला. सरकारने दिलेली आश्वासने पाळलेली नव्हती. कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित होत्या. या संपाबाबत लोकसभेत चर्चा झाली, तेव्हा संपाच्या नेत्यांना पं. नेहरूंनी अवखळ, बालिश आणि बेजबाबदार ठरविले. संपनेत्यांना धड घोड्यावर बसता येत नाही आणि ते वाघावर आरूढ व्हायला निघाले आहेत, असाही शेरा पंडित नेहरूंनी मारला. आता ते सत्ताधीश होते आणि म्हणून काहीही म्हणण्याचा जणू त्यांना अधिकार होता! याचपंडित नेहरूंनी १९२६ साली ब्रिटिश मजुरांची दयनीय अवस्था बघून आपल्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, असे पूर्वी लिहिले होते. नाथ पैंनी आपल्या भाषणात १९२६ सालचे नेहरू खरे, की १९६० साली कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढणारे नेहरू खरे?’असा प्रश्न उपस्थित केला. पं. नेहरूंच्याच जुन्या वक्तव्याचा संदर्भ नाथ पैंनी दिलेला असल्यामुळे सर्व सभागृह अंतर्मुख झाले.
नाथ पैंच्या संसद-सदस्य म्हणूनच्या कामगिरीची नोंद पं. नेहरू यांनी घेतली. मॉस्कोला भरलेल्या जागतिक पार्लमेंटरी परिषदेला भारताचे प्रतिनिधी म्हणून नाथ पैंची निवड पंडित नेहरूंनी केली आणि नाथ या परिषदेला जाऊन आले. नाथ पैंचा उल्लेख पं. नेहरू ‘अ जंटलमन पॉलिटिशिअन’ – ‘सभ्य राजकारणी’ असा करीत असत. त्या काळी राजकारण अगदीच सवंग, बाजारू झालेले नव्हते. बरीच हिरवळ शिल्लक होती. त्या काळातला हा महिमा आहे. तो काळाचाही महिमा आहे.
२४ मे १९६१ रोजी कोकणात प्रचंड मोठे वादळ झाले. दक्षिण रत्नागिरी म्हणजे आजच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला या वादळाची मोठी झळ बसली. चक्रीवादळामुळे घरांवरची कौले उडाली. मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडले. घरे पडली. मुसळधार पावसामुळे सर्वत्र चिखल झाला. रस्ते बंद झाले. बोट वाहतूक थंडावली. रेल्वे त्याकाळी नव्हतीच. संपूर्ण जिल्ह्याला एखाद्या दुर्गम बेटाची अवकळा आली. नाथ पैंना हे कळताच ते तातडीने आपल्या मतदारसंघात आले. मैलोनमैल पायी चालत ते आपल्या मतदारांच्या घरीगेले. त्यांना भेटले. झालेल्या नुकसानाचा त्यांनी अंदाज घेतला. आवश्यक त्या नोंदी घेतल्या. राज्य आणि केंद्र सरकारकडे सर्व माहिती पोहोचवून पीडितांना कोणताही आप-परभाव न ठेवता मदत मिळवून दिली.
गोवामुक्तीसाठी नाथ पै आणि त्यांचे सहकारी अनेक वर्षे प्रयत्नशील होते. दिल्लीतील नेत्यांना गोव्यातील पोर्तुगीज दडपशाहीची वेळोवेळी कल्पना देत होते. डिसेंबर १९६१ मध्ये पंडित नेहरूंनी गोवामुक्तीचे स्पष्ट संकेत दिले आणि भारतीय सैन्याने गोव्यात प्रवेश केला. १९ डिसेंबर १९६१ रोजी पोर्तुगीजांनी शरणागती पत्करली. गोवामुक्तीचा ध्यास नाथ पै आणि त्यांच्या सहकाऱ्यांना होता. नाथ पै सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन्मले, बेळगावला शिकले-वाढले आणि गोव्याच्या मुक्तीचा त्यांनी ध्यास घेतला. अजूनही सिंधुदुर्ग-बेळगाव आणि गोवा या तीनही भूभागांचा भावनिक अनुबंध लक्षणीय आहे. नाथ पैंचे कार्य हे या अनुबंधाचे एक सूत्र आहे.
१९६२ सालची निवडणूक नाथांनी सहजपणे जिंकली. त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे, राष्ट्रीय स्तरावरचे, राज्य आणि स्थानिक पातळीवरचे कार्य मतदारांच्या समोर होते. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नाथ पैंनी केलेली मदत लोकांच्या स्मरणात होती. मात्र या निवडणुकीत नाथ पैंच्या विरोधकांनी बराच अपप्रचार केला होता. त्यांच्यावर असभ्य भाषा वापरल्याचे, जातिभेद बाळगल्याचे आरोप झाले, जे नाथ पैंबाबत केवळ अशक्य होते. नाथ पैंनी विदेशी स्त्रीशी विवाह केला, याकडेही मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. मतदारांनी अपप्रचाराला बळी न पडता निर्भयपणे मतदान केले आणि नाथ पै विजयी झाले. त्यांच्या मतदार संघाचा उल्लेख या निवडणुकीनंतर ‘सुजाण मतदारांचा मतदारसंघ’ असा होऊ लागला.
या दगदगीच्या कालखंडात नाथ पैंना हृदयविकाराचा पहिला झटका आला. कामाचा ताण नाथांना असह्य होत आहे, याची ती सूचना होती. नाथ पै इस्पितळात होते आणि त्याच काळात चीनने भारतावर आक्रमण केले. युद्धाच्या प्रसंगी लोकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी शिवाजीपार्कवर सभा आयोजित केलेली होती. डॉक्टरांची संमती नसतानाही नाथ या सभेला गेले. त्यांनी लोकांना संबोधित केले. आपले कर्तव्य पूर्ण करून ते परत रुग्णालयात दाखल झाले.
भारताच्या संरक्षणसिद्धतेच्या संदर्भात नाथपैअत्यंत जागरूक होते. आपली संरक्षणव्यवस्था सदोष आहे, याची त्यांना खंत होती. चीनच्या आक्रमणानंतर लोकसभेतल्या एका भाषणात ते म्हणाले होते, “ज्या देशातील लोकांना आणि सार्वभौम संसदेला संरक्षणविषयक प्रश्नांबाबत पूर्णपणे व पद्धतशीरपणे अज्ञानात ठेवण्यात येते, असा भारतावाचून दुसरा लोकशाहीप्रधान देश जगात नाही आणि तरी नवल असे, कीभारताच्या संरक्षणाविषयी जेवढी माहिती जगातल्या इतर देशांना आहे, तेवढी अन्य कोणत्याही देशाबद्दल नाही.” चिनी आक्रमणाबाबत नाथ पै सतत सरकारला सावध करीत होते. सरकार फार उशिरा जागे झाले. हीच गोष्ट १९६५ मधल्या पाकिस्तानच्या आक्रमणाबद्दल झाली. कच्छमध्ये पाकिस्तानने आक्रमण केलेले आहे, हे नाथ पैंनीच प्रथम लोकसभेत जाहीर केले. सरकारने ते नऊ दिवसानंतर मान्य केले!
नाथ पै कधीही युद्धखोर विचारांचे नव्हते. तरीही आपल्या देशाचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपलीच आहे, आपण अण्वस्त्रसज्ज असले पाहिजे, असे ते मानीत. केवळ आक्रमण परतवून लावत न राहता, सोयिस्कर ठिकाणांवरून प्रतिहल्ला करावा, अशी त्यांची सूचना असे.
नाथ पैंच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक आयाम असले, तरी ते आपल्या मतदारांच्या कल्याणाच्या विचारांनी व्यापलेला असे.
मतदारसंघाचे प्रतिनिधी आहोत, ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता होती. १९६१ ते ६६ एवढ्या सहा वर्षांत त्यांच्या मतदारसंघात तीनदा वादळे झाली. अपुऱ्या संसाधनांनिशी जगणाऱ्या कोकणी माणसाचे अपरिमित नुकसान झाले. या प्रत्येक प्रसंगी नाथांनी जातीने लक्ष घालून पीडितांना अधिकाधिक मदत मिळेल असे पाहिले. १९६६ च्या वादळाच्या वेळी इंदिरा गांधींना पत्र लिहून त्यांनी वादळाच्या प्रसंगी तामिळनाडू प्रदेशाला जेवढी भरीव मदत दिली जाते, तशी भरीव मदत कोकणला मिळावी, अशी मागणी केली. मच्छीमारी आणि काजू उद्योग या दोन उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली, तर कोकणची अर्थव्यवस्था गती घेईल अशी नाथ पैंची धारणा होती. या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींशी नाथ चर्चा करीत. त्यांच्या जागृतीचा आणि स्वप्नांचाही बराचसा कालखंड आपल्याजनहिताच्या योजनांमध्ये व्यग्र असताना खासदारकीचा दहा वर्षांचा काळ संपला. लोकसभेची १९६७ सालची निवडणूक जाहीर झाली. नाथ पैंचे मतदारसंघासाठीचे काम एवढ्या उच्च दर्जाचे होते, की त्यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे केवळ एक औपचारिकता होती. या निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवरही काँग्रेसला फारसा जनाधार नव्हता. १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत बॅ. नाथ पै पूर्वीपेक्षाही अधिक मताधिक्याने विजयी झाले.
आता नाथ पै लोकसभेचे जुने-जाणते सदस्य झालेले होते. संसदीय परंपरांच्या बाबतीत ते ‘मुरब्बी’ ठरलेले होते. आता त्यांच्याकडून अपेक्षाही वाढलेल्या होत्या. या अपेक्षांना साजेसे यश त्यांना मिळाले. संसदेचे एक लंगडे अधिवेशन–लेमडक सेशन – भरविण्याचे ठरले होते. काँग्रेसपक्ष जेमतेम बहुमतात होता. जुने खासदार पराभूत झालेले होते. लंगड्या अधिवेशनासाठी त्यांनी उपस्थित राहून देशाचा अर्थसंकल्प मंजूर करणे नैतिकदृष्टीने चुकीचे होते. नाथ पैंनी राष्ट्रपतींना तसे पत्र लिहिले.त्यांची भेट घेतली.या अधिवेशनामुळे चुकीची प्रथा दृढमूल होईल असे स्पष्ट केले आणि हे अधिवेशन रद्द झाले. ‘जाहिरातबाजी आणि आरडाओरडा केल्याशिवाय शांतपणे व सातत्याने काम केले, तर विरोधी पक्षातील एकटा खासदारही किती उत्तम काम बजावू शकतो हे नाथ पैंनी या अधिवेशनाच्या बाबतीत मिळविलेल्या विजयावरून कळते’ असा नाथ पैंचा गौरव वृत्तपत्रांनी केला. फ्रँक मोराइस या आंतरराष्ट्रीय श्रेणीच्या पत्रकारमहर्षींनी नाथ पैंविषयी लिहिले, “देशाला विधायक सूचना व चिकित्सक सल्ला देणारा बॅ. नाथ पै यांच्यापेक्षा दुसरा बुद्धिमान तरुण खासदार मला आज तरी दिसत नाही. जुन्या पार्लमेंटचे लंगडे अधिवेशन रद्द करण्यासाठी सूचना करण्यात त्यांनीच आघाडी मारली. अशा वेळी त्यांच्या बुद्धिमत्तेची चमक दिसून येते. आज देशात तथाकथित डाव्यांमध्ये सर्वात जबाबदारीने बोलणारे व वागणारे कुशल नेते नाथ पैंच आहेत. त्यांची प्रखर, प्रामाणिक वाणी आणि जबाबदार नेतृत्व नेहमी तळपत असते. नाथ पै आपण प्रथम भारतीय या भावनेने पाहतात आणि पक्षापेक्षा देश अधिक थोर मानतात.” नाथ पैंच्या कार्याचे एका त्रयस्थ व्यक्तीने केलेले हे मूल्यमापन विशेष महत्त्वाचे आहे.
‘घटना श्रेष्ठ की जनता?’ या वादात नाथ पै जनतेच्या बाजूने असत. जी घटना अपरिवर्तनीय असते, ती मृतातच जमा असते, या वाक्यावर नाथ पैंचा विश्वास होता. या संदर्भात एक संस्कृत श्लोक त्यांचा आवडता होता.
राजशक्तेरधिष्ठानं लोकशक्तिर्हि तत्त्वतः।
तयोस्तु विग्रहे प्राप्ते लोकशक्तिर्विशिष्यते।।
म्हणजे ‘राजशक्तीचे अधिष्ठान तत्त्वत: लोकशक्तीत असते. राजशक्ती आणि लोकशक्ती यांच्यात जर झगडा सुरू झाला, तर लोकशक्तीचेच मत प्रस्थापित झाले पाहिजे’ हा तो श्लोक होता. ‘घटना दुरुस्तीचा संसदेचा अधिकार’ या शीर्षकाचे घटनादुरुस्ती विधेयक नाथ पैंनी मांडले. वेगवेगळ्या व्यासपीठांवरून या विधेयकावर चर्चा झाली. हे घटनादुरुस्ती विधेयक नाथ पैंच्या संसदीय कर्तृत्वाचा कळस मानला जातो.
यानंतरच्या काळात महाराष्ट्राला एका वेगळ्या संकटाला सामोरे जावे लागले. ११ डिसेंबर १९६७ च्या पहाटे कोयनानगर परिसराला भूकंपाचा तीव्र धक्का बसला. घरे कोसळली. मोठी जीवितहानी झाली. डोंगरांना तडे गेले. कोयना धरणाला काही धोका निर्माण झाला, तर जे संकट ओढवेल, त्याच्या कल्पनेनेही लोक भयभीत झाले. आधी काही सौम्य धक्के बसलेले होते. खरे तर ती संकटाची पूर्वसूचना होती. सरकारने योग्य वेळी दक्षता घेतली असती, तर नुकसान टाळता आले असते, असे नाथ पैंनी लोकसभेत सांगितले. संकट आल्यावर आता चर्चा करण्यात फार अर्थ नव्हता. नाथ पै भूकंपग्रस्त भागात धावून आले. भूकंपग्रस्त भागाचा काही अंश देशावर होता, तर काही कोकणात. यातही सरकारी मदत कोकणाकडे फारशी वळत नव्हती असे त्यांना दिसले. ही तफावत दूर करण्याचा प्रयत्न नाथ पैंनी केला. कोकणचे पालकत्व नाथ पैंनी स्वयंस्फूर्तीने स्वीकारले होते आणि ते त्यांनी सतत जबाबदारीने निभावले.
कोकणावर प्रेम करणे म्हणजे केवळ आपल्या मतदारांचे भौतिक प्रश्न सोडवणे एवढी कोकणप्रेमाची मर्यादित व्याख्या नाथ पैंनी कधीच केली नाही. कोकणप्रेम म्हणजे इथल्या लाल मातीवर प्रेम. इथल्या झाडामाडांवर प्रेम. गुराख्याच्या हातातल्या बासरीवर प्रेम. चमकणाऱ्या काजव्यांवर प्रेम. इथल्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांवर प्रेम आणि त्याहूनही काकणभर अधिक, इथल्या लोककलांवर प्रेम. ‘दशावतारी नाटक’ ही कोकणची लोककला. साडेतीनशे वर्षांहून जुनी. समर्थ रामदासांच्या दासबोधात या कलेचा उल्लेख आहे. दशावतार केवळ नाटक नाही. ते विधिनाट्य आहे. त्याला धार्मिक प्रयोजन आहे. कोकणातल्या जत्रांमध्ये दशावतार सादर होतो. ‘सुष्ट प्रवृत्तीचे मंडन आणि दुष्ट प्रवृत्तींचे निर्दालन’ व्हावे या हेतूने दशावतारी कलावंत दशावताराचे प्रयोग करतात. दशावतारी कलावंतांची आर्थिक स्थिती हलाखीची असे. रात्री राजाचे काम करणारा दशावतारी दिवसा पेटाऱ्याचा बोजा वाहून नेणारा हमाल असे. तरीही हे कलावंत कलेशी एकनिष्ठ होते. नाथ पैंना या कलावंतांची कदर होती. त्यांनी या लोककलाप्रकाराची स्पर्धा घेण्याचे निश्चित करून पहिली दशावतारी नाट्यस्पर्धा मे १९६८ मध्ये घेतली. नंतर वेगवेगळ्या संस्थांकडून दशावतारी नाट्यस्पर्धा होऊ लागल्या. कोणे एकेकाळी विष्णुदास भावेंनी १८४३ साली ‘सीतास्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग सांगली येथे करताना नट म्हणून दशावतारी कलावंत निवडले होते. नंतरच्या काळात या लोककलाप्रकाराकडे स्नेहार्द्र दृष्टीने पाहिले ते नाथांनी. या सर्वांच्या पुण्याईचे फलस्वरूपही असेल कदाचित, पण कालांतराने संगीत नाटक अकादमीचा मानाचा पुरस्कार एक दशावतारी कलावंत बाबी नालंग यांना लाभला आणि या कलेचा गौरव राष्ट्रीय पातळीवर झाला.
नाथ पैंचे वाचन तर अफाट होतेच, पण वाचलेले लक्षात ठेवून ते योग्य जागी उद्धृत करण्याचा ‘श्रुतयोजन’ हा गुण त्यांच्याकडे होता. त्यामुळे त्यांचे वक्तृत्व तर बहरलेच, पण संदर्भ-श्रीमंतीचा गौरवही त्यांना लाभला. अनेक ज्ञानी, विचारवंत, साहित्यिक, कलावंत त्यांच्या मित्रपरिवारात आले. पु. ल. देशपांडे, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, मधु मंगेश कर्णिक, बाळ कोल्हटकर ही नामवंत मंडळी या मित्रपरिवारात होती. प्रभाकर पाध्यांशी नाथ पैंच्या साहित्यचर्चा रंगत असत. कवी मंगेश पाडगावकरांवर आकाशवाणीच्या सेवेत असताना काही अन्याय झाला, तेव्हा या अन्यायाची दाद तत्कालीन माहिती व नभोवाणीमंत्री इंद्रकुमार गुजराल यांच्याकडे नाथ पैंनी मागितली होती.
महाबळेश्वर येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय अधिवेशन १९७० मध्ये झाले. कविवर्य बा. भ. बोरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या आग्रहावरून नाथ पै या संमेलनाला उद्घाटक म्हणून आले होते. नाथ पैंनी या प्रसंगी केलेले भाषणही गाजले. साहित्यिकांनी कल्पनेच्या साम्राज्यात न रमता वास्तव जीवनाकडे यावे, हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर यावे, जीवनावरील श्रद्धा बळकट करावी, असा त्यांच्या भाषणाचा आशय होता. नाथ पैंचे हे भाषण लेखकांना अंतर्मुख करणारे होते.
चौथ्या कोकण विकास परिषदेला अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ आणि चिंतामणराव देशमुख हजर राहणार होते. नाथ पैंच्या प्रकृतीच्या बऱ्याच तक्रारी होत्या. चिंतामणराव देशमुखांना नाथ पैंच्या प्रकृतीची खूप काळजी होती. परिषद आम्ही यशस्वी करू, जीव धोक्यात घालून तुम्ही येऊ नका, असे चिंतामणरावांनी सुचविलेही;परंतु जेथे कोकणविकासाची चर्चा होणार आहे, तेथे नाथ पै हजर नाहीत असे होणे शक्य नव्हते. आपली कर्तव्यभावना त्यांनी आपल्या भाषणातून मांडली. ते म्हणाले, “महाभारत सांगते, कर्तव्य करीत असताना मरण आले, तरी ते येऊ द्यात, म्हणून मी परिषदेसाठी आलो. परिषद चुकवून चालण्यासारखे नव्हते. माझे कर्तव्य करण्यासाठी मी आलो आहे. विकासाच्या दृष्टीने कोकण हा स्वतंत्र भाग मानला गेला पाहिजे. त्यासाठी विनाविलंब महामंडळ नेमले पाहिजे. ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत अखंडपणे या मागणीचा पाठपुरावा केला पाहिजे. निर्धाराने तयारी केली पाहिजे. आपण या वाटेने जाऊ या. यश सावलीसारखे मागे येईल.” ‘उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मी:’ हे संस्कृत सुवचन नाथ पैंना माहीत होते. आपल्या कृतीतून ते या सुभाषिताची शिकवण देत होते.
१९६७ नंतरच्या लोकसभेच्या कार्यकाळात नाथ पैंनी दोन विधेयके मांडली. त्यातले एक विधेयक राज्य सीमामंडळाच्या स्थापनेबाबतचे होते. खेडे हा मूलभूत घटक, भाषिक बहुमत आणि भौगोलिक सलगता या निकषांच्या आधारे राज्यांच्या सीमा निश्चित करण्यासाठी त्रिसदस्यीय मंडळ असावे अशी सूचना या विधेयकात होती. असे मंडळ स्थापन झाले असते, तर बेळगावचा प्रश्न सुटणार होता. दुसरे विधेयक आपल्या राज्यघटनेतील ३५९ वे कलम रद्द करावे, अशी सूचना करणारे होते. या कलमान्वये देशात आणीबाणी जाहीर करून जनतेच्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याच्या मूलभूत अधिकारावरच गदा आणता येत होती. एखादा हुकुमशाही वृत्तीचा पंतप्रधान या कलमाच्या आधारे लोकशाहीची गळचेपी करील, असे नाथ पैंना वाटत होते. नाथ पैंना द्रष्टे लोकशाहीवादी का म्हणायचे, या प्रश्नाचे उत्तर येथे आहे. नाथ पैंचे १९७१ मध्ये निधन झाले आणि पुढच्या चार वर्षांतच त्यांची भीती खरी ठरली. इंदिरा गांधींनी घटनेच्या याच कलमाच्या आधारे १९७५ साली आणीबाणी जाहीर केली. जनतेचे मूलभूत अधिकार काढून घेतले गेले. त्याविरुद्ध लढायला आता नाथ पै नव्हते. पण त्यांनी दिलेली प्रेरणा त्यांच्या अनुयायांना मार्गदर्शक ठरली आणि १९७७ साली मतपेटीतून नाथ पैंना अभिप्रेत असलेली क्रांती घडली.
१९७१ साली लोकसभेची मध्यावधी निवडणूक होणार असा रागरंग दिसू लागला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आपले राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याच्या तयारीत होत्या. त्यामुळे नाथांनाही वर्षभर आधीच लोकसभेच्या आपल्या चौथ्या निवडणुकीची पूर्वतयारी करणे भाग होते. या वेळी नाथ पैंच्या विरोधात काँग्रेसतर्फे सावंतवाडीचे राजेसाहेब शिवरामराजे भोसले निवडणूक लढविणार असे वातावरण होते. प्रकृती-अस्वास्थ्याच्या मर्यादा नाथ पैंच्या प्रचारमोहिमेत जाणवणार होत्या. जवळजवळ चार वर्षे प्रकृतीच्या तक्रारी गंभीर होत होत्या. नाथ पै मात्र ‘मृत्यूचे सतत, अव्याहत मिळणारे आव्हान झिडकारणे हाच जगण्याचा एकमेव मार्ग आहे’ असे मानणारे धीरोदात्त जीवनयात्री होते. मृत्यूला ‘जरा थांब’ असे म्हणत ते कार्यमग्न राहिले.
१६ जानेवारी १९७१ या दिवशी नाथ पैंनी मालवण तालुक्यातील चौके या गावातील माध्यमिक शाळेच्या मदतीसाठी मुंबईत आयोजित केलेल्या दशावतारी नाट्य महोत्सवाला उपस्थित राहून उद्बोधनपर भाषण केले. १७ जानेवारीला हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमासाठी त्यांना बेळगावला जायचे होते. डॉक्टरांची सक्त सूचना होती, की दहा मिनिटांहून अधिक काळ बोलायचे नाही. पण दहा वर्षांच्या कालावधीनंतर नाथ पै बेळगावमध्ये हुतात्मा दिनाच्या सभेत बोलत होते. त्यांनी वेळेची मर्यादा न मानता आपले हृद्गत मांडले. ‘बेळगावच्या ऋणातून आज मी मुक्त झालो’ असे ते म्हणालेदेखील! ही ऋणमुक्तीची भाषा अशुभाचा संकेत देणारी ठरली. १७ जानेवारी १९७१ च्या रात्री नाथ पै झोपले. थोड्यावेळाने, रात्री बाराच्या सुमारास त्यांना जाग आली. दरदरून घाम येत होता. नाथ पैंवर उपचार करणाऱ्या डॉ. याळगींना त्यांनी उठवले. अत्यंत संकोचाने आपलीअवस्था सांगितली. डॉ. याळगी आणि बेळगावमधील नामवंत हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जी. आर. कुलकर्णी यांनी तातडीने उपचार सुरू केले. नाथ पै तशाही अवस्थेत कष्टाने म्हणाले, “मला बरे करा. मला उद्या वेंगुर्ले येथे जायचे आहे.” अंतिम क्षणीही त्यांच्या ओठी जन्मभूमीचे, जन्मगावाचे नाव होते.काही क्षणांतच नाथ पै अनंताच्या प्रवासासाठी निघून गेले. त्यांची जीवनगाथा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे.
नाथांच्या दुसऱ्या पुण्यतिथीला त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना पु. ल. देशपांडे यांनी म्हटले -‘नाथ पैंचे सारे आयुष्य ह्या लोकशाहीचा आणि ती टिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या समाजवादी विचारांचा प्रसार करण्यात गेले. त्यासाठी त्याने अखेर आपल्या जिवाचे मोल दिले. त्याच्या पुण्यतिथीचा हा दिवस! जीवनातला त्याचा पराक्रम पाहून मन आनंदाने उचंबळून येत असे. त्याची व्याख्याने ऐकायला कान आतुर असत. त्याच्या सहवासात तासंतास काढावे अशी इच्छा असायची. एवढ्यातच त्याने आमचा कायमचा निरोप घेतला! ‘बडेशौकसें सुन रहा था जमाना – तुमही सो गये दास्ताँ कहते कहते – तू काय सांगतोस ते आम्ही मजेने ऐकत होतो, आणि सांगता सांगता तूच झोपी गेलास!’ ह्या ओळीतले कारुण्य अशा वेळी खूप तीव्रतेने जाणवते. नाथच्या स्मृतीला माझे विनम्र अभिवादन!’
नाथ पैंच्या पंचविसाव्या पुण्यतिथीला श्रद्धांजली वाहताना प्रा. मधु दंडवते यांनी लिहिले, ‘नाथला वक्तृत्वाची अमोघ देणगी होती. लय आणि सूर यांनी संगीत भारावलेले असते, तशीच तऱ्हा नाथच्या भाषणाची. नाथचे भाषण म्हणजे विचारांची आणि सुरांची मैफलच. तो बोलू लागला की अनेक ग्रंथांचा आधार घेई. गीता आणि उपनिषदे त्याने उद्धृत केली. बायबलमधील मानवतेचा संदेश त्याने श्रोत्यांना ऐकविला. कुराण, कुराणाचे सार त्याने सर्वांना सांगितले. बुद्धाच्या करुणेचे दर्शन त्याने घडविले आणि शिखांच्या गुरुग्रंथाचा आशय त्याने श्रोत्यांना सांगितला. हे सर्व ऐकले की वाटे, नाथ म्हणजे सर्वधर्मसमभावाचेच मूर्तिमंत प्रतीक! कालिदास आणिशेली यांच्या काव्याचा शिडकावा त्याने केला, कीक्षणभर वाटे की हा तर रसिक साहित्यिकच! कोकणातील समुद्राच्या किनाऱ्यावर बसून तासंतास नाथ निसर्गाचे सौंदर्य टिपू लागला, कीवाटत असेनजरेच्या कुंचल्याने आपल्या अंत:पटलावर निसर्गसौंदर्याचे चित्र चितारणारा हा कलाकारच! व्हिएन्नामधील पाश्चिमात्य संगीताची ध्वनिफीत, ट्रान्झिस्टर लावून नाथ ऐकत बसला, की वाटे हा तर अभिजात संगीताचा भक्त!’
‘भारताच्या स्वातंत्र्यासाठी झुंजणारा, लोकशाही समाजवादाचे स्वप्न उराशी बाळगून आर्थिक समता आणि सामाजिक न्याय यासाठी धडपडणारा, गोरगरिबांच्या आणि पददलितांच्या वेदनेला सूर देणारा, साहित्याचा, काव्याचा आणि संगीताचा रसिकतेने आस्वाद घेणारा, बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा नाथ आपला अमोल वारसा ठेवून निघून गेला. त्याच्या पावलांचा मागोवा घेत, नव्या समृद्ध, सुसंस्कृत आणि समतावादी भारताचे त्याचे स्वप्न साकार करणे, हीच नाथला वाहिलेली सार्थ श्रद्धांजली!’
आता नाथ पैंचा काळ खूप मागे पडला. काहीतरी चांगले घडेल, हा आशावादच ढासळला. आदर्शाचे बुरूज कोसळून पडले. संस्कारांच्या तटबंद्या उद्ध्वस्त झाल्या. या काळात तर नाथ पैंचे स्मरण अधिक तीव्रपणे होते. नाथ पैंनी पुन्हा परत यावे आणि मार्गदर्शन करावे, असे मनात येते. ओठांवर शब्द येतात,
आज कुठे तो दीप शुभंकर, कोठे सुजनाधार?
लुप्त तुझी ती मुक्त वैखरी, बंधन हो अनिवार
घेई पुन्हा अवतार इथे तू, हेच हवे वरदान
लोकशाहीच्या नम्र सेवका, तुझेच मंगलगान
तव स्मरणाने जागृत होई आज पुन्हा अभिमान
लोकशाहीच्या नम्र सेवका, तुझेच मंगलगान…